Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 8 जानेवारी, 2010

अंत:स्थ

एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण [जि.औरंगाबाद]येथील महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणारा तरुण प्राध्यापक.

‘अंत:स्थ’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहात एकूण पन्नासहून अधिक कविता आहेत. कवितांची विभागणी करायची ठरली तर, पहिल्या काही कविता शेतीशी संबंधीत तर बाकीच्या कविता या सामाजिक विषयांवरच्या आहेत. मराठी ग्रामीण कवितेच्या भाषेवर बराच काथ्याकूट मराठी साहित्यात झालेला आहे. पुर्वी ज्याला जानपद काव्य असे म्हटल्या जायचे. त्या काव्याची भाषा कोणती असावी, भाषेचे स्वरुप कोणते असावे, वगैरे. या कवितासंग्रहात कवीने शेतीशी संबंधीत कवितेसाठी खेडवळाची भुमिका पार पाडली आहे. आणि त्यातूनच तो आपला विचार मांडतो. ’तुव्ह सपन लुटलं’ कविता पाहा-

आरं शेतकरी दादा तुही अजब कहाणी
भूक बांधुनी पोटाले पितो घोटभर पाणी.
……………
अरं शेतकरी दादा धान नेल रं आडती
घेऊन रं मातीमोल तुल्हे मातीत गाडता
अरं शेतकरी दादा तुव्ह आयुष्य घटलं
सुखी पाहता सपन सारं रघट आटलं
अरं शेतकरी दादा तुव्ह नशीब फुटलं
हातपदरीचा घास तुव्ह सपन लुटलं (पृ.क्र.१५)

शेतक-याचं सनातन स्वप्न की, शेतीतून येणा-या उत्पन्नाने भविष्यकाळ सुखाचा होईल. पण मोंढ्यावर धान्य नेल्यानंतर तेथील दलाल धान्यांना मातीमोल भाव मागतात. रक्त आटवून सुखी स्वप्न पाहिलं जातं ते स्वप्न दलालाकडून लुटल्या जाते. या व्यवस्थेकडे कवी निर्देश करतो. एकूण सर्वच शेतकरी हे जमीनीशी निगडित आहे. ती जमीन पावसावर अवलंबुन आहे. पाऊस हेच शेतक-याचं जीवन आहे. सतत आभाळाकडे पाहणारा शेतकरी हे तर वर्तमानपत्राचं आवडतं चित्र आहे. अशाच आभाळाकडे डोळे लावणा-या ’परंपरा’ नावाच्या कवित अशीच आहे. आभाळातील चांदण्याकडं पाहत शेतकरी स्वप्न पाहू लागतो. या वेळेस चांगला पाऊस होईल. पीकपाणी चांगले येईल. मी मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवीन. मुलगा साहेब होईल.मी गावभर फिरुन सांगेन ‘मह्या पो-या सायेब झालाय’. पण दोन-चार सरी पडतात आणि शेतक-याचं स्वप्न ढेकळात विरघळून जातं. पाहता पाहता शेतक-याचं पोरगंही शेतकरीच होतो. आता बापाची जागा तो घेतो. पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पाहतो. त्याचंही स्वप्न विरघळून जातं, अशी ती ‘परंपरा’ पुढेच चालूच राहते. ’मातीशी नातं’ ’कष्टाचं वान’ ’आस’ ’शाप’ ’रान मातीची कहाणी’ ’आसवांचा महापूर’ या अशा कवीतेतून शेती आणि शेतक-याच्या प्रश्नाभोवती त्यांची कविता फिरतांना दिसते. असे असले तरी, शिवारातील शेतकर्‍याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं अशी कविताही या काव्यसंग्रहात आहे. उदा. हिरवा शालू-

राज्या-परधान्या
जुंपली तिफन
दुबार पेरणं-माळरानी
फुटले अंकुर
शेवाळलं रान
पावसाचं गाण-शिवारात
……………
…………..
हिरवा शालू
शेती अंथरला
शब्द मंतरला-तिन्हीसांजा
शालू हिरवा नटली धरती
मनाला भरती-कुणब्याच्या. [पृ.क्र.१८]

शेतीभातीच्या कवीतेनंतर कवीचं मन समाजातील व्यवस्थेकडे वळतांना दिसते.’पुरे झाले आता’ कवीतेत धर्म, संस्कृती, देव, धर्मसुत्र या सर्व गोष्टींनी मानवतेचे लचके तोडले जाते असे कवीला वाटते. दगडाच्या देवाला किती मानपान आहेत. पण माणसाला काय ते दारिद्र्य. नैवेद्य,नवस, पुर्ण करण्यासाठी किती ही माणसांची धावपळ. धर्म, वेद, यांनी माणूस संमोहित झाला आहे. आणि या अस्त्राद्वारे सामान्यांना लुटण्याचे एक कुरण प्रस्थापितांकडे आहे. कवी म्हणतो-

पुरे झाले आता
देव्हारे माजविणे
पाषाण पूजविणे-मंदिरात
माणूस माझा देव
मानवता तो धर्म
माणुसकी ते कर्म-माणसाचे. [पृ.क्र.२८]

हिंदू धर्मातील काही चालीरिती, परंपरा, याची चिकित्सा कवी करु पाहतो. सामाजिक परिवर्तन कवीला अपेक्षीत आहे. माणूसकी धर्म श्रेष्ठ आहे, या वर कवीचा भर आहे. धर्म-कर्माच्या व्यवस्थेमुळेच इथे विषमता निर्माण झाली असे कविला वाटते. इथे कवीची भुमिका ही सुधारकाची दिसते. ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे’ या मानसिकतेला बदलण्याचा विचार कवी व्यक्त करतो. त्यांची ’ ‘सत्यधर्म’ नावाची कविता बोलकी आहे. शतकानुशतके खुळचट धर्माच्या कल्पना लादून समाजमनाला पंगु बनवल्या गेलं. दगडांना शेंदूर फासवून त्यांनी भोगस्थाने निर्माण केलीत. आता ही शेंदरी दैवते लाथाडली पाहिजेत. भ्रामक धर्मशाही उलथवली पाहिजेत. आणि तुका, फुल्यांनी, सांगितलेला ‘सत्यधर्म’ जाणुन घेतला पाहिजे. अशाच पुरोगामी विचाराने भारल्या गेलेल्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. ‘तुकोबा तुझेही हात सनातनी असायला हवेत’ ‘ सनातनी पहाटेचं सावट’ ‘दिवसही वै-याचा आहे’ या कवितांमधून कवी आधुनिक विचारांशी नातं सांगतो. काही कविता राजकारणावरही आहेत.’बाबा हो लोकशाही’ कवीतेत कवी म्हणतो-


सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
……………..
…………..
पाच वर्षानंतर फेरी येते,
ज्या हातानं, आमची मुस्काट दाबली,
भाकरी हिसकावली
तीच हातं
आमच्यासमोर जोडली जातात
झोळी पसरुण भीक मागतात अन
कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
दिसून येतं
पुन्हा एकदा जैसे थे
लोकशाही बाबा लोकशाही.[पृ.क्र.५०]

‘अदिमाचा हुंकार-शब्द’ ही कविता अधिक सुंदर आहे. शव्द उठवतात रान, शब्द पेटवतात रान, शब्द जीवनगाण कधी, शब्द वरवरचा उमाळा कधी. ही दीर्घ कविता या काव्यसंग्रहाची सर्वांगसुंदर कविता ठरावी. ‘लोकशाहीचं गाणं’ ‘गुलामीचं हस्तांतर’ ‘हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतोय’ या आणि अशा अनेक कविता व्यवस्थेबरोबर स्वार्थी राजकारणावर भाष्य करतांना दिसतात. तसेच ढोंगी परिवर्तनवाद्यावरही ते आसुड ओढतात. परिवर्तनाच्या नावाखाली परिवर्तनवादी शोषण करीत आहेत. दांभिक लोक, लोकशाहीच्या नावाखाली लोकांची लूट करत आहेत. त्यावरही कवी प्रहार करतो. कवी म्हटला की, आईवर कविता ही आलीच पाहिजे. ‘माय माऊली’ ‘मायमही’ ‘सकळांची आई’ अशा कविताही वाचनीय आहेत. एकूण काय तर वर्तमानाचं भाष्य कवितेत आहे. स्वातंत्र्य आणि त्याच्या सुखाच्या कल्पनांना तडा गेल्यानंतरची वेदना कवितेत आहे तसा विद्रोहही आहे. सामान्य माणसाच्या सुखाचा शोध कवीला घ्यायचा आहे. भावना भडकविणारी वृत्तपत्र, स्त्री देहाचे नागडे दर्शन घडविणारे प्रसारमाध्यमं भारताची प्रतिमा होत आहेत. सामान्य माणसाच्या स्वप्नभंगाची भावना कवितेतून वाचायला मिळते. असे असले तरी काही दोष ज्याकडे लक्ष वेधले पाहिजे असे वाट्ते की, धनदांडगे शेतकरी सोयी-सवलती घेतात त्यावर भाष्य दिसत नाही. मोजक्याच शेतक-यांचं चित्र, तेच-तेच दयनीय अवस्थेतील शेतक-याचं वर्णन असा विचार कविता वाचतांना डोकावतो. तसेच परिवर्तनाची आस आक्रस्ताळपणे येते, असे काही कविता वाचतांना जाणवते. अशी कविता म्हणून मी ’हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतो’ ’आव्हान’ ’परिवर्तनवादी’ अशा काही कवितांचा नामोल्लेख करेन. बहुतांश कविता मुक्तछंद आणि अभंगाच्या आकृतीबंध असलेल्या आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची कवीतेवर भाष्य करणारी प्रस्तावना आहे. कवितेचा संदेश ‘माणूसकी’ आणि संघर्ष’ आहे. आणि याच भावना अधिक संवेदनशीलतेने, पुढील काव्यसंग्रहात अधिक जबाबदारीने याव्यात या करिता मी कवी मित्राला शुभेच्छा देईन.
अंतस्थ

‘अंत:स्थ’
डॉ.सर्जेराव जिगे
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत ८०/- रु.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 31 ऑक्टोबर , 2009

डेव्हीड शेफर्ड…अलविदा…!

डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे

devid 9
डेव्हीड शेफर्ड……!वाह रे, अदा..!

तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते. क्रिकेट चालू असतांना पायचीतचा निर्णय, बॅटीचा बारीक स्नीक लागून झेलबाद चा निर्णय जेव्हा शेफर्ड घेत असतील तेव्हा खेळाडूबरोबर प्रेक्षकांच्या मनातही धडधड वाढलेली असायची. क्रिकेट पंचाचे झेलबाद, पायचीत हे निर्णय सतत वादाचे असतात. तसेच नोबॉल, वाइड, हेही निर्णय त्यांचेच असतात आणि ब-याचदा त्यात चुकाही होत असतात. पण तीक्ष्ण नजर आणि अचूक-सर्वमान्य निर्णय घेण्यात शेफर्ड पुढे होते. आधुनिक कॅमेरे येण्याअगोदर सर्व निर्णयाचा जवाबदारी या दादा पंचाची होती. मैदानावर सतत लयबद्ध हालचाली करणारा डेव्हीड शेफर्ड आपली एक वेगळी ओळख ठेवून असायचे.असा डेव्हीड

Devid 3
मैदानावर…..डेव्हीड शेफर्ड…..!

स्थूल शरिरामुळे मोठ्या फटक्यांवर भर देणारा हा फलंदाज होता. शेफर्ड यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २८२ सामन्यात ४७६ डावात १२ शतक आणि ५५ अर्धशतके केली. दहा हजार ६७२ धावा आपल्या खात्यावर नोंदवल्या” ही बातमी एक खेळाडू, रसिक म्हणुनही माहिती नव्हती. [बातमीतून साभार] क्रिकेटमधील उत्तम फलंदाज म्हणून निवृत्त

Devid 6

झाल्यानंतर त्यांनी पंचगिरी सुरु केली. पंचाच्या कारकिर्दीवर आक्षेप हे असतात, पण फार कमी आक्षेप त्यांच्यावर असावेत. फलंदाज गोलंदाजांना पंचाचे अनेक निर्णय आवडत नसतात. पण तटस्थ पंच क्रिकेट खेळाचा सर्वोच्च आनंद देतात. नवशिख्या पंचानी अशा पंचाकडून निर्णय घेण्याचे शिकले पाहिजे. . मनमिळावू आणि कर्तव्यकठोर पंच असे नावलौकिक असलेले शेफर्ड कर्करोगाने आजारी होते. पंच डेव्हीड शेफर्ड यांची कारकिर्द परमेश्वराने त्यांना बाद करुन त्यांची इहलोकाची खेळी [६८ वर्षावर]संपवली. डेव्हीड शेफर्ड यांना माझी क्रिकेट खेळाडू , एक चाहता, क्रिकेट रसिक
म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 15 सप्टेंबर, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

नंद्या (नागेश भोसले ) गरीब शेतकरी. घरात बायको माली (माधवी जुवेकर), आई, बहीण आणि मुलगा असे कसे तरी हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढणारे हे शेतकरी कुटुंब. शाळेत फिस भरायला पैसे

गोष्ट छोटी डोंगराएवढी


नाहीत म्हणून शाळा सोडून देणारा त्याचा मुलगा. मागील वर्षी घेतलेल्या कापसाच्या पैसे मिळाले की चालू वर्षी बी -बियाणे घेता येईल असा सतत विचार करणारा एक काबाड-कष्ट करणारा एक सामान्य शेतकरी. शिक्षन घेऊन संस्थेत डोनेशन भरुन नौकरी मिळविता येईना म्हणून शहरातून शेतीसाठी गावाकडे परतलेला नंद्याचा मित्र राजाराम (मकरंद अनासपुरे). शेतीसाठी बी-बियांणांची व्यवस्था करण्यासाठी आणि बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी सतत कार्यालयात हेलपाटे मारुन थकलेला कर्जबाजारी शेतकरी. पैसे मिळावेत यासाठी पशुधन आणि दागिणे सावकाराकडे ठेवावे लागते.  असे सतत संकटाशी लढणारे नंद्याचे शेतकरी कुटुंब.

कर्जबाजारी होऊन गावातील संभा आणि आणखी एक शेतकरी आत्महत्या करतात. कर्जमाफीचे पॅकेज, प्रसारमाध्यमे, गावात तोकडे प्रयत्न करणारे स्वयंसेवी संस्था, अशा विविध अंगाने चित्रपट पुढे सरकत जातो. दुबारपेरणीमुळे कर्जबाजारी झालेला नंद्या शेतकरी त्याच्या बहीणीला टोपल्या वगैरे बनविण्याच्या कामाला पाठवतो. तिथे तेथील मालक तिच्या आब्रुवर टपून बसलेला असतो. नंद्या कर्जबाजारात वाहात जातो. आणि किटकनाशक पिऊन आत्महत्या करतो.

इथे चित्रपटाचे मध्यंतर होते मी सॆंडवीच शोधतो ते काही मिळत  नाही. मग कॊफी  घेतो. पुन्हा माझ्यासिटवर येतो तर दुसरा प्रेक्षक माझ्या  खुर्चीवर बसलेला असतो. त्याला वाटले मी गेलोय, तशी प्रेक्षकांची संख्या कमीच होते.

मध्यंतरानंतर चित्रपट पुढे सुरु होतो. राजा आपल्या मित्राच्या आत्महत्येने व्यथीत होतो. शासनस्तरावरील भ्रष्टाचाराचा बदला घ्यायचे तो ठरवतो.  आता तो बदला कसा घेतो ? शेतक-यांचे प्रश्न सुटतात का ? सरकारातील कृषीमंत्री (सयाजी शिंदे)  शेतक-याला न्याय देतो  काय ? या आणि अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी गोष्ट छोटी डोंगराएवढी पाह्यलाच हवी.

एक गोष्ट मात्र खरी आहे की, निळू फुल्यांना चित्रपटात फार संधी मिळालेले नाही.  संपूर्ण चित्रपटात त्यांच्या वाटेला फार कमी संवाद आले आहेत  त्यांचा हा शेवटचा चित्रपट.  अतिशय

niluphule


थकलेले निळूभाऊ पाहतांना -हदयात कालवा कालव होते.  फार कमी बोलूनही दारिद्र्यात पिचलेला शेतकरी लक्षात राहतोच. मकरंद अनासपुरे यांनी सुशिक्षित शेतक-याची भूमिका चांगली केली आहे. पण, इतर चित्रपटातून  लक्षात राहणारा मकरंद अशा चित्रपटात शोभत नाही असे वाटले. आत्महत्या करणारा शेतक-याच्या भुमिकेत असणारा नागेश भोसलेची धष्टपुष्ट तब्येत पाहता तो शेतकरी वाटत नाही. मात्र दिनवाणा, दुबळा, रडका चेहरा, तिरपी मान, याबाबतीत अभिनय चांगला केला आहे.  सयाजी शिंदे यांनी कृषीमंत्र्याची भुमिका चांगली रंगवली आहे. चित्रपटातील काही प्रसंग चांगले झालेले आहेत जसे,  शेतक-याच्या आत्महत्येनंतर विविध वाहिन्याचे वृत टीपण्यासाठीची धडपड,  शेतात मानेवर पेरणीसाठी तिफणीला बैलाबरोबर  जुंपून  घेणारा शेतकरी,  शेतक-याकडे पैसे नसतांना विविध हौसे-मौजेच्या  योजना घेऊन येणारे फायनान्सर, शासकीय कार्यालयात शेतक-यांची शोषण करणारी  शासकीय वृत्ती हे आणि काही प्रसंग चित्रपटाला एक उंची देतात.  चित्रपट पाहून सुन्न वगैरे होते का ? या प्रश्नाच्या उत्तराऐवजी शेतक-यांच्या प्रश्नाची जाण चित्रपटात अधिक वास्तवतेने येत आहे, ते नेटकेपणाने निर्माते मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, आणि दिग्दर्शक नागेश भोसले यांनी मांडले आहे. इतकाच एक  चांगला विचार  चित्रपटगृहातून बाहेर पडतांना मनात निर्माण होतो.

चित्रपट : गोष्ट छोटी डोंगराएवढी
दिग्दर्शक : नागेश भोसले
निर्माते : सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे,

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 16 मे, 2009

बालकवी

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे. आणि खेळाला पुढे न्यायचे. त्यांच्या कवितेचे कौतुक हे त्यांच्या मोठ्या बहिणीनेच केले. बालकवींच्या पहिल्या कवितेची गोष्ट अशीच आहे. त्यांच्या बहिणीच्या दिराबरोबर कवी असाच वनात गेल्यावर त्यांना वनात दिसणाऱ्या झाडांवर कविता करण्याचा मोह आवरला नाही. कटाव खेळण्याचा नादात त्यांच्या कवितेला सुरुवात झाली.

निंब, जांब, जांभूळ, शेंदरी
तुळशी बहुतची झाक मारी:
जणू काय ती येत धावुनी,
असेच वाटे पाहा साजणी,
पुढे पाहिली खैरी झाडे
जणू करिती ती हात वाकडे:

यावर त्यांचे स्नेही म्हणाले की, इथे खैरीची झाडे कुठे आहेत. तेव्हा ते म्हणतात खैरांच्या झाडांशिवाय या वनातील झाडांचे वर्णन पूर्णं होणार नाही. म्हणजे जे दिसत नव्हते. त्याचे वर्णन बालकवींनी इथे केल्याचे दिसते. याच ओळींबरोबर पुढे त्यांनी कल्पना करून-

अशा वनी मी ऐकली मुरली
तिला ऐकुनी वृत्ती मुराली
काय कथू त्या सुस्वर नादा
पुढे पाहिले रम्य मुकुंदा!

ुढे या कवितेत बर्‍याच ओळी आहेत पण पहिली कवितेची कथा अशी सांगितल्या जाते. बालकवींना आपल्या अवतीभोवतीचे सामाजिक राजकीय वास्तवतेचे भान नव्हते का? असा प्रश्न नेहमी विचारल्या जातो. बालकवी केशवसूत संप्रदायातले होते का नव्हते तो भाग सोडून देऊ. पण निसर्गसानिध्य, जातिरचना, सुनितरचना, व काव्यातील काही कल्पना यावर केशवसुतांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. केशवसुंताच्या ‘तुतारी’ वरून त्यांनी ‘धर्मवीर’ कविता लिहिली. असे म्हटल्या जाते. धर्मवीर कवितेत उसना आवेश आहे. ‘तेजाचा धर्म’ काय याची तोंडओळख तरी बालकवींना होती का असा प्रश्न विचारल्या जातो. बालकवींची कल्पनाशक्ती जे दिसते ते मांडण्यापुरतीच होतीच असे वाटायला लागते. बालकवींचे काव्य म्हणजे चांदणे, मंद वार्‍याची झुळुक, हिरवळ अशा एका मर्यादेपर्यंत त्यांची कविता फुलतांना दिसते. कवीचे निसर्गविषयक निरीक्षण आणि त्याचे वर्णन याबाबतीत जरा त्यांना मर्यादाच पडते असेही वाटते. ‘फुलराणी’ आणि ‘तारकांचे गाणे’ यात कवी अतिशय तन्मय झालेला दिसतो. पण येणार्‍या उदासीनतेवर त्यांना काय करावे हे मात्र कळत नाही असे वाटते.

‘कोठूनी येते मला कळेना
उदासिनता ही र्‍ह्दयाला
काय बोचते ते समजेना
र्‍ह्दयाच्या अंतरर्‍दयाला….

त्याची शेवटची ओळ अशी आहे.

तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला.

किंवा
‘निराशा’ कवितेत-

रात्र संपली, दिवसही गेले,
अंधपणा ये फिरुनि धरेला;
खिन्न निराशा परि र्‍दयाला- या सोडित नाही.

इथपर्यंत कवी निराशेला सहज व्यक्त करतांना दिसतो. पण जे काही आहे, ते निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त झाले पाहिजे. त्यासाठी निसर्गाचा आधार घेत निसर्ग कसा आनंददायी आहे, आणि माझ्या वाटेला हे असे का येते. त्याच्यासाठी शब्दांची गुंफन कवी करतो-

नित्यापरी रविकिरणे देती
रंग मनोहर सांध्यमुखीं ती,
खळबळ ओढा गुंगत गीती-राईतुनि वाहे.

सुंदर सगळें, मोहक सगळे,
खिन्नपणा परि मनिंचा न गळे
नुसती हुरहुर होय जिवाला- का न कळे काही.

स्वतःच्या येणाऱ्या उदासपणाला त्यांच्याकडे कोणतीही औषधी नाही. बाल्य आणि तरुणपाच्या वाटेवरील स्वप्न आणि वास्तव यांच्यातल्या द्वंदात मात्र बालकवी गोंधळून जातात असे वाटते. बालकवींनी लहानमुलांसाठीही कविता लिहिल्या त्यातील ‘चांदोबा मजला देई’ ‘रागोबा आला’ ‘माझा भाऊ, यासारख्या प्रसंगाच्या निमित्ताने काही कविता लिहिल्या आहेत. त्यांची संवादाच्या स्वरुपातील ‘चिमणीचा घरटा चोरीस गेला. ‘ ही कविता मला आवडते.

चिव चिव चिवरे! तिकडे तू कोण रे!
कावळे दादा, काव़ळे दादा, माझा घरटा नेलास बाबा?
नाही ग बाई, चिमुताई, तुझा घरटा कोन नेई.

िमणी पुढे कपिला गाईकडे जाते, कोंबडीकडे जाते आणि नंतर पोपटाकडे जाते तोच प्रश्न त्यालाही विचारते.. तेव्हा तो म्हणतो माझ्या पिंजऱ्यात ये, माझा पिंजरा छान आहे. चिमनीचे उत्तर आणि बालकवीची कल्पना इथे अतिशय भावते.

‘जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना! चिमणी उडून गेली राना.


मुक्त राहण्याची कल्पना अतिशय सुरेखपणे बालकवींनी मांडली आहे. बालकवींच्या या कविताही सुरेख असल्या तरी त्यावरही प्रभाव ‘दत्त’ कवीचा आहे. पुढे अनेक निसर्गकविता लिहिणार्‍या कवीने बालकांसाठीच्या कविता लिहिल्याच नाहीत त्याचे कारण इथेच सापडते असे वाटते. बालकवीच्या कवितांमधून निसर्गाचे वर्णन करता करता त्याच्यात रंगसंगती निर्माण करतांना आपल्याला दिसतात. बालकवींना वेगवेगळ्या रंगछटांचे खूपच आकर्षण दिसते. निसर्गवर्णन करणार्‍या कवितेत अशी रंगाची उधळण जागोजागी दिसून येते. ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे ‘ पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल’ ‘रात्र काळी, आकाश कृष्णवर्ण’ ‘फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा’ ‘लाल लाल वन दिसूं लागले’ ‘सांज खुले सोन्याहुनी पिवळें हे पडले ऊन- चोहींकडे लसलशीत बहरल्या हिरवाळी छान’ रंगाबरोबर बालकवी आपल्या लेखनीने प्रतिसृष्टी निर्माण करतांना दिसतात. निसर्गाचे नुसते रुप कवितेतून ते मांडत नाहीतर त्यात ते जीव ओततात. वेगवेगळ्या रंगछटांतून भोवतालच्या सृष्टीतील उल्हासाचा कवीला प्रत्यय येतो. रंगाच्या आकर्षणाबरोबर चित्रमय कविता उभी करणे हा बालकवींचा विशेष आहे. अनुप्रास प्रधान रचना, विशिष्ट शब्दांचा परिणाम होण्यासाठी शद्बांची द्विरुक्ती करणे हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्ये. ‘थवथवती, ‘डोलडोलती, ‘सळसळती, अशा अनेक शंब्दांचा नाद कविता वाचताना (ऐकायला येतो) दिसून येतो. त्याचबरोबर कवितेतून दुष्य डोळ्यासमोर उभे करणे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहे. ‘खेड्यातील रात्र’ ‘पारवा’ या कवितेत गंभीर निराश करणारे वातावरणाची निर्मिती दिसून येते. विविध चित्रविचित्रभावना शब्दातून व्यक्त होताना दिसतात.. ‘खेड्यातील रात्र’ कवितेत कवी म्हणतो -

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढती
वडाचा पार-अंधार दाटला तेथ भरे भरपूर..

पुढे कवितेत, भालू ओरडती, वार्‍यात भुते बडबडती,डोहात सावल्या पडती, अशा त्या खेड्यातील रात्रीचे वर्णन येते. अगदी तशीच पारवा नावाची कविता-

भिंत खचली, कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्वद्ध्स्त धर्मशाळी:
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो. (अपूर्ण कविता)

पुढे कवितेत तो पारवा मानवी व्यवहारापासून त्यांच्या दु:खापासून खूप वेगळे आहेत. आणि तो कोणते करुणगीत घुमवित आहे असा विचार कवितेत आहे. ‘ दु:खनिद्रे निद्रिस्त बुद्धराज, करुणगीते घुइमवीत जगी आज” इथे जरा वेगळी कल्पना आहे का अशी शंका डोकावते. असो, असे असले तरी बालकवींच्या कवितेवर एक आरोप केला पाहिजे की, बालकवींची कविता निसर्गदृष्याचा विपर्यास करते. अवास्तव कल्पनांची करामत त्यांच्या कवितेत दिसते. ‘ औदुंबर’ सारख्या कवितेवर कल्पनाशून्यतेचा आरोप केला जातो. ‘ ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे; शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी, पुढे पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे..इत्यादी इत्यादी. अर्थात समीक्षक अजूनही तिचा अर्थ लावतात म्हणे…! (?) वास्तव चित्र असूनही शब्दवर्णनामुळे त्या कवितेला किती श्रेष्ठ म्हणायचे (कल्पनेच्या अभावामुळे ) असा विचार डोकावतोच. तरिही तेव्हा लक्षात हे घ्यावे की, ते संपूर्ण चित्र एक प्रतिमा होऊन जाते. ‘पाऊस, श्रावणमास, मेघांचा कापूस’ या सारख्या कवितांमधून केवळ निसर्गनिरिक्षणच दिसून येते. त्यात कल्पनेला अधिक वाव नाही असे वाटते. ‘मेघांचा कापूस’ कविता मला तशीच वाटते.

फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा.
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा:
त्यातहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी:
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी.

निसर्गात रमणारा, सुंदर-सुंदर वर्णन करणारा कवी, आनंदाची पखरण करणारा कवी प्रेम कविताही करतो पण त्यालाही दु:खाची किनार दिसते. प्रीती हवी तर या कवितेत कवी म्हणतो-

प्रीती हवी तर जीव अधी कर अपुला कुरबान,
प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान!
किंवा
‘प्रीती व कर्तव’ या कवितेत कवी म्हणतो-

प्रीतीचा पथ हा भयाकुल दिसे सौंदर्य- सौदामिनी
डोळ्यांना क्षण तेज दाखवुनी या अस्तंगता हो क्षणी:
चित्तांमाजी विकारसिंधू खवळे चांचल्य जीवी भरे,
नेत्रातून उदास तेज जगती वेड्यापरी वावरे, -

‘कवीची इच्छा’ या कवितेत शेवटच्या ओळीत कवी म्हणतो-

पुरे संबंध प्रेमाचा -नको हा खेळ प्रेमाचा
खरा जो प्रीतिचा प्याला जगी प्याला, सुखी झाला…

वर उल्लेखलेल्या कवितांमधून दिसते की, कवी प्रेमाच्या बाबतीत जरा काही अंतर राखून आहे, अर्थात कवीचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यामुळे जे दु:ख वाट्याला आले तेच कवितेमधून व्यक्त होताना दिसते. प्रेम उत्कट आहे तर दुसर्‍या बाजूला ते काही अपेक्षा बाळगते. आपल्या मनातील प्रेमभावना ते निसर्गातूनच भरून काढतात. ‘अरुण’ याकवितेत दिवस हा प्रियकर तर रजनी प्रेयसी अशी कल्पना दिसून येते. ‘फुलराणी’ मध्ये फुलराणीच्या व किरणाच्या मिलनाचे वर्णन कवितेत येते. निसर्गाच्या माध्यमातून कवी आपले प्रेम व्यक्त करतो. पण ते प्रेम कोणावर आहे, याचा मात्र उलगडा होत नाही. बालकवींच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्ये हे की, शब्दांना ते एक वेगळेच रुप देतात. जसे ‘कळी’ ला ‘फुलराणी’ काजव्यांना ‘इवल्याशा दिवल्या’ म्हणतात. ‘पक्षांना’ ‘सृष्टीचे भाट’ म्हणतात. आणि मेघांना ‘गगनातले व-हाडी’ म्हणतात. बालकवींना मानवी व्यवहारातील भावना निसर्गात दिसतात. आणि भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणूनही ते निसर्गाशी एकरुप झालेले दिसतात. बालकवीच्या भाषेत अवीट गोडवा आहे. जसे चाखू तसा त्याचा गोडवा वाढत जातो. बालकवींच्या बर्‍याच कविता ह्या निसर्गविषयक आहेत. प्रेमपर, तात्त्विक, वैचारिक, असे विविध वर्गीकरण केले तरी त्यांची प्रमुख कविता ही निसर्गविषयकच आहे त्यात काही वाद नाही. कवितेमधील प्रतिमा या निसर्गविषयकच आहेत. त्यांच्या चरित्रात म्हटले आहे की, बालकवीं जेव्हा कविता करायचे तेव्हा एखादी कविता मनाजोगती उतरली नाही की, त्या कागदाचा चुरगाळा करून टाकायचे किंवा फाडून तरी टाकायचे. किंवा पुन्हा-पुन्हा लिहून काढायचे. त्यांच्या अशा कितीतरी कविता अपूर्ण आहेत. असे असले तरी निसर्गाशी एकरुप झाल्यामुळे त्या र्‍हदयस्पर्शी उतरतात. बालकवी जात्याच सौंदर्यवादी होते. सृष्टीतील चैतन्यावर त्यांचे प्रेम दिसून येते म्हणून तर ते म्हणतात-

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

बालकवी प्रसन्न वृत्तीचे तसे ते बालवृत्तीचे(च)आहेत. कधी-कधी खूप निराशही होतात. अर्थात त्यांचा बालस्वभाव हा बऱ्याचदा आडवा यायचा त्याबद्दल अनेकांनी तसे लिहिले आहेच. पण त्यांची निसर्गविषयक मराठी कविता कशी अजरामर झाली तिचे कारण प्रत्येकाला कवितेत वेगवेगळ्या अर्थांचे (प्रतिभेचे/ प्रतिमेच) पदर सापडतील. मला अजूनही त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या आनंदी-आनंद, अरुण, निर्झरास, संध्यारजनी, फुलराणी, तारकांचे गाणे, श्रावणमास, औदुंबर, खेड्यातील रात्र; पारवा,या कविता दरवेळेस वाचताना एक नवीन आनंद देतात. तेव्हा त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद घेतला तरी तो अपूर्णच वाटतो. मात्र शब्दांच्या साह्याने चित्र निर्माण करणारा एखादाच कवी जन्माला येतो. अनेक मोठ-मोठ्या कवींचा सहवास लाभलेला हा कवी आयुष्याच्या अठ्ठावीस वर्षात दिडेकशे कविता (पूर्ण-अपूर्ण) विविध विषयांवरच्या लिहितात. गद्यलेखनही भरपूर करतात. तेव्हा बालकवी एक सृष्टीतला चमत्कारच होता असे म्हणून त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद (सकारात्मक/ नकारात्मक) घेतला तरी तो कमीच पडतो असे म्हणून थांबावेसे वाटते.

संदर्भ : लेखनासाठी कविता ‘समग्र बालकवी’ संपादिका श्रीमती पार्वताबाई ठोमरे ; व्हीनस प्रकाशन पुणे (आवृत्ती पहिली सप्टेंबर १९६६) यातून घेतले आहेत. [चरित्राविषयक माहिती आणि लेखनावरील काही प्रभाव त्यातलाच आहे]

-अपूर्ण

टीपः मला बालकवींच्या कवीतेबद्दल जे वाटले ते लिहिलेच आहे. तरिही,बालकवींच्या कवीतेवर आस्वादत्मक किंवा इतर पैलुंवर प्रकाश टाकणार्‍या, लेखात भर घालणार्‍या प्रतिसादांचेही स्वागत आहे.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 29 मार्च, 2009

वेदना


आवंढ्यासारखी गिळता येत नाही
भळभळणारी कविता
मुक्यामुक्यानं जगावं
अशी नाही एकही जागा

जालावर येतो जरासे
सुखाचे क्षण मिळावेत म्हणून,

तर इथेही दोस्ताच्या कथेत
लहानग्या लेकराला त्याची माय
कपाटात कोंडून ठेवते.
अन बोटे कुरतडतात त्याची ,उंदीर


माझ्या स्वतःच्याच वेगळ्या चिंता असतांना,
उगाच चिंता करतो..याची,त्याची.
अन, संस्कृतीच्या नावाने बोंबलतही बसतो.


खरं तर या अशाच वेदनांवर
एखादा प्रोजेक्ट केला असता,
पण आजकाल टीचभर कविताही
दमवू लागल्यात साल्या.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 20 फेब्रुवारी, 2009

एक संवाद !

सर, नमस्कार ! ओळखलं का ?

असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो.

आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले.

पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते!

सर, तुमच्या लक्षात कसे राहील? किती तरी विद्यार्थ्यात एक चेहरा लक्षात ठेवायचा, म्हणजे जरा अवघड काम आहे.

खरं तर दोन तीन वर्षाच्या सहवासात विद्यार्थी लक्षात राहतो. पण याला प्रयत्न करुनही मला आठवता येईना.कोणत्या वर्गाचा असेल.कोणत्या वर्षी शिकला असेल. खूप स्वत:ला ताण देऊन पाहिला पण काही जमेना.


सर, ही माझी पत्नी !(एकमेकांना नमस्कार झाला)
नुकतीच डीएड झाली आहे. एका विनाअनुदानित शाळेत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करतेय.


पगार नियमित होतो का ?

सर,पगार दिल्यानंतर अर्धा पगार पुन्हा संस्थेला द्यावा लागतो.

अरेरे ! मग दुसरीकडे प्रयत्न करायचा. सध्या डीएड झालेले आणि पोलिसांत भरती होणा-यांना शासकीय नोक-यांची काही कमी नाही.


तसेही,विनाअनुदानित शाळेत नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान टाकलेलं बरं ! असा एक विचार मी मनातल्या मनात गिळला.


तुम्ही काय करता ?..मी त्या तरुणाला विचारलं


सर, मी एमए.झालोय, इतिहास विषयात. नेट-सेटची प्राध्यापकाची पात्रता परिक्षा देत आहे. आतापर्यंत दोनदा परिक्षा दिली,
पण पास काही होईना. माझ्या मागचे, पुढचे,बाजूचे पास होतात. पण माझ्याच बाबतीत दुर्दैव आडवं येतंय !


अरे,नेट-सेट्चा अभ्यासक्रम तसा अवघड आहे. काही विषयात तर शुन्य टक्के निकाल आहे. तेव्हा प्रयत्न करत राहावे.


प्रयत्न तर चालूच आहेत सर ! गावाकडची शेती विकून बीएडला डोनेशन देऊन प्रवेश घेतला.
वर्षभर हमालासारखे राबराब राबलो,स्कॉलरशिप संस्थाचालकांनी ढापली.


हं ! शिक्षण संस्था चालकांनी काही ठिकाणी बाजार मांडला आहे.पण परिस्थिती बदलेल असा विचार केला पाहिजे.


कशाची परिस्थिती बदलते सर, माझेच पहा. शिक्षणासाठी शेती विकली. अभ्यासही केला.
बीएडची परिक्षा देत होतो, तर..


तर काय ?

ज्या परिक्षा केंद्रावर परिक्षा देत होतो, त्या बीएडच्या एका पेपरला जरा एका मुद्यावर अडलो.
खिशातून काही चिठ्ठ्या काढायला आणि आपण माझी कॉपी पकडायला एकच वेळ झाला.


अरेरे !पण कॉपी करायची नाही ना !


खरंय सर, पण पन्नास टक्के विद्यार्थी कॉप्या करुन पास होतात..तीस टक्के मुले कॉप्या घेऊन येतात पण त्यांच्यात कॉप्या काढायची हिम्मत होत नाही. वीस टक्के मुले अभ्यास करुन लिहितात.


तुम्ही कोणत्या कॅटेगीरीत येता ?.. मी मिश्कीलपणे म्हणालो.


सर, मी तीस टक्क्यामधे येतो. आपण माझी कॉपी पकडली आणि माझे सर्व विषयांचे गुण रद्द करण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली आणि माझ्या एका महत्वाच्या वर्षाबरोबर माझे सर्व भविष्याचे स्वप्न हवेत विरुन गेले.


ते कसं काय बॉ?


बीएड झाल्याबरोबर मला ज्युनियर कॉलेजमधे नोकरी लागणार होती. नातेवाईकाच्या एका संस्थेत चार लाख रुपये भरले होते. पदाची जाहिरात दिलेली असल्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार घेतला आणि माझे पैसे..त्यांच्याकडेच राहिले.


अरे, मिळतील ना पैसे. नातेवाईक आहेत म्हटल्यावर तुझे पैसे कुठे जाणार?


संस्थाचालक पैसे परत देत आहेत. पण दहा हजार, वीस हजार, असे करुन देत आहेत. तेही तगादा केल्यावर .


काय करावे या संस्थाचालकांचे काही कळत नाही…. मी


सर, माझं तुमच्याकडं फारसं मागणं नाही. असाच प्रसंग भविष्यात कोणाबरोबर घडला तर त्याला त्याची परिस्थिती विचारा,आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचा प्रामाणिकपणा पडताळून पाहा.आणि जमल्यास त्याला माफ करा.
माझ्यासारखा एखादा तग धरतो,पण एखादा आयुष्यातून उठून जाईल.पाहा जमलेच तर….


इथे त्याचे डोळे भरतील असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. कोणत्या आत्मविश्वासाने तो असा बोलत होता. मला कळलेच नाही. आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हते. मी काय बोलावे असा विचार करत होतो, तेवढ्यात त्याची एसटी आली. त्यांची धावपळ सुरु झाली. तरी तो बोलत होता


सर, पुन्हा परिक्षेला येणार आहे. तुमच्या शुभेच्छांबरोबर, जमलेच तर मला थेट मदत करा.
असे म्हणून तो माझ्यासमोरुन बसमधे बसण्यासाठी निघूनही गेला.


मी मात्र जागच्या जागी थिजून गेलो होतो. इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 21 डिसेंबर, 2008

गांधीवाद आणि मराठी साहित्य

        भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती. त्यांचे तत्वज्नान सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह,ब्रम्हाचर्य, शरीरश्रम, स्वदेशी, जीभेवरील नियंत्रण, सर्वधर्म समभाव, अस्पुश्यता न मानने ही त्यांची मुल्य होती. या नितीमुल्यांनाच गांधीवाद असे म्हटल्या जात असावे. गांधीविचारांचा प्रभाव येथील समाजमनावर पडला होता त्यांच्या विचाराने भारल्यामुळे अनेक तरुण गांधीजींच्या लढ्यात उतरले आणि साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटल्या जाते, त्यामुळे या सर्व परिस्थितीचे चित्रण मराठी साहित्याने टीपले आहे.

         १९२० ते ११९५० हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. १९३० ला गांधीजींनी खेड्याकडे चला ही हाक दिली आणि त्याच काळात मराठी कवींनी त्याकाळात मोठ्या प्रमाणात जानपद गीतांची रचना करुन गांधीजींच्या हाकेला ओ दिली होती.

         गांधीवादाचा फार मोठा प्रभाव वा. म. जोशींवर होता. ते स्वत: गांधीजींच्या राजकीय चळवळीत उतरले होते. त्याकरिता त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. ‘ सुशिलेचा देव’ या कादंबरीत विश्वकुटुंबवादाबरोबर समाजवादाचाही पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही वाद व्यक्तिविकासाला घातक आहेत अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘इंदू काळे व सरला भोळे’ या त्यांच्या कादंबरीत त्यांनी गांधीवादाचा बुद्धीप्रामाण्यवादी परामर्श घेतलेला आहे. यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत. गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कादंबरीत गांधीवाद व्यावहारिक वाटत नाही, असा विचार मांडलेला दिसतो.

        ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या ‘कांचनमृग’ पासून ते ‘ययाती’ पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात. साने गुरुजींनी ‘शामची आई, धडपडणारी मुले या आणि अशा अनेक कादंब-या लिहून आपली गांधीविचारावरील निष्ठाच प्रकट केली. स्वातंत्र्याची चळवळ, स्वार्थत्याग,बंधुभाव, समत्व, करुणा, इत्यादींचे चित्रण साने गुरुजींनी आपल्या हळुवार शैलीने केले आहे. ‘शामची आई’ या त्यांच्या एकाच कादंबरीने अमाप लोकप्रियता मिळवली. संस्कारहीन अशा नव्या समाजरचनेत सुसंस्काराचे हे उदात्त व करुण चित्र वाचकांना आवडले. त्यांच्या कादंबर्‍यांनी ध्येयवादाची जोपासना केली. त्यांचे भाबडे मन त्यांचा आशावाद त्यांची कमालीची हळुवार वृत्ती यांचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. असे असले तरी त्यांच्याबद्दल असे म्हटल्या जात होते की, त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो.

        ना. सी. फडके यांनी आपल्या काही कादंब-यामधुन गांधीजींनी उभारलेल्या चळवळीचा उल्लेख केला ज्यात प्रवासी, उन्माद, समरभूमी, यांचा उल्लेख करता येईल. पण त्यांनी गांधीवादाचा पुरस्कार केला नाही. उलट गांधीविचारांवर टीकाच केली. असे समीक्षकांचे म्हणने आहे.

          मराठी कादंबरीत गांधीवाद न रुजण्याचे एक कारण सांगितल्या जाते की, मराठीमधे लिहिणारे जे लेखक होते ते सर्व एका विशिष्ट वर्गाचे होते आणि त्या वर्गाचा ओढा गांधीवादाकडे नव्हता. विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी यांनी मात्र गांधीवादाचा पुरस्कार करुन आपले जीवनच त्यासाठी वेचले.

        कवितेमधे भा. रा. तांबे यांनी गांधीविचाराने प्रभावित होऊन काही कविता लिहिल्या जशा की
‘रुद्रास आवाहान’ ही त्यांची जलियनवाला बाग हत्याकांडाची धिक्कार करणारी कविता. तर ‘गाडी बदलली’ या कवितेतुन अहिंसा तत्त्वज्ञानाचा पुरस्कारच केला आहे.
‘ कोण रोधील’
या कवितेतून तांबे यांनी गांधीजींना आणि त्यांच्या अनुयायांना राष्ट्रनिर्माते म्हटलेले आहे.

      कुंजबिहारी यांची -

‘भेटेन नऊ महिन्यांनी’
मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी
या न्यायाची रीत मानवी नसते
खरी ठरते केव्हा चुकते…

        ही कविता खूपच गाजली होती. माधव ज्युलीयन, यशवंत  यांच्याही कवितेतून राष्ट्रीय वृत्ती आणि अहिंसेचा पुरस्कारच त्यांच्या विचारातूनच येतांना दिसतो. विठ्ठलराव घाटॆंची ”तो पाहा महात्मा आला” गांधीजींच्या दांडीयात्रेवरही काही कविता लिहिल्या गेल्या त्यात आनंदराव टेकाडे यांची ‘रणसंग्राम’ विशेष मानली जाते. माधव ज्युलीयन यांनी ‘महात्मा गांधी आणि टागोर’ ‘महात्मा काय करील एकटा’ अशा मोजक्याच पण सुंदर कविता लिहिल्या. कुसुमाग्रजांच्या, एक मागणे, खादी गीता, धृतराष्ट्र, या गांधीविचारावरील कविता समजल्या जातात. बा.भ. बोरकरांचे ‘महात्मायन’ असे प्रदीर्घ महाकाव्य लिहिण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही.

         डॉ. वि.भि. कोलते, राजा मंगळवेढेकर, सोपानदेव चौधरी, ग.ह. पाटील, ग.दि.माडगूळकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सेनापती बापट, इत्यादीनी गांधीजी व गांधिवादावर अनेक कविता लिहिल्या. आजही कवितेतून बर्‍याचदा गांधीजींवर कविता लिहिणारी कवी मंडळी दिसते…पण लिहिते ते उपाहासातून…टीका करण्याच्या उद्देशातून किंवा खरेच बापू तुमच्या विचारांची गरज आहे असाही एक विचार कवितेत दिसतो ‘ बापु तुमच्या देशात, बापू, महात्मा, अशा शिर्षकाच्या अनेक कविता दिसतात कधी त्यांच्यावर टीका तर कधी त्यांच्या विचारांचे मोठेपण दाखविल्या जाते.

        नामदेव ढसाळ ‘ मुर्ख म्हातार्‍याने’ या कवितेत म्हणतात…

”अहिंसावादी शासन झाले आहे हिंसेची देवता
गावांची बनवली जातायत मैदाने
आयाबहिणींच्या इंद्रियांचे तोडले जातायत लचके
उपटले जातायत अंकुर अदिवाशांच्या
देवदत्त शेतातून
दमन यंत्रणेच्या जात्याखाली भरडले जाताहेत जनतेचे सैनिक”

       १९३० ते १९४० याकाळात गांधी यांची थोरवी व स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती गाणारे अनेक कवी निर्माण झाले, मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांच्या काव्यकृतीही नष्ट झाल्या. कारण त्यांच्या काव्यात मूलभूत काव्यगुणच नव्हते असे म्हटल्या जाते त्याच बरोबर अनेक कवी, लेखकांना त्यांचे तत्वज्ञान मान्य नव्हते पण त्यांचा मोठेपण मान्य . स्वातंत्र्य लढ्याचे एक निर्भीड सेनानी म्हणून त्यांच्याविषयीचा तो आदर होता, तोच आदर कविता, कादंबर्‍यातून व्यक्त झाला आहे.

        सारांश, मराठी कादंबरी आणि मराठी कविता यावर गांधीवादाचा फार थोडा प्रभाव दिसतो. नाट्यक्षेत्रात तो प्रभाव नगण्यच असावा. एकुण काय मराठी साहित्याने गांधीवादाचा पुरस्कार जरा हात राखुन केलेला दिसतो असे म्हणन्यास हरकत नसावी.

टीप : अनेक लेखक कवी, यांच्या लेखनातून गांधीवाद व्यक्त झाला आहे, त्यांची नोंद घेणे राहून गेले आहे. अजूनही नव्याने साहित्यातून व्यक्त होणार्‍या गांधीविचारांवर नव्याने भर घालणार्‍या मतांचे स्वागत आहे.
सदरील लेख मिसळपाव संस्थळावर पूर्वप्रकाशित.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 25 ऑक्टोबर , 2008

स्वाध्यायींचा ‘मनुष्य गौरव दिन’

      पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही. कधी तरी    ‘जय-योगेश्वर’  म्हणुन कोणी तरी स्वाध्यायी आपल्याला भेटलाच असेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आणि तत्वज्ञ अशी ज्यांची

पांडुरंगशास्त्री आठवले.
                पांडुरंग शास्त्री आठवले

ओळख ते पांडुरंग शास्त्री आठवले यांना . रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, गांधी पुरस्कार, टिळक पुरस्कार, पद्मभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी परिवार जगभर मनुष्य गौरवदिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या कार्याची धावती ओळख करुन देण्याचा हा एक प्रयत्न.

     पांडुरंग शास्त्री आठवलेंसारखी माणसे समाजाचे नुसते भुषण नसतात त्यांच्या सारख्यांच्या कार्यामुळे समाजाला एक आगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्यामुळेच समाजात आशेचा किरण दिसतो, आणि म्हणुनच स्वाध्यायाची ध्वजा लाखो स्वाध्यायी परिवार देश-विदेशात मिरवतांना दिसतात.

 

        पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० ला रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणुन साजरा करतात. पारंपारिक शिक्षणाबरोबर ‘सरस्वती संस्कृत पाठशाळेत’ संस्कृतच्या व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडूरंग शास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतेल प्रमुख लेखकांचे, प्रसिद्ध ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे,स्मृती, पुराणे यावर चिंतन केले.श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते, व्यापारी, मालक, मजूर, कारागीर, कलाकार, कर्मचारी, कोट्याधीश, विद्यार्थी शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, अर्थतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विद्वान, अज्ञानी, तरुण, वृद्ध , स्त्रिया, पुरुष आपापले प्रापंचीक झगे बाजूला ठेवून मांडीला-मांडी लावून भावपूर्ण अभिवादन करुन एकमेकांना भेटत असतात.

         स्वाध्याय’ हा पंथ नाही, पक्ष नाही, गट नाही, संप्रदाय नाही किंवा धर्म नाही. ‘स्वाध्याय’ ही एक संस्थादेखील नाही.
मग स्वाध्याय आहे तरी आहे काय ?
स्वाध्याय’ ही एक प्रवृत्ती आहे; चळवळ किंवा आंदोलन नाही. वृत्तीला मुख्य श्रेष्ठ बनवते आणि मनुष्याला श्रेष्ठाचा भगवंताचा बनवते, तिचे नाव प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे प्रभूचे काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म व संस्कृती समजावणारा खरा दृष्टीकोण.‘स्वाध्याय’ म्हणजे समजूतदारपणा. स्वाध्याय म्हणजे विवेक. स्वाध्याय म्हणजे ध्येय-आदरनिष्ठा. स्वाध्याय म्हणजे जीवन निष्ठा. स्वाध्याय म्हणजे कर्तव्यपरायणता. स्वाध्याय म्हणजे प्रभुप्रेम . स्वाध्याय म्हणजे ‘स्व’ चा अभ्यास ‘स्व’ म्हणजे शरिरात असलेले चैतन्यतत्त्व, त्याला चिकटलेला अहम व इच्छा. ‘स्वतःचा ‘स्व’ ओळखणे, दुस-याच्या ‘स्व’ बद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे ‘स्वाध्याय’१

            कोणत्याही प्रक्रारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता स्वाध्यायाचे कार्य चालते. स्वाध्यायाच्या कार्यासाठी पांडुरंगशास्त्रींनी१) ऐकणे २) भेटणे ३) विचार करणे आणि ४) सोडणे या चतु:सूत्रीची बैठक तयार केली. यच्चयावत मानवमात्राचा आत्मविकास साधण्याचा ध्येयातून स्वाध्याची निर्मिती झाली आहे. जीवनातील श्रेष्ठतम संबंध जो प्रभू-प्रेम त्याची प्राप्ती करण्याचे ध्येय समोर ठेवून स्वाध्याची पायाभरणी केली. आपल्या प्रवचनाद्वारे त्यांनी एका विचारसरणीचा श्रोतावर्ग तयार केला. तो श्रोतावर्ग जाणतो की साधुत्वाची निर्मिती झाल्याशिवाय आत्मविकास साधणार नाही. ‘ वसुधैव कुटुंबक’ ची वृत्तीची जोपासणा करण्याचा प्रयत्न त्यांचा विचार करतो. कोणत्याही लाभाशिवाय आठवड्यातून एकदा भेटणे.विकासाच्या बाबतीत जे काही ऐकायचे असेल त्याचा विचार करायचा. स्वाध्यायात बसल्यावर व्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्थान विसरुन जायचे त्यामुळे सर्व एका पित्याची लेकरे आहोत ही भावना वाढीस लागते.
 
      स्वाध्याय करुन काय फायदा काय ? असा प्रश्न विचारला जाणे शक्य आहे.       
         स्वाध्यायाच्या दिव्य दृष्टीकोणातून क्षणभंगूर नश्वर असा कोणताही फायदा स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्याने सर्वांना आशा, स्फूर्ती, व धैर्य मिळते. स्वतःचा जीवन विकास होईलच असा दृढ आशावाद निर्माण होत. ‘ सुखदु:खे समे कृत्वा…” या गीता मंत्राद्वारे स्वाध्यायींना सतत स्फुर्ती मिळते. ‘केलेले फुकट जात नाही ‘ हा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांचे अखंड धैर्य अधिकच वाढते.स्वाध्याय काय करतो; १)स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो. २) स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो. ३) स्वाध्याय मानवा-मानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय किंवा पंथ यांना महत्त्व न देता, सर्व एकाच पित्याची लेकरे आहेत आणि आपल्या रक्ताच्या संबधापेक्षा उच्च असा रक्त बनवणराचा संबंध आहे याचा अनुभव आणून देतो जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन नाही, अस्पृश्य नाही् हे समजावते. ४) स्वाध्याय माणसामधे कार्यात्सोव वाढवितो. स्वाध्यायी माणूस एकांताता चित्त एकाग्र करुन भक्तीद्वारे आंतरिक विकास साधतो आणि समूहात पिरुन कर्मयोग करुन बहिर्भक्तिद्वारे स्वतःचा जीवन विकास साधतो. ५) स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देते.भक्ती ही केवळ कृती नाही तर ती एक वृत्ती आहे. याची जाणीव स्वाध्यायाने येते. ६) स्वाध्याय ऐक्य भावना दृढ करतो, सर्व स्वाध्यायी एकाच परिवारातील समजतो आमचे एक दैवी कुटूंब आहे.      
          त्याचबरोबर स्वाध्यायाद्वारे येणारी गुण-संपत्ती कोणती. १) कृतज्ञता: कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाची प्रेमाची कदर करणे म्हणजे व त्यासाठी काही तरी करीत राहण्याची वृती म्हणजे कृतज्ञता. भगवंताबद्दल, संस्कृतीबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कुटूंब, समाज आणि राष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मानवाचे कर्तव्य आहे.२) अस्मिता : मी आहे याचे भान असले पाहिजे. मी करु शकतो,बनू शकतो, बनवू शकतो, बदलवू शकतो, उभे करु शकतो,प्राप्त करु शकतो, यावृत्तीचे भान म्हणजे अस्मिता. मी मोठा आहे, तसाच दुसराही लहान नाही. तुच्छ नाही याचे नाव अस्मिता.३)तेजिस्विता: जो बापूडा नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही आणि बिचारा राहात नाही तो खरा तेजस्वी.
४)भावपूर्णता: मानवजीवनाचा दोन तृतीयांश भाग भावाने भरले आहे. एक तृतीयांश भाग भोगाचा आहे. ‘भावपूर्णता’ हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीव समृद्ध करणे आणि दुस-याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे.
५) समर्पण : सुगंधी बनलेले जीवन प्रभुचरणी समर्पण करणे.           
       स्वाध्यायाचे फलीत म्हणजे स्वयंशासित , प्रभुप्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थप्रिय, शास्त्रविचार जाणणारा, संस्कृतीप्रेमी, जीवन लाभलेला समाज स्वाध्यायींना तयार करायचा आहे. जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सभ्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा सत्त्वाला. तर्कापेक्षा तत्त्वाला, आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज स्वाध्यायींना बनवायचा आहे.  

             १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते ” विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण् आहेत ”

             आयुष्यच बदलून गेले असे सांगणारे अगदी ,माळी,अदिवासी,उच्चविद्याविभुषीत, अशिक्षीत, कितीतरी विविध जातीजमातींची माणसे बंधुभावाने या परिवारात दिसतील, ते या परिवाराचे मोठे यश मानले पाहिजे. २स्वाध्यायी परिवाराचे विविध प्रयोग आहेत. तत्त्वज्ञान विद्यापीठातून (ठाणे) पारंपारिक शिक्षणाबरोबर संस्कृती, वेदांचा अभ्यास याचे शिक्षण इथे दिले जाते. मत्स्यगंधा प्रयोग, योगेश्वर कृषी, अमृतालयम, भक्तीफेरी, बालसंस्कार केंद्र, युवा केंद्र, भगिणी केंद्र, प्रवचन केंद्र, अशा विविध प्रयोगांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे कार्य चालते. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २००३ मधे वयाच्या ८४ वर्षी निधन झाल्यानंतर स्वाध्यायींचे कार्य (मानस कन्या ) धनश्री तळवळकर (दीदी) स्वाध्यायींबरोबर अहोरात्र पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराला,कार्याला घरा-घरात घेऊन जात आहे, आणि त्यांच्या कार्याला वैश्विक बनवत आहेत. त्यांच्या कार्याला स्वाध्यायी प्रेमी म्हणून आम्हीही वंदन करतो.

संदर्भ : १. एष पन्था एतत्कर्म : पृ. क्र. ६ प्रकाशक : सद्विचार दर्शन निर्मल निकेतन, २ डॉ. भाजेकर लेन, मुंबई.
(पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनावरुन संपादित केलेली मराठी भाषेत पन्नास किंवा अधिक पुस्तके आहेत. 
संदर्भ २. शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले : पृ.क्र. ३.शेषराव मोरे, सुगावा प्रकाशन, ५६२ सदाशिव पेठ, चित्रशाळा बिल्डिंग पुणे.
३)पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारीत सुंदर कादंबरी : देह झाला चंदनाचा : लेखक राजेंद्र खेर, विहंग प्रकाशन, पुणे.
४) लोकसत्तात त्यांच्या कार्याविषयीचा एक सुंदर लेख ‘तव चाहा परिणाम होगा दादाजी ‘

सदरील लेख पुर्वी उपक्रम या मराठी सकेतसंस्थळावर लिहिला आहे.

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 22 सप्टेंबर, 2008

गुलमोहर

गुलमोहर

Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 23 जुलै, 2008

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

       आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता…वाचता…….कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ….दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे. बाजरी, मका, मुग, कापूस, तूर, यांची पेरणी झालेली असली की दोन पानांची रोपं पांडुरंगासारखी कर कटेवर ठेवून डोलत असतात. पण यंदा वारक-याला दर्शन करुन आला तरी त्याची नजर आभाळाकडेच. शेतक-याने खरिपाच्या पिकाची आशा सोडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन तरी पाऊस यावा इतकीच अपेक्षा उरली आहे. खरे तर य काळात रानं हिरवीगार झालेली असतात. डोंगरद-यातून खळखळत वाहणारे पाणी, गावा-गावातील अध्यात्मिक वातावरण आणि येणा-या सनासुदींमुळे वातावरण भारलेले असते. आणि आम्हाला पावसाच्या कवितेची आठवण होते, बहिणाबाई म्हणतात…

 

 

                           आला पह्यला पाऊस
                                शिपडली भुई सारी
                           धरत्रीची परमय
                                माझं मन गेलं भरी 

                           आला पाऊस पाऊस
                                आता सरीवर सरी
                            शेतं शिवारं भिजले
                                नदी नाले गेले भरी….!!!

बहिणाबाईच्या कवितेतला पाऊस असा भरपूर कोसळणारा. धरित्रीचं मन ओला करणारा असा पाऊस, शिवार गच्च करणारा पाऊस, नदी नाले तुडूंब भरणारा पाऊस. पण यंदा काही त्याचे लक्षणे नीट दिसत नाही. जमीन आणि आकाशाची भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. दोघांच्या भेटीने दरवळणा-या मृदगंधाने प्रत्येकाच्या आनंदाला उधान येतं. मात्र दुष्काळामुळे भूईचेच दु:ख पेटले आहे. ते कोणीतरी विझवायला पाहिजे अशी हाक कवितेतून येत आहे. एक अज्ञात कवी म्हणतो.

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे

           

          ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार  आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, ‘आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश….हे सारं स्वप्नवत वाटत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजचे पैसे, खतासाठी, बियाणांसाठी, दिले याचा विसर होऊन शेतकरी अवांतर खर्च करतोय, नवी कोरी टू-व्हीलर, घेऊन मोबाईलवर हॅलो, हॅलो, करतोय. आणि न पुरणारे पैसे संपल्यावर पुन्हा तेच दु:ख. पाण्याच्या शोधात किडे-किरकुडे शहराकडे येताहेत, रानात चारा नसल्यामुळे जणावरांचे हाल पाहवत नाही. भविष्याच्या चिंतेने मुक्या धनाला बाजाराच्या दावणीला बांधले जात आहेत.
ना.धो. महानोर म्हणतात-

पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे, वाळलेली शुष्क पाने.
दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी.

     

 पांगलेल्या पावसाने मोडकी फांदी, वाळली पाने, दूर गेलेल्या पायवाटा आणि दु़ख; पुजलेलेच. जिथे पाण्यासाठी उन्हाला व्याकूळ होण्याची वेळ आली तिथे जीवाचे काय हाल. पावसाअभावी जीव भीतीने कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.
पाऊस आलाच नाही तर…….पक्षांचे थवे मरणाचा निरोप देत इतरत्र जातील. घरातील कर्ता माणूस कुठे निघून जाईल त्याची भीती कुटूंबाला लागून राहीली आहे. आणि असा विचार करता करता माय माऊलीच्या डोळ्यांचा कडा ओलावतात. पक्षी नुसते हिरमुसले होऊन वाळलेल्या पानांकडे पाहत आहेत.सुस्तावलेल्या झाडाला ओल नाही. आणि शेतक-याच्या दुखःला कुठेच तळ नाही. पावसाचा गार झोंबणारा असा गारवा नाही. कुठे बगळ्यांचा थवा शेतात नाही. आणि पुन्हा पहिल्या पावसाची आठवण होते. मंगेश पाडगावकर म्हणतात….

पहिला पाऊस येतो आधी
आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यांवर
बाजूला मी उभा भिजत,
     माझा मलमलाचा इवलासा सदरा ओलाचिंब. 
         
               झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या            
                 पहिल्या पावसात पानांनी शहारत             
      उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.

         

         आपल्यालाही आठवत जातात पहिल्या पावसात ओलेचिंब झालेले आपण. घरात झटकून धुळ झटकावून काढलेल्या छत्र्या, रेनकोट, आणि आपल्याला आठवतात गोणपाटाचा केलेला रेनकोट. पोत्याचा कोपरा मुडपून भिजत चाललेले आजोबा. चिंब झालेले रान. यातले आता काहीच नसते. सा-या वाटा, वळणं मागे टाकून आयुष्य असं कधी उजाड माळरानावर येऊन विचार करायला लावते. पाणी ग्लासात ओतून प्यायला द्यावे, तसे रोपट्यांना ग्लासाने पाणी ओतणा-या स्त्रीयांना पाहिलं की आमच्या -दयात कालवाकालव होते. तेव्हा सोबतीला केवळ भन्नाट वारा असतो. पाण्यासाठी हरवलेल्या दाही दिशा, आणि डोळ्यात पूर, तेव्हा काय करावे काहीच समजत नाही. पावसळ्यात मस्त भटकंती करुन यावे असा विचार पक्का झालेला असतो…..पावसाळी दिवसात कुठे तरी घाटात भटकून यावे, प्रवास व्हावा, सुरेल पावसाच्या धारेत आपला सुर मिसळून आपल्याच गाण्यावर खू्श व्हावे. आणि पुन्हा एकदा बालकवीची कविता वाचायला हवी असा विचार तरळून जातो. विंदा म्हणतात….

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

          

       असाही एक विचार मनात डोकावतोच….तक्रार करावी तर कोणाकडे करावी. दरवळणारा मातीचा सुवास येत नाही. माणसाला माणूसपण देणार्‍या मातीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी ढेकळं अजून विरघळली नाहीत. शेती जीवनाला आकार देणारा पाऊस पडावा यासाठी परमेश्वराची आठवण होत आहे. सर्व भेदाभेद दूर होऊन. धोंडी-धोंडी पाणी दे असा आवाज गावात घुमतोय. निसर्ग हाच देव त्याच्या भेटीची ओढ तीव्र होत आहे, बहिणाबाई म्हणताहेत……..
         

                      येता पाऊस पाऊस
                             पावसाची लागे झडी
                      आता खा रे वडे भजे
                           घरांमधी बसा दडी  
                    देवा, पाऊस पाऊस
                             तुझ्या डोयातले आंस
                     दैवा, तुझा रे हारास
                            जीवा, तुझी रे मिरास.      

 

        आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे……मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, आणि पावसाच्या गदारोळात तिच्या डोळ्यातील पावसाला मात्र थांबू दे. तरीही राहून राहून ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होतेच.

आभाळ भरुन येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही.
नक्षत्रामागून नक्षत्र सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही.
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो.
जुन्या आठवणी स्मरून.

        

        पुर्वीसारखा पाऊस पडत नाही, ही अनेकांची त्रक्रार असते. कधी मुसळधार पावसानं गावच्या गावं पाण्याखाली जातात, तर कधी पावसाचा टीपूस नाही. जीव मेटाकुटीला आणणा-या निसर्गाच्या लहरीपुढे माणूस हतबल झाला आहे. रोहिण्या बरसल्या की मृगाच्या सरी बरसतात. त्यावर एकदा पेरण्या झाल्या की शेतक-याच्या चेह-यावरील आनंद लपत नाही. पण यंदा रोहिण्या बरसल्या नाही. मृगानं दगा दिला. आर्द्रा कोरडाच आहे. जीथं थेंबा-थेंबी झाली तिथं केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

गुज बोले गुज बोले
गुज मिरोग बोलला
तेलपाणी लावा काव
आता तिफन उचला

          

      इंद्रजीत भालेरावांची पावसापुर्वीची कविता. तिफण उचलली, पेरणी झाली, वाफधावन झाली, पावसाच्या सुकाळात गवत, धान, तरारुन आलेलं आहे. मग पाखरं राखायचेत, चोर राखायचेत, शाळेतला ‘सुगीचे दिवस’ नावाचा धडा आठवायचा. सुगीची कामं दिवस रात्र करुन उरकायची, मळणी, उधळणी, खळं मागायचं, आणि सर्वा उचलत उचलत पुढल्या वर्षीचा हिशोब डोळ्यासमोरुन सरकत जाईल………पुन्हा पावसाच्या वाटेकडे डोळे लावायचे.

 

 

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग