नमस्कार, संक्रात उद्यावर आलीय. बायकांची संक्रातीची तयारी झाली आहे. घरात हलवा करण्याची पध्दत केव्हाच संपली आहे. तीळगुळाच्या वड्या, लाडू, साडी किंवा पंजाबी ड्रेस घेवून झालंय. हळदी कुंकवाला कोणती वस्तु भेट द्यायची हे सुद्धा ठरुन झाले असेल………………!!
पण, संक्रातीचे एक वैशिष्टे आहे ती आल्यावर दरवर्षी वेगवेगळ्या अफवा घेऊन येते. संक्रातीबरोबर हे केव्हा सुरु झाले ते मात्र आम्हाला कळत नाही !!! यंदाची संक्रात लाल कपडे घालून आलीय….त्यामुळे लाल काहीही वापरायचे नाही. अशी एक अफवा आहे, त्याचबरोबर कधी जावई असलेल्या सासूने जावयाकडून हिरवी साडी घ्यावी, कधी जावयाला शर्ट-पॆंट घ्यावा लागतो, कधी तीळगुळ आन नंदेला बांगड्या भराव्या लागतात, मामीनं भाच्याकडे गोडधोड खावं ! ( अशा बातम्या कळल्या की आम्हाला हसुन-हसुन वेड लागायची वेळ येते. )
यंदाच्या संक्रातीबद्दल “ही” म्हणत होती, आज आपल्याकडे माझी एक परिचयाची पण, ब-याच दिवसात न भेटलेली मैत्रीण आली होती, ती म्हणाली ताई तुम्हाला किती मुले ? मी म्हणाले एक, तर ती म्हणाली, यावेळेला ज्यांना-ज्यांना एक मुलगा आहे, त्यांनी सात घरातील सात बायांकडून एक रुपया, दोन रुपये, किंवा पाच रुपये, मागायचे आणि त्या पैशात बांगड्या घ्यायच्या आणि त्या संक्रातीपर्यंत घालायच्या- आणि नंतर काढल्या तरी हरकत नाही. असे जर केले नाही तर मुलाला धोका होऊ शकतो, तेव्हा मला काही तरी द्या !!!!हीने तिला खूप समजावले आणि पैसे द्यायला नकार दिला. पण, कालपासून हीचेही डोके फिरले आहे, ती म्हणते, ही अंधश्रद्धा असेल किंवा नसेल पण मी ही सात घरात जाऊन येते !!
दोस्त हो, एकविसाव्या शतकात व्रत वैकल्य आणि रुढीचा विचार करतांना धकाधकीच्या काळात काही सण मौजमजेबरोबर आयुष्याची रंगत वाढवतात. पण, अशा धार्मिक रुढींबरोबर, सणांबरोबर या संस्कारांना जोडून अशा अफवा येत असतील आणि महिलांमधे अंधश्रद्धा वाढवत असतील तर आपण हे प्रकार किती काळ सहन करायचे ? याचाही नक्कीच विचार झाला पाहिजे असे वाटते ?
या बरोबर आणखी एक अफवा आली आहे, पण ती पुढल्या वेळेला सांगेन !!! आम्ही मात्र तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इतकेच मित्र परिवाराला सांगणार आहोत आपण काय म्हणता ! ![]()