Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 18 सप्टेंबर, 2007

शाहीर ते शाहीरी

       मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात ‘शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संत कवी इश्वराच्या भजनात गुंतले तेव्हा शाहिरांनी जीवनाकडे पाहण्याची नुसती द्रुष्टी दिली नाही तर समाजाला जीवनाभिमुख करण्याचा प्रयत्न शाहिरांनी केला.

“अज्ञानांधारात मार्ग चुकलेल्या अनीतीत फसलेल्या दीनपतितांना सन्मार्ग दाखविण्याकरिता आणि स्वोद्धारासाठी ईश्वराची आळवणी करण्याकरीता संतांनी काव्ये रचली….संस्कृतातील कथा व काव्य मराठीत आणण्याकरिता आणि पढीत रसिकांना चकित कर्ण्याकरिता पंडितांनी रचना केली. त्याच वेळेस मुलुखगिरीत गुंतलेल्या,शिणलेल्या मनाला ताजेतवाने करण्यासाठी शाहिरांनी लावण्या आणि कवनाकरिता लौकिक विषय निवडले.” १      

       नुसते लौकिक विषय निवडले नाही तर मनोरंजासाठी सामान्यजनांची दैनंदिन जीवनातील भाषा त्यांनी आपल्या रचनांसाठी वापरली. त्यांच्या भाषेतून येणा-या शब्दांवर जात्यावरची गाण्यांमधून येणारे शब्दअलंकार होते, लोकांना परिचित असलेले शब्द ते मुद्दामहून वापरत.त्यांचे विचार भावना खरेखूरे मराठी वळणाचे होते.त्याच्यातून मराठी जाणीव व्यक्त होत होती.त्यांची भाषा जीवंत,तरतरीत,आणि अस्सल मराठमोळी होती त्यामुळे त्यांचे बोलणे लोकांना पटत होते. म्हणून तर लोकजीवनाची त्यांनी घट्ट पकड घेतलेली होतें. नुसते कवणे करीत नव्हते तर लोकांशी संवाद साधत आणि मग कवनाला एक आकार द्यायचा आणि मग ती गाणी शाहिरांची नव्हे तर माणसांची गाणी व्हायची.महाराष्ट्राच्या चालीरीती, त्यांच्या आवडीनिवडी,माणसांचे स्वभाव त्यांनी टीपले होते. म्हणजे शाहिरांचे शब्द सामान्य माणसांचे शब्द होते.म्हणून त्याला प्रदर्शीत करण्याची त्यांची शैली मराठमोळी अशीच होती.     मराठी शाहिरी वाड्;मय मराठी मनाचा अविष्कार हे खरे आहे पण ‘शाहिरी’ आणि ‘शाहीर’ या शब्दाच्या व्युत्पतीच्याबाबत यावर अनेक वाद झालेले आहेत यात हे शब्द फारशी मधून आले असावेत त्यात ‘शायर’ अथवा ‘षाइर’ असे एक मत मराठीच्या अभ्यासकात आहे. शिवकालीन मराठी भाषेत अरबी,आणि फारशी या शब्दांचा वापर दिसतो म्हणून ते मत ग्राह्य धरण्यास हरकत नसावी.मराठीचे काही मान्यवर अभ्यासक मात्र ‘शाहिर’ व ‘शाहिरी’ चा अर्थ कवी आणि कविता असा घेतांना दिसतात. लावनी पोवाड्याच्या निमित्ताने शाहिरांविषयी काही विचार प्रकट होतात ते असे-

१)शाहीर म्हणजे लावण्या पोवाडे रचणारे,तसेच लोकसमूहात मोठ्या आवाजात गाणारे.

२)राष्ट्रीय किंवा वीरवृत्तीची कवने रचून पुरुषातील पराक्रमी वृत्तीला प्रोत्साहान देणे.  

३) त्याच्या मोबदल्यात समाजाकडून बिदागी घेऊन त्यावर स्वतःची उपजीविका करणे.

४)शाहिरी रचना सादर करण्यासाठी ‘तमाशा’या लोकरंगभूमीचा आश्रय घेणे.         

       शाहिरांनी आपल्या रचनेसाठी प्राधान्याने वीर आणि श्रुंगार या रसांचा वापर केला आहे. वीरांची गुनगाण पोवाड्यातून तर श्रुंगाराचा अविष्कार लावण्यांमधून पाहवयास मिळतो.         

  “वीररसाशिवाय पवाड्यांची बहार नाही.आणि श्रुंगाररसाशिवाय लावण्यांची मजा नाही.”२         

        शाहिरांना लौकिक जीवन शब्दबद्ध करतांनी पोवाडा व लावणी हे दोन प्रकार जवळ्चे वाटले त्यात जीवनविषयक विचार आहेत पण मनोरंजनाच्या माध्यमातून जनसमूहापुढे साकार केल्यामुळे ते लोकाभिमुख झाले.      पोवाडा आणि लावणी रचणारा शाहिरच आहे,परंतू रसाविष्काराच्या बाबतीत या दोघांमधे फरक आहे. लावणी सामान्यत: स्फूट रचना असते.तर पोवाडा दीर्घ असतो.लावणी आत्मनिष्ठ किंवा नाट्यगीताच्या स्वरुपाचे असते. पोवाड्यातून निवेदन कधी जरा पाल्हाळ असल्यासारखे वाटते.संगीतदृष्ट्या लावनी पोवाड्यापेक्षा कधीही भारी असते. एकतर त्याच्यातली काव्याची रचना आणि कवीकल्पनेची भरारी यामुळे लावणी जरा पोवाड्याच्या तुलनेत उजवी वाटते. पोवाडा वीररसात्मक,व्यक्तीचे स्तुतीगाणे कधीतरी प्रसंगवर्णनेही दिसतातत. लावणीत वीररस सोडून ती जीवनाच्या विविधांगाला स्पर्श करते असे दिसते.       पोवाडा या शब्दाचा उल्लेख,महिकावतीच्या बखरीत,विवेकसिंधूत,ज्ञानेश्वरीत,एकनाथी भागवत इ. अनेक ग्रंथातून दिसून येतो.पोवाड्याचा अर्थ अद्भूत,चमत्कार,ख्याती या संदर्भाने अभ्यासक वापरतांना दिसतात. यशोगान करणे हे पोवाड्याचे महत्त्वाचे विशिष्टे आहे. मात्र वीरांचे यशोगान करण्याची परंपरा शिवकालापासून प्रामुख्याने येते. शिवपूर्वकालीन पोवाडे धार्मिक क्षेत्रांतील महापुरुषांचे स्तुती करतांना दिसतात.

     मराठी शाहीरी वाड;मयाच्या अभ्यासकांनी मराठीतील पहिला पोवाडा कोणता यावर वाद घातले आहेत. अग्निदासाचा पोवाडा आहे असे म्हणतात.मात्र-                      

    ” पोवाड्यांची रचना १४ व्या शतकातील असावी असा निष्कर्ष काढता येतो”.३

पोवाड्याच्या व्युत्त्पत्तीसंबधीही संशोधकात एकवाक्यता नाही. पोवाडा हा कानडीतून मराठीत आला असावा असे म्हणतात कृ.पा.कुलकर्णी म्हणतात पोवाडा म्हणजे ठासून स्तूती करणे.तर काही अभ्यासक म्हणतात हा शब्द आर्य भारतीय शब्दकोशातून आला असावा.

प्र+वद पासून पोवाड्याची व्युत्पत्ती सिद्ध करतांना डॉ.ग. ना. मोरजे म्हणतात की संस्कृत प्र+वद, सांगणे, बोलणे,उद्देशून बोलणे या शब्दापासून पोवाडा हा शब्द आला असावा.

     पोवाडा हा मूलत; एक कवण प्रकार असल्यामुळे त्याच्या अर्थाच्या संदर्भाने तो गौरव करणे,स्तुती करणे, किंवा प्रसिद्धी करणे, असा आहे आणि त्याच हेतूने सामाजिक,ऐतिहासिक,किंवा धार्मिक दृष्ट्या विभूती असलेल्यांचा गौरव शाहिरांनी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करुन जनतेसमोर कवनाद्वारे मांडले. पराक्रमी व्यक्तींना प्रोत्साहान देन्याचे एक मोठे कार्य त्यांनी केल्याचे दिसते. त्या दृष्टीने पोवाडा या कवनप्रकाराला महत्त्व आहे.

शाहिरांच्या अभिव्यक्तित एक प्रकारचा सच्चेपणा आहे.त्यामु्ळे कोणतेच बंधन पाळावे असे त्यांना वाटत नाही.त्यामुळे धीटपणाने सारे विषय त्यांनी आपल्या कवनातून मांडले. सामान्य माणसाला रुचेल,पटेल,भावेल व आवडेल अशा सरळसरळ साध्या भाषाशैलीचा वापरांमु्ळे शाहीर लोकप्रिय झाले.

संदर्भ

१) मराठी लावणी-म.वा.धोंड,पृ.१४

२)महाराष्ट्र सारस्वत( आ.दुसरी) वि.ल्.भावे,पृ.४४७

३)मराठी वाड;मयाचा इतिहास,खंड तिसरा,संपादक रा.श्री.जोग,पृ.४४३
 

सदरील लेख आम्ही मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: