एखादा दिवस असा उजाडतो की, त्यादिवशी निर्णय घ्यायचाच असतो. खूप काळ टाळुनही अखेर अटळ असलेला. आपण वेगळे होणार नसतो पण आपल्यातलं अतंर वाढणार होतं, हे तुही मान्य करत नाही अन मीही. आभाळ भरुन आल्यावर भावनाशील होतो आपण. गुलमोहराच्या झाडावर फुले असतात तो पर्यंत नजर हटत नाही, अन शब्द संपत नाही त्याचे कौतुक करतांना. काहीतरी असावं लागते काही तरी जाणवण्यासाठी. तु अशीच महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीत भेटलेली….आणि मग प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन तुझेच. तुझे निराळेपण अधीकच भावत गेले आणि आपण अधिक जवळ आलो. त्याचे रुपांतर मैत्रीत कधी झाले कळलेच नाही, हा माझ्या दोस्तीचा प्रवास. कधीतरी निर्हेतूक भटकणे, बसमधील नियमित महाविद्यालयापर्यंतचा प्रवास, भान हरपून मारलेल्या गप्पा, हे सारे जरा विचित्रच. मला अजूनही खरे वाटत नाही, तुझे माझ्यापासून दूर जाणे. सुखः दु:खाविषयी बोललो, कळत नकळ्त, अधिकाधिक गुंता वाढवत परस्पर संबधाचा ! म्हटले तर, तसे बोलण्यात अनेक विषय अन प्रश्नही न सुटलेले. कधीतरी गृहीत धरुन घेतो आपण अनेक प्रश्नाची उत्तरे. तुझ्या डोळ्यात पाहतांना तुझी भीती वाटते. खरे तर तसे काही नव्हते ? पण मीही जपले स्वत:ला. माझे सर्वच तुला माहित आहे, मी तुला कधी सांगीतले नाही अन तु ते मला कधी विचारलं नाही. तु म्हणतेस, सर, तुम्हाला कोणीही फसवू शकते, असे म्हणत असतांना तू मला फसवायचं काहीच कारण नाही. किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस, तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे….! पण लगेच… मी हे गमतीने म्हणते हं ! असं म्हणायचं . मला हे आवडते, ते आवडत नाही, राग येतो, वाईट वाटते, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही………. हे सर्व मला आवडलेच पाहिजे असे नाही. ….पण तुझ्या गप्पांच्या मैफिलीत रमतो मी. असे अनेकदा घडलंय, हॉटेलमधील वेटर काही बोलायचा नाही, पण हसायचा ! मग लक्षात यायचं इथून गेले पाहिजे. निघतांना काहीतरी बोलणं राहून जायचे. पुढच्या भेटीपर्यंत तीच घुसमट. तुझ्याजवळ काय आहे, ते मी कधी सांगीतले नाही. पण तुझ्याकडे आहे, अमर्याद आकाश, सततची समुद्रगाज आणि एक विश्वास झूळझूळ्त्या स्फटीक पाण्याच्या स्पर्शासारखा. तुझ्या माझ्याकडे पाहाणा-यांच्या मनात काय चाललंय, हे ओळखण्याइतपत मनकवडे आपण. तुझी ओळख करुन देतांना मी कधीच अडखळलो नाही…..सरळ सांगायचो, ही माझी मैत्रीण’, पण तुला ते जमलेच नाही. ‘हे माझे सर’ म्हणत असतांना, मी स्वतःला दूर जंगलात टेकडीवर पोर्णिमेच्या भिजत्या थंडीसह, अपरात्री, त्रयस्थासारखा वाटतो , हे तू कधी पाहिलेच नाही. जे विसरायला हवं ते विसरता येत नाही. जे आठवाय्ला हवं ते आठवत नाही. मला आठवताहेत माझे साजरे केलेले सर्वच वाढदिवस यात वेगळं काही नाही. कारण तू सर्वांचेच वाढदिवस साजरा करतेस. तुझे फ्रेंडसर्कल तसे मोठेच आहे. अर्थात तेही मला जमले नाही.
खूप दिवसानंतर भेटलेल्या माझ्या मैत्रीणीशी बोलतांना माझे रितेपण तू पाहिल आहे, विसरावे असे काहीच नसते. तुझ्याकडे यायचंय मला. पाऊस पडून गेलेल्या सायंकाळी, मंद उदास प्रकाशात… मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. असा विचार येतेवेळी फुलदाणीत आलेला निर्जीवपणा विसरता येत नाही. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? माझ्या ओठापर्यंत आलेला शब्द मला परत गिळता येत नाही. मी तुझ्यासमोर संपूर्ण काळोखी गुहेसारखा. तू फूलपाखराइतकी सहज वावरतेस त्यातल्या एक एक दालनात. तुला ठाऊक आहे, माझ्या आत्मविमन्सकतेचा ढासळत जाणारा प्रत्येक कोपरा आणि कदाचित एखाद्या जागी असलेली खोल अंधारात प्रेमाची ओल. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? उभा आहे मी तुझ्याच सुफल सहवासाच्या मातीवर ! ‘सर, यानंतर इतके जिवापाड प्रेम कोणावर करु नका ! तुम्हाला ते जमत नाही, हे सांगायला तू विसरत नाही. लेणीतील शिल्प असो, की निसर्गचित्राचे दालन. ते पाहतांना त्यावरची तासनतास चर्चा. माझ्या लक्षात आलंय, मी तुझ्या चित्रात आहे, रंगात आहे, कुंचल्यात आहे, मी तुझ्यात आहे, तुझ्या डोळ्यातल्या इवल्याशा एकाकी प्रतिमेसारखा. गाण्याच्या मैफलीत तू गाणं गातेस तेव्हा मी डोळे मिटून तुझ्या दूर जाण्याचा विचार करतो. का ? तू पुन्हा येशील तेव्हा तू लावलेलं गुलमोहराचे झाड वाढलेले असेल न ओळखण्याइतके. म्हणूनच माझ्या मैत्रीचा पराभव झाला असं वाटतं ! अंधूक प्रकाशात दाटून आलेला हूंदका मला नेईल कदाचित जुन्या काळात. सारे काही स्तब्ध झाल्यावर तुझ्या गाण्यांचा आवाज आणि अर्थही कधी समजेल मला. पण मीच पुन्हा आल्याचं कळवणार नाही कुणाला. खूप थंडी असेल तर बरोबर घेऊन येईन आठवणीने माझा नेहमीचा ओव्हरकोट. दु:ख गुरफटून घेता येईल इतका ढगळ शिवलेला. तोच एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे…..!
sir,
maitricha parabhav kadhich hot nahi !
By: shruti kulkarni on 20 जून, 2011
at 5:29 pm