Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 18 मे, 2008

मराठी भाषा : इतिहास आणि विकास

     कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्‍या भाषेची सुरुवात नसते. म्हणून मराठी भाषा इथून सुरुवात झाली असे म्हणता येत नाही.

भाषेचा कालखंड या प्रमाणे आहेत.

वेदपुर्वकालीन भाषा – इ. स. पू. ५००० च्या पूर्वी
वैदिक, ब्राह्मण, सौत्र उपनिषदे -इ. स.पू. ५००० ते इ. स.पू. १०००
पाणिनीय संस्कृत- -इ.स.पू. १००० ते इ. स. पू.२००
पाली -इ.स.पू. ६०० ते इ. स. पू. २००
महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पैशाची -इ. स. पू. २०० ते इ.स. २००
अपभ्रंश -इ.स.पू. ४०० ते इ.स. ७००
मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी -इ.स. ७०० च्या दरम्यान

    मराठी भाषा आर्य भाषाकुळात उत्पन्न झाली असे समजल्या जाते. वेदपुर्वकालीन भाषेची  कल्पना वेदसमकालीन वाङ्मयावरुन ठरवावे लागेल. येथील मूळ लोकांची भाषा कोणती होती हेही सांगणे जरा अवघडच आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत, इंडो-युरोपियन, इंडो-जर्मन, इंडो क्लासिक, आर्यन, इत्यादी इत्यादी. तरीही आर्यांची भाषा आर्यन हे जरा बरोबर वाटते. वेदभाषेत देव, शाल,अग्नी, पशू, पितृ, नृ, रै, गौ इत्यादी शब्द वेदपूर्व भाषेत हेच शब्द देवह, शालाह, अग्नय,पशव,पितर, नर-नार, रय-राय,गव-गाव असे आहेत. प्राकृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. अतिप्राचीन काळात ती आर्याची एक बोली भाषा असावी. सुशिक्षित वर्गाची भाषा वैदिक तर सर्वसामान्याची भाषा प्राकृत असावे. वैदिक भाषेत अनेक प्राकृत शब्दात आढळतात. जसे, वक= वक्र, वहू=वधू, मेह=मेघ, पुराण= पुरातन, चन्दिर=चंद्र , इंदर= इंद्र,मरन्द= मकरंद. त्यानंतर पाणिनीय संस्कृत भाषेची अवस्था येते. महाकवी व्यास, वाल्मिक यासारख्या कवींनी या भाषेला प्रगल्भता आणली. कालिदास, भवभूती, दण्डी, बाण, शंकररामानुज, इत्यादी लेखकांनी ही भाषा समृद्ध केली. वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतपेक्षा इराणमधील ‘अवेस्ता’ भाषेशी अधिक जवळची वाटते. इंडो-इराणियन भाषा गटात वैदिक संस्कृत आणि इराणमधील अवेस्ता या भाषांचा समावेश होतो.

    पुढे प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाल्याच्या खुणा या प्राकृत भाषेत दिसत असल्या तरी प्राकृत भाषा ही एकच होती असे समजण्याचे काही कारण नाही.ती सामान्य लोकांची बोलीभाषा असावी. ती बोली ज्या ज्या प्रदेशात बोलल्या जात असावी त्या प्रदेशावरुन त्या त्या भाषेला ती नावे मिळाली असावी. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, अवन्तिका, प्राच्या, इत्यादी प्राकृत भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात. समाजात वावरणारे वेग-वेगळे घटक वेगवेगळी प्राकृत भाषा बोलत असत असे नाट्यशास्त्रात सांगितले आहे म्हणतात. पद्याची भाषा महाराष्ट्री, शौरसेनीभाषा राजस्रिया व दुती बोलत, दरबारात काम करणार्‍या स्रिया या मागधी बोलत. कोळसे विकणारे पैशाची, सैनिक,राजपुत्र व्यापारी अर्धमागधी बोलत. विदुषक आणि इतर पात्र प्राच्य भाषा, तर मोळी विकणारे शाबरी अशी वेगवेळी भाषा समाजातील विविध घटक बोलत असत.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे

१) वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
२) मध्ययुगीन प्राकृत – पाली, महाराष्ट्री शौरसेनी इत्यादी
३)महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
४)हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.

     वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.

मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-

१) वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स. ५०० – ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

२) संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.

३) प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गूण दिसतात. पण याच प्राकृत पासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक बोली तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी. गुजराथी भाषा अपभ्रंशी पासून, तर बंगाली मागधी पासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्व रुपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.

   मराठी भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरुन त्या प्राकृत भाषेपासून मराठी निर्माण झाली असे समजले जाते.

१) पाली या या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात.बर्‍याच शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात.

पाली : तृण, प्रावृष,पीडन,गूड
मराठी: तिण, पाऊस, पिळणे, गूळ

पाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुस-या भाषेत नाही.
‘ळ’ हा वैदिक भाषेत आहे म्हणतात पण संस्कृत भाषेत नाही. ‘ळ’हा वर्ण द्रविडी भाषेतून मराठीत आला आहे.

२) पैशाची भाषा :

पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान,
मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य
पैशाच्या भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत ‘ण’ नाही

३) मागधी भाषा

मागधी भाषेच्या काही खुणा मराठी भाषेत आढळतात. मागधी भाषेत ‘र’ आणि ‘स’ या बद्दल ‘ल’ आणि ‘श’ वर्ण येतात. ‘ष्ट’ बद्दल ‘स्ट’ आणि ‘स्थ’ बद्दल ‘र्थ’ येतो. जसे, मिसळ =मिशळ /मिश्र, केसर = केशर.

प्राकृत अर्धमागधीचे बरेच विशेष मराठी भाषेत आढळतात. अर्थमागधीची रुपे माहाराष्ट्रीशीही जुळतात. दीर्घ स्वर र्‍हस्व करण्याची प्रवृत्ती मराठीने अर्थमागधी भाषेतून उचलली आहे. जसे, कुमर= कुमार

महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये मराठीत दिसतात, महाराष्ट्रीय आख्यात विभक्तीचे बरेच प्रकार ही महाराष्ट्री भाषेतून स्वीकारली आहे. जसे, हत्तीस= हत्तिस्स, आगीस = अग्गिस, करीन = करिस्सामो, करिशिल = करिस्सासि.

‘मी’ या सर्वनामाची सर्व रुपे महाराष्ट्रीच्या रुपाशी जुळतात. जसे अहस्मि = मी, आम्मि = मज, मए= मिया, म्या, मझतो = मजहुनि, मज्झ = मज. अनेकवचनी रुपे, अम्हे= आम्ही, अहमसुंतो = आम्हाहुनी, अहम= आम्हा.

अपभ्रंश भाषा :अपभ्रंश ही अभिरांची भाषा होती. आभीर जमात गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झाली.
मराठी काव्यात असणारी अन्त्य ‘यमक पद्धती’ अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारली आहे.

संस्कृत भाषेपासूनही मराठीने काही बाबी स्वीकारल्या आहेत.

१) ऋ, ई, औ, हे वर्ण संस्कृतमधे आणि मराठी भाषेतही आहेत. प्राकृत भाषेत हे वर्ण नाहीत.
२) ड; त्र ही अनुनासिके संस्कृतमधे आहेत. ते मराठीत आली.
३) अनेक संस्कृत शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यात तत्सम आणि तद्भव शबांदाचा समावेश आहे.

मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून ग्रंथ निर्मिती होत होती इ.स. ११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलल्या जाऊ लागली.

मराठी भाषेची उत्पत्ती पाहण्यासाठी काही शिलालेख, ताम्रपट आणि अन्य मराठी भाषेचा उल्लेख असणारी काही साधने यांच्या आधारे आपण मराठी भाषेचा निर्मिती काळ शोधण्याचा प्रयत्न करतो.
आणि अभ्यासकांना मराठीचा पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे १) उनकेश्वराचा शिलालेख इस. १२८९ ला. आणि त्याहीपेक्षा मागे जातांना श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८० च्या ताम्रपटात ‘पन्नास, आणि प्रिथवी’ हे शब्द आहेत म्हणून मराठीची सुरुवात माननारे अभ्यासक आहेत पण भाषातज्नाचे त्यावर एकमत होत नाही त्याचबरोबर ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.

”सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला !
मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!

मराठी भाषा सुंदर कामिणीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. ‘कुवलमाला’ या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषेंचा उल्लेख येतो ही अठरा भाषा बोलणारी माणसे कशी आहेत त्याचा उल्लेख त्यात येतो. पण केवळ ‘मराठा’ या उल्लेखाने मराठा म्हणजे मराठी बोलणारे असे म्हणणे जरा घाईचे होईल. प्राकृत भाषा बोली भाषा म्हणून लोप पावल्यानंतर देशीभाषा सुरु झाल्या या देशभाषा गुप्त राजांच्या काळात होत्या.

सारांश, मराठी भाषेबाबत असे म्हणता येते की, मराठी भाषा ही कोणत्याही एका भाषेपासून सुरू झालेली नाही. महाराष्ट्री आणि अपभ्रंश भाषेचे उपकार मराठी भाषेवर अधिक आहेत. नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो ‘मराठी’ असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्त्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८० पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात.

पण आज तरी मराठी रुपाचे पहिले वाक्य इ.स. ९८३ चे ‘ श्री चावुण्डराजे करवियले’ हेच आहे.

संदर्भ :
१) गोरे, डॉ. दादा : आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
२)शेळके, डॉ. मोहन : प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
३) शेणोलीकर, प्रा. ह. श्री. : प्राचीन मराठी वाड्मयाचे स्वरुप

Advertisements

Responses

 1. उपयुक्त आणि वाचनीय माहिती आहे.
  सामंत

 2. hai,
  your blog is very good i like
  my favrate marathi web site
  http://www.marathiworld.com
  http://www.marathinayak.com
  http://www.avakashvedh.com
  http://www.sahajch.com
  your friend
  dattatray

 3. mala he vachun manswi anand zala

 4. mi marathi cha shikshak aahe marathi che vachan karave vatate-

 5. सर, आपण मराठीचे शिक्षक आहात म्हटल्यावर वाचन वाढवलेच पाहिजे. बरं, वाटलं आपली प्रतिक्रिया वाचून. धन्यवाद…!

 6. mala vachun khrach khup bare vatale. jai maharashtra


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: