Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 23 जुलै, 2008

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

       आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता…वाचता…….कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ….दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे. बाजरी, मका, मुग, कापूस, तूर, यांची पेरणी झालेली असली की दोन पानांची रोपं पांडुरंगासारखी कर कटेवर ठेवून डोलत असतात. पण यंदा वारक-याला दर्शन करुन आला तरी त्याची नजर आभाळाकडेच. शेतक-याने खरिपाच्या पिकाची आशा सोडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन तरी पाऊस यावा इतकीच अपेक्षा उरली आहे. खरे तर य काळात रानं हिरवीगार झालेली असतात. डोंगरद-यातून खळखळत वाहणारे पाणी, गावा-गावातील अध्यात्मिक वातावरण आणि येणा-या सनासुदींमुळे वातावरण भारलेले असते. आणि आम्हाला पावसाच्या कवितेची आठवण होते, बहिणाबाई म्हणतात…

 

 

                           आला पह्यला पाऊस
                                शिपडली भुई सारी
                           धरत्रीची परमय
                                माझं मन गेलं भरी 

                           आला पाऊस पाऊस
                                आता सरीवर सरी
                            शेतं शिवारं भिजले
                                नदी नाले गेले भरी….!!!

बहिणाबाईच्या कवितेतला पाऊस असा भरपूर कोसळणारा. धरित्रीचं मन ओला करणारा असा पाऊस, शिवार गच्च करणारा पाऊस, नदी नाले तुडूंब भरणारा पाऊस. पण यंदा काही त्याचे लक्षणे नीट दिसत नाही. जमीन आणि आकाशाची भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. दोघांच्या भेटीने दरवळणा-या मृदगंधाने प्रत्येकाच्या आनंदाला उधान येतं. मात्र दुष्काळामुळे भूईचेच दु:ख पेटले आहे. ते कोणीतरी विझवायला पाहिजे अशी हाक कवितेतून येत आहे. एक अज्ञात कवी म्हणतो.

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे

           

          ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार  आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, ‘आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश….हे सारं स्वप्नवत वाटत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजचे पैसे, खतासाठी, बियाणांसाठी, दिले याचा विसर होऊन शेतकरी अवांतर खर्च करतोय, नवी कोरी टू-व्हीलर, घेऊन मोबाईलवर हॅलो, हॅलो, करतोय. आणि न पुरणारे पैसे संपल्यावर पुन्हा तेच दु:ख. पाण्याच्या शोधात किडे-किरकुडे शहराकडे येताहेत, रानात चारा नसल्यामुळे जणावरांचे हाल पाहवत नाही. भविष्याच्या चिंतेने मुक्या धनाला बाजाराच्या दावणीला बांधले जात आहेत.
ना.धो. महानोर म्हणतात-

पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे, वाळलेली शुष्क पाने.
दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी.

     

 पांगलेल्या पावसाने मोडकी फांदी, वाळली पाने, दूर गेलेल्या पायवाटा आणि दु़ख; पुजलेलेच. जिथे पाण्यासाठी उन्हाला व्याकूळ होण्याची वेळ आली तिथे जीवाचे काय हाल. पावसाअभावी जीव भीतीने कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.
पाऊस आलाच नाही तर…….पक्षांचे थवे मरणाचा निरोप देत इतरत्र जातील. घरातील कर्ता माणूस कुठे निघून जाईल त्याची भीती कुटूंबाला लागून राहीली आहे. आणि असा विचार करता करता माय माऊलीच्या डोळ्यांचा कडा ओलावतात. पक्षी नुसते हिरमुसले होऊन वाळलेल्या पानांकडे पाहत आहेत.सुस्तावलेल्या झाडाला ओल नाही. आणि शेतक-याच्या दुखःला कुठेच तळ नाही. पावसाचा गार झोंबणारा असा गारवा नाही. कुठे बगळ्यांचा थवा शेतात नाही. आणि पुन्हा पहिल्या पावसाची आठवण होते. मंगेश पाडगावकर म्हणतात….

पहिला पाऊस येतो आधी
आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यांवर
बाजूला मी उभा भिजत,
     माझा मलमलाचा इवलासा सदरा ओलाचिंब. 
         
               झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या            
                 पहिल्या पावसात पानांनी शहारत             
      उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.

         

         आपल्यालाही आठवत जातात पहिल्या पावसात ओलेचिंब झालेले आपण. घरात झटकून धुळ झटकावून काढलेल्या छत्र्या, रेनकोट, आणि आपल्याला आठवतात गोणपाटाचा केलेला रेनकोट. पोत्याचा कोपरा मुडपून भिजत चाललेले आजोबा. चिंब झालेले रान. यातले आता काहीच नसते. सा-या वाटा, वळणं मागे टाकून आयुष्य असं कधी उजाड माळरानावर येऊन विचार करायला लावते. पाणी ग्लासात ओतून प्यायला द्यावे, तसे रोपट्यांना ग्लासाने पाणी ओतणा-या स्त्रीयांना पाहिलं की आमच्या -दयात कालवाकालव होते. तेव्हा सोबतीला केवळ भन्नाट वारा असतो. पाण्यासाठी हरवलेल्या दाही दिशा, आणि डोळ्यात पूर, तेव्हा काय करावे काहीच समजत नाही. पावसळ्यात मस्त भटकंती करुन यावे असा विचार पक्का झालेला असतो…..पावसाळी दिवसात कुठे तरी घाटात भटकून यावे, प्रवास व्हावा, सुरेल पावसाच्या धारेत आपला सुर मिसळून आपल्याच गाण्यावर खू्श व्हावे. आणि पुन्हा एकदा बालकवीची कविता वाचायला हवी असा विचार तरळून जातो. विंदा म्हणतात….

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

          

       असाही एक विचार मनात डोकावतोच….तक्रार करावी तर कोणाकडे करावी. दरवळणारा मातीचा सुवास येत नाही. माणसाला माणूसपण देणार्‍या मातीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी ढेकळं अजून विरघळली नाहीत. शेती जीवनाला आकार देणारा पाऊस पडावा यासाठी परमेश्वराची आठवण होत आहे. सर्व भेदाभेद दूर होऊन. धोंडी-धोंडी पाणी दे असा आवाज गावात घुमतोय. निसर्ग हाच देव त्याच्या भेटीची ओढ तीव्र होत आहे, बहिणाबाई म्हणताहेत……..
         

                      येता पाऊस पाऊस
                             पावसाची लागे झडी
                      आता खा रे वडे भजे
                           घरांमधी बसा दडी  
                    देवा, पाऊस पाऊस
                             तुझ्या डोयातले आंस
                     दैवा, तुझा रे हारास
                            जीवा, तुझी रे मिरास.      

 

        आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे……मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, आणि पावसाच्या गदारोळात तिच्या डोळ्यातील पावसाला मात्र थांबू दे. तरीही राहून राहून ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होतेच.

आभाळ भरुन येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही.
नक्षत्रामागून नक्षत्र सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही.
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो.
जुन्या आठवणी स्मरून.

        

        पुर्वीसारखा पाऊस पडत नाही, ही अनेकांची त्रक्रार असते. कधी मुसळधार पावसानं गावच्या गावं पाण्याखाली जातात, तर कधी पावसाचा टीपूस नाही. जीव मेटाकुटीला आणणा-या निसर्गाच्या लहरीपुढे माणूस हतबल झाला आहे. रोहिण्या बरसल्या की मृगाच्या सरी बरसतात. त्यावर एकदा पेरण्या झाल्या की शेतक-याच्या चेह-यावरील आनंद लपत नाही. पण यंदा रोहिण्या बरसल्या नाही. मृगानं दगा दिला. आर्द्रा कोरडाच आहे. जीथं थेंबा-थेंबी झाली तिथं केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

गुज बोले गुज बोले
गुज मिरोग बोलला
तेलपाणी लावा काव
आता तिफन उचला

          

      इंद्रजीत भालेरावांची पावसापुर्वीची कविता. तिफण उचलली, पेरणी झाली, वाफधावन झाली, पावसाच्या सुकाळात गवत, धान, तरारुन आलेलं आहे. मग पाखरं राखायचेत, चोर राखायचेत, शाळेतला ‘सुगीचे दिवस’ नावाचा धडा आठवायचा. सुगीची कामं दिवस रात्र करुन उरकायची, मळणी, उधळणी, खळं मागायचं, आणि सर्वा उचलत उचलत पुढल्या वर्षीचा हिशोब डोळ्यासमोरुन सरकत जाईल………पुन्हा पावसाच्या वाटेकडे डोळे लावायचे.

 

 

Advertisements

Responses

  1. Chanach aahe lekh. paoos pan nakki yeeel ata.

  2. ब्लॉगवर अधिक अनुभवांनी समृद्ध असे लेखन करणा- माणसाने केलेले कौतुक लेखनाला बळ देते, प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासून आभार !!!

  3. Kya bat hai. Mast .

  4. आजाणुकर्ण , कौतुकाबद्दल आभारी आहे. !!!

  5. डोळ्यातून पाऊस पाडण्यासारखं लिखाण आहे

  6. सामंत साहेब, शाबासकीबद्दल आभारी !!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: