भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती. त्यांचे तत्वज्नान सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह,ब्रम्हाचर्य, शरीरश्रम, स्वदेशी, जीभेवरील नियंत्रण, सर्वधर्म समभाव, अस्पुश्यता न मानने ही त्यांची मुल्य होती. या नितीमुल्यांनाच गांधीवाद असे म्हटल्या जात असावे. गांधीविचारांचा प्रभाव येथील समाजमनावर पडला होता त्यांच्या विचाराने भारल्यामुळे अनेक तरुण गांधीजींच्या लढ्यात उतरले आणि साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटल्या जाते, त्यामुळे या सर्व परिस्थितीचे चित्रण मराठी साहित्याने टीपले आहे.
१९२० ते ११९५० हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. १९३० ला गांधीजींनी खेड्याकडे चला ही हाक दिली आणि त्याच काळात मराठी कवींनी त्याकाळात मोठ्या प्रमाणात जानपद गीतांची रचना करुन गांधीजींच्या हाकेला ओ दिली होती.
गांधीवादाचा फार मोठा प्रभाव वा. म. जोशींवर होता. ते स्वत: गांधीजींच्या राजकीय चळवळीत उतरले होते. त्याकरिता त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. ‘ सुशिलेचा देव’ या कादंबरीत विश्वकुटुंबवादाबरोबर समाजवादाचाही पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही वाद व्यक्तिविकासाला घातक आहेत अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘इंदू काळे व सरला भोळे’ या त्यांच्या कादंबरीत त्यांनी गांधीवादाचा बुद्धीप्रामाण्यवादी परामर्श घेतलेला आहे. यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत. गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कादंबरीत गांधीवाद व्यावहारिक वाटत नाही, असा विचार मांडलेला दिसतो.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या ‘कांचनमृग’ पासून ते ‘ययाती’ पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात. साने गुरुजींनी ‘शामची आई, धडपडणारी मुले या आणि अशा अनेक कादंब-या लिहून आपली गांधीविचारावरील निष्ठाच प्रकट केली. स्वातंत्र्याची चळवळ, स्वार्थत्याग,बंधुभाव, समत्व, करुणा, इत्यादींचे चित्रण साने गुरुजींनी आपल्या हळुवार शैलीने केले आहे. ‘शामची आई’ या त्यांच्या एकाच कादंबरीने अमाप लोकप्रियता मिळवली. संस्कारहीन अशा नव्या समाजरचनेत सुसंस्काराचे हे उदात्त व करुण चित्र वाचकांना आवडले. त्यांच्या कादंबर्यांनी ध्येयवादाची जोपासना केली. त्यांचे भाबडे मन त्यांचा आशावाद त्यांची कमालीची हळुवार वृत्ती यांचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. असे असले तरी त्यांच्याबद्दल असे म्हटल्या जात होते की, त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो.
ना. सी. फडके यांनी आपल्या काही कादंब-यामधुन गांधीजींनी उभारलेल्या चळवळीचा उल्लेख केला ज्यात प्रवासी, उन्माद, समरभूमी, यांचा उल्लेख करता येईल. पण त्यांनी गांधीवादाचा पुरस्कार केला नाही. उलट गांधीविचारांवर टीकाच केली. असे समीक्षकांचे म्हणने आहे.
मराठी कादंबरीत गांधीवाद न रुजण्याचे एक कारण सांगितल्या जाते की, मराठीमधे लिहिणारे जे लेखक होते ते सर्व एका विशिष्ट वर्गाचे होते आणि त्या वर्गाचा ओढा गांधीवादाकडे नव्हता. विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी यांनी मात्र गांधीवादाचा पुरस्कार करुन आपले जीवनच त्यासाठी वेचले.
कवितेमधे भा. रा. तांबे यांनी गांधीविचाराने प्रभावित होऊन काही कविता लिहिल्या जशा की
‘रुद्रास आवाहान’ ही त्यांची जलियनवाला बाग हत्याकांडाची धिक्कार करणारी कविता. तर ‘गाडी बदलली’ या कवितेतुन अहिंसा तत्त्वज्ञानाचा पुरस्कारच केला आहे.
‘ कोण रोधील’ या कवितेतून तांबे यांनी गांधीजींना आणि त्यांच्या अनुयायांना राष्ट्रनिर्माते म्हटलेले आहे.
कुंजबिहारी यांची –
‘भेटेन नऊ महिन्यांनी’
मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी
या न्यायाची रीत मानवी नसते
खरी ठरते केव्हा चुकते…
ही कविता खूपच गाजली होती. माधव ज्युलीयन, यशवंत यांच्याही कवितेतून राष्ट्रीय वृत्ती आणि अहिंसेचा पुरस्कारच त्यांच्या विचारातूनच येतांना दिसतो. विठ्ठलराव घाटॆंची ”तो पाहा महात्मा आला” गांधीजींच्या दांडीयात्रेवरही काही कविता लिहिल्या गेल्या त्यात आनंदराव टेकाडे यांची ‘रणसंग्राम’ विशेष मानली जाते. माधव ज्युलीयन यांनी ‘महात्मा गांधी आणि टागोर’ ‘महात्मा काय करील एकटा’ अशा मोजक्याच पण सुंदर कविता लिहिल्या. कुसुमाग्रजांच्या, एक मागणे, खादी गीता, धृतराष्ट्र, या गांधीविचारावरील कविता समजल्या जातात. बा.भ. बोरकरांचे ‘महात्मायन’ असे प्रदीर्घ महाकाव्य लिहिण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही.
डॉ. वि.भि. कोलते, राजा मंगळवेढेकर, सोपानदेव चौधरी, ग.ह. पाटील, ग.दि.माडगूळकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सेनापती बापट, इत्यादीनी गांधीजी व गांधिवादावर अनेक कविता लिहिल्या. आजही कवितेतून बर्याचदा गांधीजींवर कविता लिहिणारी कवी मंडळी दिसते…पण लिहिते ते उपाहासातून…टीका करण्याच्या उद्देशातून किंवा खरेच बापू तुमच्या विचारांची गरज आहे असाही एक विचार कवितेत दिसतो ‘ बापु तुमच्या देशात, बापू, महात्मा, अशा शिर्षकाच्या अनेक कविता दिसतात कधी त्यांच्यावर टीका तर कधी त्यांच्या विचारांचे मोठेपण दाखविल्या जाते.
नामदेव ढसाळ ‘ मुर्ख म्हातार्याने’ या कवितेत म्हणतात…
”अहिंसावादी शासन झाले आहे हिंसेची देवता
गावांची बनवली जातायत मैदाने
आयाबहिणींच्या इंद्रियांचे तोडले जातायत लचके
उपटले जातायत अंकुर अदिवाशांच्या
देवदत्त शेतातून
दमन यंत्रणेच्या जात्याखाली भरडले जाताहेत जनतेचे सैनिक”
१९३० ते १९४० याकाळात गांधी यांची थोरवी व स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती गाणारे अनेक कवी निर्माण झाले, मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांच्या काव्यकृतीही नष्ट झाल्या. कारण त्यांच्या काव्यात मूलभूत काव्यगुणच नव्हते असे म्हटल्या जाते त्याच बरोबर अनेक कवी, लेखकांना त्यांचे तत्वज्ञान मान्य नव्हते पण त्यांचा मोठेपण मान्य . स्वातंत्र्य लढ्याचे एक निर्भीड सेनानी म्हणून त्यांच्याविषयीचा तो आदर होता, तोच आदर कविता, कादंबर्यातून व्यक्त झाला आहे.
सारांश, मराठी कादंबरी आणि मराठी कविता यावर गांधीवादाचा फार थोडा प्रभाव दिसतो. नाट्यक्षेत्रात तो प्रभाव नगण्यच असावा. एकुण काय मराठी साहित्याने गांधीवादाचा पुरस्कार जरा हात राखुन केलेला दिसतो असे म्हणन्यास हरकत नसावी.
टीप : अनेक लेखक कवी, यांच्या लेखनातून गांधीवाद व्यक्त झाला आहे, त्यांची नोंद घेणे राहून गेले आहे. अजूनही नव्याने साहित्यातून व्यक्त होणार्या गांधीविचारांवर नव्याने भर घालणार्या मतांचे स्वागत आहे.
सदरील लेख मिसळपाव संस्थळावर पूर्वप्रकाशित.
My Name Is Mane Swaminath
I Am 11th Std
M.B. 7709635913
i am impress your thought. can you call me?
By: swaminath mane on 11 जुलै, 2014
at 9:35 pm