Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 20 फेब्रुवारी, 2009

एक संवाद !

सर, नमस्कार ! ओळखलं का ?

असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो.

आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले.

पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते!

सर, तुमच्या लक्षात कसे राहील? किती तरी विद्यार्थ्यात एक चेहरा लक्षात ठेवायचा, म्हणजे जरा अवघड काम आहे.

खरं तर दोन तीन वर्षाच्या सहवासात विद्यार्थी लक्षात राहतो. पण याला प्रयत्न करुनही मला आठवता येईना.कोणत्या वर्गाचा असेल.कोणत्या वर्षी शिकला असेल. खूप स्वत:ला ताण देऊन पाहिला पण काही जमेना.


सर, ही माझी पत्नी !(एकमेकांना नमस्कार झाला)
नुकतीच डीएड झाली आहे. एका विनाअनुदानित शाळेत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करतेय.


पगार नियमित होतो का ?

सर,पगार दिल्यानंतर अर्धा पगार पुन्हा संस्थेला द्यावा लागतो.

अरेरे ! मग दुसरीकडे प्रयत्न करायचा. सध्या डीएड झालेले आणि पोलिसांत भरती होणा-यांना शासकीय नोक-यांची काही कमी नाही.


तसेही,विनाअनुदानित शाळेत नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान टाकलेलं बरं ! असा एक विचार मी मनातल्या मनात गिळला.


तुम्ही काय करता ?..मी त्या तरुणाला विचारलं


सर, मी एमए.झालोय, इतिहास विषयात. नेट-सेटची प्राध्यापकाची पात्रता परिक्षा देत आहे. आतापर्यंत दोनदा परिक्षा दिली,
पण पास काही होईना. माझ्या मागचे, पुढचे,बाजूचे पास होतात. पण माझ्याच बाबतीत दुर्दैव आडवं येतंय !


अरे,नेट-सेट्चा अभ्यासक्रम तसा अवघड आहे. काही विषयात तर शुन्य टक्के निकाल आहे. तेव्हा प्रयत्न करत राहावे.


प्रयत्न तर चालूच आहेत सर ! गावाकडची शेती विकून बीएडला डोनेशन देऊन प्रवेश घेतला.
वर्षभर हमालासारखे राबराब राबलो,स्कॉलरशिप संस्थाचालकांनी ढापली.


हं ! शिक्षण संस्था चालकांनी काही ठिकाणी बाजार मांडला आहे.पण परिस्थिती बदलेल असा विचार केला पाहिजे.


कशाची परिस्थिती बदलते सर, माझेच पहा. शिक्षणासाठी शेती विकली. अभ्यासही केला.
बीएडची परिक्षा देत होतो, तर..


तर काय ?

ज्या परिक्षा केंद्रावर परिक्षा देत होतो, त्या बीएडच्या एका पेपरला जरा एका मुद्यावर अडलो.
खिशातून काही चिठ्ठ्या काढायला आणि आपण माझी कॉपी पकडायला एकच वेळ झाला.


अरेरे !पण कॉपी करायची नाही ना !


खरंय सर, पण पन्नास टक्के विद्यार्थी कॉप्या करुन पास होतात..तीस टक्के मुले कॉप्या घेऊन येतात पण त्यांच्यात कॉप्या काढायची हिम्मत होत नाही. वीस टक्के मुले अभ्यास करुन लिहितात.


तुम्ही कोणत्या कॅटेगीरीत येता ?.. मी मिश्कीलपणे म्हणालो.


सर, मी तीस टक्क्यामधे येतो. आपण माझी कॉपी पकडली आणि माझे सर्व विषयांचे गुण रद्द करण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली आणि माझ्या एका महत्वाच्या वर्षाबरोबर माझे सर्व भविष्याचे स्वप्न हवेत विरुन गेले.


ते कसं काय बॉ?


बीएड झाल्याबरोबर मला ज्युनियर कॉलेजमधे नोकरी लागणार होती. नातेवाईकाच्या एका संस्थेत चार लाख रुपये भरले होते. पदाची जाहिरात दिलेली असल्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार घेतला आणि माझे पैसे..त्यांच्याकडेच राहिले.


अरे, मिळतील ना पैसे. नातेवाईक आहेत म्हटल्यावर तुझे पैसे कुठे जाणार?


संस्थाचालक पैसे परत देत आहेत. पण दहा हजार, वीस हजार, असे करुन देत आहेत. तेही तगादा केल्यावर .


काय करावे या संस्थाचालकांचे काही कळत नाही…. मी


सर, माझं तुमच्याकडं फारसं मागणं नाही. असाच प्रसंग भविष्यात कोणाबरोबर घडला तर त्याला त्याची परिस्थिती विचारा,आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचा प्रामाणिकपणा पडताळून पाहा.आणि जमल्यास त्याला माफ करा.
माझ्यासारखा एखादा तग धरतो,पण एखादा आयुष्यातून उठून जाईल.पाहा जमलेच तर….


इथे त्याचे डोळे भरतील असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. कोणत्या आत्मविश्वासाने तो असा बोलत होता. मला कळलेच नाही. आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हते. मी काय बोलावे असा विचार करत होतो, तेवढ्यात त्याची एसटी आली. त्यांची धावपळ सुरु झाली. तरी तो बोलत होता


सर, पुन्हा परिक्षेला येणार आहे. तुमच्या शुभेच्छांबरोबर, जमलेच तर मला थेट मदत करा.
असे म्हणून तो माझ्यासमोरुन बसमधे बसण्यासाठी निघूनही गेला.


मी मात्र जागच्या जागी थिजून गेलो होतो. इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.

Advertisements

Responses

 1. तुमच्या गोष्टीतली प्रामाणिक मांडणी अगदी आवडली. कुसुमाग्रजांच्या आदर्शवादापुढे आजच्या पिढीचा “बाजारवाद” मन विषण्ण करणारा आहे.
  पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

 2. प्रतिक्रियेबद्दल तहे दिलसे शुक्रिया…!!!

 3. “इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.”

  ह्या एका वाक्यातच सगळं काही आलं…

  प्रभावी कथा, अभिनंदन !

 4. आनंद वाटला, आपली प्रतिक्रिया वाचुन ! आभारी आहे.

 5. खरोखर,
  सर, नमस्कार ! ओळखलं का ?

  असे पहिल्याबरोबर. कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली….मलासुद्धा….
  खरेच आजच्या काळाला अनुसरून आहे प्रसंग ….
  छान वाटला.

 6. प्रसंग आवडला. शेवटचे वाक्य खूपच आवडले. “इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.”

 7. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !!!

 8. prabhavi ni kharach satyachi janiv anun denari katha


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: