Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 16 मे, 2009

बालकवी

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे. आणि खेळाला पुढे न्यायचे. त्यांच्या कवितेचे कौतुक हे त्यांच्या मोठ्या बहिणीनेच केले. बालकवींच्या पहिल्या कवितेची गोष्ट अशीच आहे. त्यांच्या बहिणीच्या दिराबरोबर कवी असाच वनात गेल्यावर त्यांना वनात दिसणाऱ्या झाडांवर कविता करण्याचा मोह आवरला नाही. कटाव खेळण्याचा नादात त्यांच्या कवितेला सुरुवात झाली.

निंब, जांब, जांभूळ, शेंदरी
तुळशी बहुतची झाक मारी:
जणू काय ती येत धावुनी,
असेच वाटे पाहा साजणी,
पुढे पाहिली खैरी झाडे
जणू करिती ती हात वाकडे:

यावर त्यांचे स्नेही म्हणाले की, इथे खैरीची झाडे कुठे आहेत. तेव्हा ते म्हणतात खैरांच्या झाडांशिवाय या वनातील झाडांचे वर्णन पूर्णं होणार नाही. म्हणजे जे दिसत नव्हते. त्याचे वर्णन बालकवींनी इथे केल्याचे दिसते. याच ओळींबरोबर पुढे त्यांनी कल्पना करून-

अशा वनी मी ऐकली मुरली
तिला ऐकुनी वृत्ती मुराली
काय कथू त्या सुस्वर नादा
पुढे पाहिले रम्य मुकुंदा!

ुढे या कवितेत बर्‍याच ओळी आहेत पण पहिली कवितेची कथा अशी सांगितल्या जाते. बालकवींना आपल्या अवतीभोवतीचे सामाजिक राजकीय वास्तवतेचे भान नव्हते का? असा प्रश्न नेहमी विचारल्या जातो. बालकवी केशवसूत संप्रदायातले होते का नव्हते तो भाग सोडून देऊ. पण निसर्गसानिध्य, जातिरचना, सुनितरचना, व काव्यातील काही कल्पना यावर केशवसुतांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. केशवसुंताच्या ‘तुतारी’ वरून त्यांनी ‘धर्मवीर’ कविता लिहिली. असे म्हटल्या जाते. धर्मवीर कवितेत उसना आवेश आहे. ‘तेजाचा धर्म’ काय याची तोंडओळख तरी बालकवींना होती का असा प्रश्न विचारल्या जातो. बालकवींची कल्पनाशक्ती जे दिसते ते मांडण्यापुरतीच होतीच असे वाटायला लागते. बालकवींचे काव्य म्हणजे चांदणे, मंद वार्‍याची झुळुक, हिरवळ अशा एका मर्यादेपर्यंत त्यांची कविता फुलतांना दिसते. कवीचे निसर्गविषयक निरीक्षण आणि त्याचे वर्णन याबाबतीत जरा त्यांना मर्यादाच पडते असेही वाटते. ‘फुलराणी’ आणि ‘तारकांचे गाणे’ यात कवी अतिशय तन्मय झालेला दिसतो. पण येणार्‍या उदासीनतेवर त्यांना काय करावे हे मात्र कळत नाही असे वाटते.

‘कोठूनी येते मला कळेना
उदासिनता ही र्‍ह्दयाला
काय बोचते ते समजेना
र्‍ह्दयाच्या अंतरर्‍दयाला….

त्याची शेवटची ओळ अशी आहे.

तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला.

किंवा
‘निराशा’ कवितेत-

रात्र संपली, दिवसही गेले,
अंधपणा ये फिरुनि धरेला;
खिन्न निराशा परि र्‍दयाला- या सोडित नाही.

इथपर्यंत कवी निराशेला सहज व्यक्त करतांना दिसतो. पण जे काही आहे, ते निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त झाले पाहिजे. त्यासाठी निसर्गाचा आधार घेत निसर्ग कसा आनंददायी आहे, आणि माझ्या वाटेला हे असे का येते. त्याच्यासाठी शब्दांची गुंफन कवी करतो-

नित्यापरी रविकिरणे देती
रंग मनोहर सांध्यमुखीं ती,
खळबळ ओढा गुंगत गीती-राईतुनि वाहे.

सुंदर सगळें, मोहक सगळे,
खिन्नपणा परि मनिंचा न गळे
नुसती हुरहुर होय जिवाला- का न कळे काही.

स्वतःच्या येणाऱ्या उदासपणाला त्यांच्याकडे कोणतीही औषधी नाही. बाल्य आणि तरुणपाच्या वाटेवरील स्वप्न आणि वास्तव यांच्यातल्या द्वंदात मात्र बालकवी गोंधळून जातात असे वाटते. बालकवींनी लहानमुलांसाठीही कविता लिहिल्या त्यातील ‘चांदोबा मजला देई’ ‘रागोबा आला’ ‘माझा भाऊ, यासारख्या प्रसंगाच्या निमित्ताने काही कविता लिहिल्या आहेत. त्यांची संवादाच्या स्वरुपातील ‘चिमणीचा घरटा चोरीस गेला. ‘ ही कविता मला आवडते.

चिव चिव चिवरे! तिकडे तू कोण रे!
कावळे दादा, काव़ळे दादा, माझा घरटा नेलास बाबा?
नाही ग बाई, चिमुताई, तुझा घरटा कोन नेई.

िमणी पुढे कपिला गाईकडे जाते, कोंबडीकडे जाते आणि नंतर पोपटाकडे जाते तोच प्रश्न त्यालाही विचारते.. तेव्हा तो म्हणतो माझ्या पिंजऱ्यात ये, माझा पिंजरा छान आहे. चिमनीचे उत्तर आणि बालकवीची कल्पना इथे अतिशय भावते.

‘जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना! चिमणी उडून गेली राना.


मुक्त राहण्याची कल्पना अतिशय सुरेखपणे बालकवींनी मांडली आहे. बालकवींच्या या कविताही सुरेख असल्या तरी त्यावरही प्रभाव ‘दत्त’ कवीचा आहे. पुढे अनेक निसर्गकविता लिहिणार्‍या कवीने बालकांसाठीच्या कविता लिहिल्याच नाहीत त्याचे कारण इथेच सापडते असे वाटते. बालकवीच्या कवितांमधून निसर्गाचे वर्णन करता करता त्याच्यात रंगसंगती निर्माण करतांना आपल्याला दिसतात. बालकवींना वेगवेगळ्या रंगछटांचे खूपच आकर्षण दिसते. निसर्गवर्णन करणार्‍या कवितेत अशी रंगाची उधळण जागोजागी दिसून येते. ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे ‘ पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल’ ‘रात्र काळी, आकाश कृष्णवर्ण’ ‘फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा’ ‘लाल लाल वन दिसूं लागले’ ‘सांज खुले सोन्याहुनी पिवळें हे पडले ऊन- चोहींकडे लसलशीत बहरल्या हिरवाळी छान’ रंगाबरोबर बालकवी आपल्या लेखनीने प्रतिसृष्टी निर्माण करतांना दिसतात. निसर्गाचे नुसते रुप कवितेतून ते मांडत नाहीतर त्यात ते जीव ओततात. वेगवेगळ्या रंगछटांतून भोवतालच्या सृष्टीतील उल्हासाचा कवीला प्रत्यय येतो. रंगाच्या आकर्षणाबरोबर चित्रमय कविता उभी करणे हा बालकवींचा विशेष आहे. अनुप्रास प्रधान रचना, विशिष्ट शब्दांचा परिणाम होण्यासाठी शद्बांची द्विरुक्ती करणे हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्ये. ‘थवथवती, ‘डोलडोलती, ‘सळसळती, अशा अनेक शंब्दांचा नाद कविता वाचताना (ऐकायला येतो) दिसून येतो. त्याचबरोबर कवितेतून दुष्य डोळ्यासमोर उभे करणे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहे. ‘खेड्यातील रात्र’ ‘पारवा’ या कवितेत गंभीर निराश करणारे वातावरणाची निर्मिती दिसून येते. विविध चित्रविचित्रभावना शब्दातून व्यक्त होताना दिसतात.. ‘खेड्यातील रात्र’ कवितेत कवी म्हणतो

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढती
वडाचा पार-अंधार दाटला तेथ भरे भरपूर..

पुढे कवितेत, भालू ओरडती, वार्‍यात भुते बडबडती,डोहात सावल्या पडती, अशा त्या खेड्यातील रात्रीचे वर्णन येते. अगदी तशीच पारवा नावाची कविता-

भिंत खचली, कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्वद्ध्स्त धर्मशाळी:
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो. (अपूर्ण कविता)

पुढे कवितेत तो पारवा मानवी व्यवहारापासून त्यांच्या दु:खापासून खूप वेगळे आहेत. आणि तो कोणते करुणगीत घुमवित आहे असा विचार कवितेत आहे. ‘ दु:खनिद्रे निद्रिस्त बुद्धराज, करुणगीते घुइमवीत जगी आज” इथे जरा वेगळी कल्पना आहे का अशी शंका डोकावते. असो, असे असले तरी बालकवींच्या कवितेवर एक आरोप केला पाहिजे की, बालकवींची कविता निसर्गदृष्याचा विपर्यास करते. अवास्तव कल्पनांची करामत त्यांच्या कवितेत दिसते. ‘ औदुंबर’ सारख्या कवितेवर कल्पनाशून्यतेचा आरोप केला जातो. ‘ ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे; शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी, पुढे पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे..इत्यादी इत्यादी. अर्थात समीक्षक अजूनही तिचा अर्थ लावतात म्हणे…! (?) वास्तव चित्र असूनही शब्दवर्णनामुळे त्या कवितेला किती श्रेष्ठ म्हणायचे (कल्पनेच्या अभावामुळे ) असा विचार डोकावतोच. तरिही तेव्हा लक्षात हे घ्यावे की, ते संपूर्ण चित्र एक प्रतिमा होऊन जाते. ‘पाऊस, श्रावणमास, मेघांचा कापूस’ या सारख्या कवितांमधून केवळ निसर्गनिरिक्षणच दिसून येते. त्यात कल्पनेला अधिक वाव नाही असे वाटते. ‘मेघांचा कापूस’ कविता मला तशीच वाटते.

फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा.
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा:
त्यातहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी:
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी.

निसर्गात रमणारा, सुंदर-सुंदर वर्णन करणारा कवी, आनंदाची पखरण करणारा कवी प्रेम कविताही करतो पण त्यालाही दु:खाची किनार दिसते. प्रीती हवी तर या कवितेत कवी म्हणतो-

प्रीती हवी तर जीव अधी कर अपुला कुरबान,
प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान!
किंवा
‘प्रीती व कर्तव’ या कवितेत कवी म्हणतो-

प्रीतीचा पथ हा भयाकुल दिसे सौंदर्य- सौदामिनी
डोळ्यांना क्षण तेज दाखवुनी या अस्तंगता हो क्षणी:
चित्तांमाजी विकारसिंधू खवळे चांचल्य जीवी भरे,
नेत्रातून उदास तेज जगती वेड्यापरी वावरे, –

‘कवीची इच्छा’ या कवितेत शेवटच्या ओळीत कवी म्हणतो-

पुरे संबंध प्रेमाचा -नको हा खेळ प्रेमाचा
खरा जो प्रीतिचा प्याला जगी प्याला, सुखी झाला…

वर उल्लेखलेल्या कवितांमधून दिसते की, कवी प्रेमाच्या बाबतीत जरा काही अंतर राखून आहे, अर्थात कवीचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यामुळे जे दु:ख वाट्याला आले तेच कवितेमधून व्यक्त होताना दिसते. प्रेम उत्कट आहे तर दुसर्‍या बाजूला ते काही अपेक्षा बाळगते. आपल्या मनातील प्रेमभावना ते निसर्गातूनच भरून काढतात. ‘अरुण’ याकवितेत दिवस हा प्रियकर तर रजनी प्रेयसी अशी कल्पना दिसून येते. ‘फुलराणी’ मध्ये फुलराणीच्या व किरणाच्या मिलनाचे वर्णन कवितेत येते. निसर्गाच्या माध्यमातून कवी आपले प्रेम व्यक्त करतो. पण ते प्रेम कोणावर आहे, याचा मात्र उलगडा होत नाही. बालकवींच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्ये हे की, शब्दांना ते एक वेगळेच रुप देतात. जसे ‘कळी’ ला ‘फुलराणी’ काजव्यांना ‘इवल्याशा दिवल्या’ म्हणतात. ‘पक्षांना’ ‘सृष्टीचे भाट’ म्हणतात. आणि मेघांना ‘गगनातले व-हाडी’ म्हणतात. बालकवींना मानवी व्यवहारातील भावना निसर्गात दिसतात. आणि भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणूनही ते निसर्गाशी एकरुप झालेले दिसतात. बालकवीच्या भाषेत अवीट गोडवा आहे. जसे चाखू तसा त्याचा गोडवा वाढत जातो. बालकवींच्या बर्‍याच कविता ह्या निसर्गविषयक आहेत. प्रेमपर, तात्त्विक, वैचारिक, असे विविध वर्गीकरण केले तरी त्यांची प्रमुख कविता ही निसर्गविषयकच आहे त्यात काही वाद नाही. कवितेमधील प्रतिमा या निसर्गविषयकच आहेत. त्यांच्या चरित्रात म्हटले आहे की, बालकवीं जेव्हा कविता करायचे तेव्हा एखादी कविता मनाजोगती उतरली नाही की, त्या कागदाचा चुरगाळा करून टाकायचे किंवा फाडून तरी टाकायचे. किंवा पुन्हा-पुन्हा लिहून काढायचे. त्यांच्या अशा कितीतरी कविता अपूर्ण आहेत. असे असले तरी निसर्गाशी एकरुप झाल्यामुळे त्या र्‍हदयस्पर्शी उतरतात. बालकवी जात्याच सौंदर्यवादी होते. सृष्टीतील चैतन्यावर त्यांचे प्रेम दिसून येते म्हणून तर ते म्हणतात-

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

बालकवी प्रसन्न वृत्तीचे तसे ते बालवृत्तीचे(च)आहेत. कधी-कधी खूप निराशही होतात. अर्थात त्यांचा बालस्वभाव हा बऱ्याचदा आडवा यायचा त्याबद्दल अनेकांनी तसे लिहिले आहेच. पण त्यांची निसर्गविषयक मराठी कविता कशी अजरामर झाली तिचे कारण प्रत्येकाला कवितेत वेगवेगळ्या अर्थांचे (प्रतिभेचे/ प्रतिमेच) पदर सापडतील. मला अजूनही त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या आनंदी-आनंद, अरुण, निर्झरास, संध्यारजनी, फुलराणी, तारकांचे गाणे, श्रावणमास, औदुंबर, खेड्यातील रात्र; पारवा,या कविता दरवेळेस वाचताना एक नवीन आनंद देतात. तेव्हा त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद घेतला तरी तो अपूर्णच वाटतो. मात्र शब्दांच्या साह्याने चित्र निर्माण करणारा एखादाच कवी जन्माला येतो. अनेक मोठ-मोठ्या कवींचा सहवास लाभलेला हा कवी आयुष्याच्या अठ्ठावीस वर्षात दिडेकशे कविता (पूर्ण-अपूर्ण) विविध विषयांवरच्या लिहितात. गद्यलेखनही भरपूर करतात. तेव्हा बालकवी एक सृष्टीतला चमत्कारच होता असे म्हणून त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद (सकारात्मक/ नकारात्मक) घेतला तरी तो कमीच पडतो असे म्हणून थांबावेसे वाटते.

संदर्भ : लेखनासाठी कविता ‘समग्र बालकवी’ संपादिका श्रीमती पार्वताबाई ठोमरे ; व्हीनस प्रकाशन पुणे (आवृत्ती पहिली सप्टेंबर १९६६) यातून घेतले आहेत. [चरित्राविषयक माहिती आणि लेखनावरील काही प्रभाव त्यातलाच आहे]

-अपूर्ण

टीपः मला बालकवींच्या कवीतेबद्दल जे वाटले ते लिहिलेच आहे. तरिही,बालकवींच्या कवीतेवर आस्वादत्मक किंवा इतर पैलुंवर प्रकाश टाकणार्‍या, लेखात भर घालणार्‍या प्रतिसादांचेही स्वागत आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: