Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 8 जानेवारी, 2010

अंत:स्थ

एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण [जि.औरंगाबाद]येथील महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणारा तरुण प्राध्यापक.

‘अंत:स्थ’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहात एकूण पन्नासहून अधिक कविता आहेत. कवितांची विभागणी करायची ठरली तर, पहिल्या काही कविता शेतीशी संबंधीत तर बाकीच्या कविता या सामाजिक विषयांवरच्या आहेत. मराठी ग्रामीण कवितेच्या भाषेवर बराच काथ्याकूट मराठी साहित्यात झालेला आहे. पुर्वी ज्याला जानपद काव्य असे म्हटल्या जायचे. त्या काव्याची भाषा कोणती असावी, भाषेचे स्वरुप कोणते असावे, वगैरे. या कवितासंग्रहात कवीने शेतीशी संबंधीत कवितेसाठी खेडवळाची भुमिका पार पाडली आहे. आणि त्यातूनच तो आपला विचार मांडतो. ’तुव्ह सपन लुटलं’ कविता पाहा-

आरं शेतकरी दादा तुही अजब कहाणी
भूक बांधुनी पोटाले पितो घोटभर पाणी.
……………
अरं शेतकरी दादा धान नेल रं आडती
घेऊन रं मातीमोल तुल्हे मातीत गाडता
अरं शेतकरी दादा तुव्ह आयुष्य घटलं
सुखी पाहता सपन सारं रघट आटलं
अरं शेतकरी दादा तुव्ह नशीब फुटलं
हातपदरीचा घास तुव्ह सपन लुटलं (पृ.क्र.१५)

शेतक-याचं सनातन स्वप्न की, शेतीतून येणा-या उत्पन्नाने भविष्यकाळ सुखाचा होईल. पण मोंढ्यावर धान्य नेल्यानंतर तेथील दलाल धान्यांना मातीमोल भाव मागतात. रक्त आटवून सुखी स्वप्न पाहिलं जातं ते स्वप्न दलालाकडून लुटल्या जाते. या व्यवस्थेकडे कवी निर्देश करतो. एकूण सर्वच शेतकरी हे जमीनीशी निगडित आहे. ती जमीन पावसावर अवलंबुन आहे. पाऊस हेच शेतक-याचं जीवन आहे. सतत आभाळाकडे पाहणारा शेतकरी हे तर वर्तमानपत्राचं आवडतं चित्र आहे. अशाच आभाळाकडे डोळे लावणा-या ’परंपरा’ नावाच्या कवित अशीच आहे. आभाळातील चांदण्याकडं पाहत शेतकरी स्वप्न पाहू लागतो. या वेळेस चांगला पाऊस होईल. पीकपाणी चांगले येईल. मी मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवीन. मुलगा साहेब होईल.मी गावभर फिरुन सांगेन ‘मह्या पो-या सायेब झालाय’. पण दोन-चार सरी पडतात आणि शेतक-याचं स्वप्न ढेकळात विरघळून जातं. पाहता पाहता शेतक-याचं पोरगंही शेतकरीच होतो. आता बापाची जागा तो घेतो. पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पाहतो. त्याचंही स्वप्न विरघळून जातं, अशी ती ‘परंपरा’ पुढेच चालूच राहते. ’मातीशी नातं’ ’कष्टाचं वान’ ’आस’ ’शाप’ ’रान मातीची कहाणी’ ’आसवांचा महापूर’ या अशा कवीतेतून शेती आणि शेतक-याच्या प्रश्नाभोवती त्यांची कविता फिरतांना दिसते. असे असले तरी, शिवारातील शेतकर्‍याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं अशी कविताही या काव्यसंग्रहात आहे. उदा. हिरवा शालू-

राज्या-परधान्या
जुंपली तिफन
दुबार पेरणं-माळरानी
फुटले अंकुर
शेवाळलं रान
पावसाचं गाण-शिवारात
……………
…………..
हिरवा शालू
शेती अंथरला
शब्द मंतरला-तिन्हीसांजा
शालू हिरवा नटली धरती
मनाला भरती-कुणब्याच्या. [पृ.क्र.१८]

शेतीभातीच्या कवीतेनंतर कवीचं मन समाजातील व्यवस्थेकडे वळतांना दिसते.’पुरे झाले आता’ कवीतेत धर्म, संस्कृती, देव, धर्मसुत्र या सर्व गोष्टींनी मानवतेचे लचके तोडले जाते असे कवीला वाटते. दगडाच्या देवाला किती मानपान आहेत. पण माणसाला काय ते दारिद्र्य. नैवेद्य,नवस, पुर्ण करण्यासाठी किती ही माणसांची धावपळ. धर्म, वेद, यांनी माणूस संमोहित झाला आहे. आणि या अस्त्राद्वारे सामान्यांना लुटण्याचे एक कुरण प्रस्थापितांकडे आहे. कवी म्हणतो-

पुरे झाले आता
देव्हारे माजविणे
पाषाण पूजविणे-मंदिरात
माणूस माझा देव
मानवता तो धर्म
माणुसकी ते कर्म-माणसाचे. [पृ.क्र.२८]

हिंदू धर्मातील काही चालीरिती, परंपरा, याची चिकित्सा कवी करु पाहतो. सामाजिक परिवर्तन कवीला अपेक्षीत आहे. माणूसकी धर्म श्रेष्ठ आहे, या वर कवीचा भर आहे. धर्म-कर्माच्या व्यवस्थेमुळेच इथे विषमता निर्माण झाली असे कविला वाटते. इथे कवीची भुमिका ही सुधारकाची दिसते. ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे’ या मानसिकतेला बदलण्याचा विचार कवी व्यक्त करतो. त्यांची ’ ‘सत्यधर्म’ नावाची कविता बोलकी आहे. शतकानुशतके खुळचट धर्माच्या कल्पना लादून समाजमनाला पंगु बनवल्या गेलं. दगडांना शेंदूर फासवून त्यांनी भोगस्थाने निर्माण केलीत. आता ही शेंदरी दैवते लाथाडली पाहिजेत. भ्रामक धर्मशाही उलथवली पाहिजेत. आणि तुका, फुल्यांनी, सांगितलेला ‘सत्यधर्म’ जाणुन घेतला पाहिजे. अशाच पुरोगामी विचाराने भारल्या गेलेल्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. ‘तुकोबा तुझेही हात सनातनी असायला हवेत’ ‘ सनातनी पहाटेचं सावट’ ‘दिवसही वै-याचा आहे’ या कवितांमधून कवी आधुनिक विचारांशी नातं सांगतो. काही कविता राजकारणावरही आहेत.’बाबा हो लोकशाही’ कवीतेत कवी म्हणतो-


सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
……………..
…………..
पाच वर्षानंतर फेरी येते,
ज्या हातानं, आमची मुस्काट दाबली,
भाकरी हिसकावली
तीच हातं
आमच्यासमोर जोडली जातात
झोळी पसरुण भीक मागतात अन
कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
दिसून येतं
पुन्हा एकदा जैसे थे
लोकशाही बाबा लोकशाही.[पृ.क्र.५०]

‘अदिमाचा हुंकार-शब्द’ ही कविता अधिक सुंदर आहे. शव्द उठवतात रान, शब्द पेटवतात रान, शब्द जीवनगाण कधी, शब्द वरवरचा उमाळा कधी. ही दीर्घ कविता या काव्यसंग्रहाची सर्वांगसुंदर कविता ठरावी. ‘लोकशाहीचं गाणं’ ‘गुलामीचं हस्तांतर’ ‘हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतोय’ या आणि अशा अनेक कविता व्यवस्थेबरोबर स्वार्थी राजकारणावर भाष्य करतांना दिसतात. तसेच ढोंगी परिवर्तनवाद्यावरही ते आसुड ओढतात. परिवर्तनाच्या नावाखाली परिवर्तनवादी शोषण करीत आहेत. दांभिक लोक, लोकशाहीच्या नावाखाली लोकांची लूट करत आहेत. त्यावरही कवी प्रहार करतो. कवी म्हटला की, आईवर कविता ही आलीच पाहिजे. ‘माय माऊली’ ‘मायमही’ ‘सकळांची आई’ अशा कविताही वाचनीय आहेत. एकूण काय तर वर्तमानाचं भाष्य कवितेत आहे. स्वातंत्र्य आणि त्याच्या सुखाच्या कल्पनांना तडा गेल्यानंतरची वेदना कवितेत आहे तसा विद्रोहही आहे. सामान्य माणसाच्या सुखाचा शोध कवीला घ्यायचा आहे. भावना भडकविणारी वृत्तपत्र, स्त्री देहाचे नागडे दर्शन घडविणारे प्रसारमाध्यमं भारताची प्रतिमा होत आहेत. सामान्य माणसाच्या स्वप्नभंगाची भावना कवितेतून वाचायला मिळते. असे असले तरी काही दोष ज्याकडे लक्ष वेधले पाहिजे असे वाट्ते की, धनदांडगे शेतकरी सोयी-सवलती घेतात त्यावर भाष्य दिसत नाही. मोजक्याच शेतक-यांचं चित्र, तेच-तेच दयनीय अवस्थेतील शेतक-याचं वर्णन असा विचार कविता वाचतांना डोकावतो. तसेच परिवर्तनाची आस आक्रस्ताळपणे येते, असे काही कविता वाचतांना जाणवते. अशी कविता म्हणून मी ’हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतो’ ’आव्हान’ ’परिवर्तनवादी’ अशा काही कवितांचा नामोल्लेख करेन. बहुतांश कविता मुक्तछंद आणि अभंगाच्या आकृतीबंध असलेल्या आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची कवीतेवर भाष्य करणारी प्रस्तावना आहे. कवितेचा संदेश ‘माणूसकी’ आणि संघर्ष’ आहे. आणि याच भावना अधिक संवेदनशीलतेने, पुढील काव्यसंग्रहात अधिक जबाबदारीने याव्यात या करिता मी कवी मित्राला शुभेच्छा देईन.
अंतस्थ

‘अंत:स्थ’
डॉ.सर्जेराव जिगे
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत ८०/- रु.


प्रतिसाद

 1. सर , या सर्व कविता ब्लोगवर टाकता आल्यास चांगले होईल. ३.५% च्या समाजात या कविता मुद्दाम दुर्लक्षित केल्या जातील. कारण ज्ञान फक्त आम्हालाच आहे

 2. सर, मस्त कविता आहेत हो जिगेंच्या.
  आवडल्या.
  गांधीवादी आणि रिव्हॉल्वर हे तर कायमचे एकत्र सूत्रच झाले आहे.

  डॉ.सर्जेराव जिगे यांचा ब्लॉग का नाही? मराठी शिकवतात म्हणजे त्यांना आंतरजालीय मराठीची जाणीव ही असलीच पाहिजे. नसेल तर
  व्हायला हवी! हल्ली ऑफलाईन लिखाणाची ही उत्तम सोय आहे तेव्हा तो ही प्रश्न नाही. मराठीच्या प्राध्यापकाने काळा सोबत राहिलेच पाहिजे आमची ही मागणी त्यांच्या पर्यंत नक्की पोहोचवा!

  आपला
  गुंडोपंत

  • प्रतिसादाबद्दल धन्यवाद पंत, कितीतरी वेळा झालंय त्यांना सांगून की नेटाशी जोडलेले राहा.
   आता संगणक घेणार म्हणत होते. आपला निरोपही कळवीनच.

 3. पुरे झाले आता देव्हारे माजविणे पाषाण पूजविणे-मंदिरात माणूस माझा देव मानवता तो धर्म माणुसकी ते कर्म-माणसाचे.

  माझ्या मनातल सर बोलत आहे असा भास होतो. सर ची आपण परवानगी काढली तर मी त्यांच्या नावाने इ मेल पासून ब्लॉग तयार करून संपादन करण्याचे, प्रकाशित करण्याचे सर्व काम आनादाने सेवा म्हणून करण्यास तयार आहे. त्याच बरोबर मराठवाड्यातील लेखक/ कवी यांच्या साठीही मी हें काम आनंदाने करेंन माझा
  इ मेल thanthanpal@gmail.com


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: