Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 9 ऑगस्ट, 2010

कोणता मानू मी विठठल ?

महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची ‘पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाची भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली,

30072010490
माढा येथील विठोबाचे मंदिर

पौंडरीकक्षेत्रे, पंडरीपूर, पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते. विठोबाची मूर्ती पंढरपूरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही.

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।

अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन

30072010079
विठ्ठल

मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती. म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माढ्याला पोहचलो. मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील काही संदर्भांची तोंडओळख करुन देतो.

विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा

30072010494
विठोबा…

ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविल्या गेली आहे. ” एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.” सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आणन्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. पुढे ”अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या ‘माढा’ या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.

श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.

30072010496
पायातले तोडे

तर मूर्ती विठ्ठमूर्ती माढ्याला हलविली गेली. त्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी माढ्याला पोहचलो. सावता माळी च्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥

सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व

30072010495
मंत्राक्षर

वर्णनापेक्षा दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
” श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा:|| श्री
वत्स” [पृ.क्र. १२९]

प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ”पांडुरंगमाहात्म्य” चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी

१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे” [पृ.क्र.१३९]

ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ”मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.


अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ”श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ”आद्य मूर्तीचा शोध” हे प्रकरण वरील विषयावर आहे.


प्रतिसाद

  1. देहरूपी विटेच्या (अस्तित्वाच्या) आधाराने जेथेतेथे विठ्ठलच उभा आहे. त्यात अस्सल – नक्कल नाहीच.

  2. आस्तिक असाल तर खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे….पण आस्तिकांना काहीही सांगितलं तरी पटतं….हे पण आणि ते पण….ते दोन्ही ठिकाणी गर्दी करणार….पावण्याशी मतलब…बाकी खरा आहे की खोटा कोण उचापत्या करतंय. 🙂
    नास्तिक असेल तर काय…कुत्ता जाने चमडा जाने…आपल्याला काय त्याचे?
    बिरुटेसाहेब, तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूला आहात? की कुंपणावर बसून मजा पाहताय आणि ज्याचं पारडं भारी त्यात मत टाकणार? 😉
    सांगा सांगा गुर्जी..ह्या टोपीखाली दडलंय काय? 😀

  3. “जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले।
    तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा॥”
    या उक्तीनुसार मला असं वाटतं की वारकरी आणि भक्त मंडळी यांच्या अंतरात नांदत असलेला विठ्ठल मह्त्त्वाचा मग स्थान किंवा मूर्ती कुठेही असो. संत एकनाथांनी सुध्दा तीच शिकवण दिली, काशीहून आणलेले गंगाजल चंद्रभागेच्या वाळवंटात तहानेने व्याकूळ गर्दभाला पाजून त्यांनी त्यांच्यातल्या विठ्ठलाचे दर्शनच दिले.

  4. देव देव्हारयात नाही तर तनामनात ओतप्रोत भरलेला आहे.. हे धर्मवाद्यांना कधी कळणार?

  5. काया हि पंढरी आत्मा तो विठल

  6. pahun yeto aani sangto

  7. dev ahe pandhari, antarmanane paha.


Leave a reply to Amol उत्तर रद्द करा.

प्रवर्ग