Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 26 फेब्रुवारी, 2014

फ़्यंड्री..!!!

राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ़्यांड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ़्यांड्री.

सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.

कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या ‘शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब-या’ ताकदीनिशी आला आहे.

आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला शिवाशीव आणि भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरली आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे.

आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्या आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब-या. गावासमोर आणि शालू समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे.

दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.

पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही.

जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब-या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की पाहा.

आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे.

व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच….!!!
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: