कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय.
कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते.
नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात लेखकाने देव आणि राक्षस यांच्या मनोभूमीतून काही पात्रे रंगविली आहेत. देवलोक म्हणजे उच्च वर्णीय आणि राक्षस लोक म्हणजे दलित समाज असे लेखकाला सांगायचे आहे. दानवांचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचा राजा बृहस्पती या दोघांच्या नीतीमधून नाटकाचा पहिला प्रवेश सुरू होतो. शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झालेली असते आणि ते मृतांना जिवंत करू शकतात. शुक्राचार्याची मुलगी देवयानी आणि बृहस्पतीचा मुलगा कच यांच्यातील प्रेमामुळे संघर्षाची ठिणगी पडते.
कच हा देवाचा म्हणजेच देव लोकांचा पुत्र आणि आपला शत्रू असूनही केवळ देवयानीच्या त्याच्यावरील प्रेमामुळे दानवाचे गुरु शुक्राचार्य आपल्या मुलीच्या प्रेमाखातर युद्धात मृत झालेल्या कचाला पुन्हा जिवंत करतात मात्र जिवंत झाल्यावर कच हा देवयानीसोबत विवाहाला तयार नसतो तो देवयानीसोबत विवाहाला नकार देतो संतप्त झालेली देवयानी कचाला शाप देते ती म्हणते, ”दानवाच्या पोरा ! राक्षसांच्या भावनांशी खेळणारा तू विसाव्या शतकाच्या अखेरीस, भूतलावर मागास वर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात वाढावे लागेल आणि तेव्हा तुला या संजीवनीचा मोह धरल्याचा पश्चात्ताप होईल” आणि नाटकाचा पहिला प्रवेश संपतो.
नाटकाचा दुसरा प्रवेश हा आधुनिक काळातला म्हणजेच विसाव्या शतकातला आहे. देवयानीने दिलेला शाप, देव आणि दानव अशी नाटकाच्या सुरुवातीची उभी केलेली पार्श्वभूमी पुढे संपूर्ण नाटकाला कलाटणी देते. कमलाकर आराध्ये यांचं एक सुखवस्तू कुटुंब, त्यांच्या पत्नी विमलाबाई आराध्ये, मुलगी सुकन्या, मुलगा सुदर्शन . असा हा परिवार. कमलाकर आराध्ये यांचा छोटासा व्यवसाय आहे. विमलाबाई गृहिणी, आणि महिला मंडळाच्या कामात सतत व्यस्त असतात. मुलगी सुकन्या नव्या विचारांची तर मुलगा सुदर्शन हा मात्र जुन्या विचारांचा असे हे सुखी कुटुंब.
अशा या सुखी कुटुंबात शासनाचं एक पत्र येतं आणि नाटकातील मुख्य विषय सुरू होतो. भारत सरकारने एक अध्यादेश काढलेला असतो आणि त्यात असं नमूद केलेलं असतं की,” नवीन घटनात्मक तरतुदीनुसार पुढील महिन्यापासून केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या राखीव जागा खास अध्यादेशानुसार रद्द ठरविल्या आहेत गेली पन्नास वर्ष चालू असलेल्या सवलतीमुळे राष्ट्र आता वर्णवर्गविरहित झाले असल्याचे केंद्र शासनाची खात्री आहे परंतु अजूनही संपूर्ण एकात्मता साधण्यासाठी शासनाने काही नवी पावले उचलेली असून त्यातले हे एक पाऊल आहे. दुसरे पाऊल असे आहे की या एकात्म समाजाचे सर्व जगाला दर्शन घडावे म्हणून नव्या कायद्यानुसार प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष सामाजिक समतेचा भाग म्हणून कायद्याने ठेवावा लागेल. असा मागासवर्गीय आपल्या कुटुंबात घेतल्याशिवाय रेशनकार्ड, गॅस, लायसन्स, पासपोर्ट इत्यादी बाबी देण्यात येणार नाहीत. सबब अशा कुटुंबानी व मागासवर्गीयांनी त्या संदर्भात योग्य ती कागदपत्रे जवळच्या समता अधिका-यांकडे जमा करावीत. समता विनिमय केंद्रावर उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय याच्या स्वतंत्र याद्या लावलेल्या असून, त्यातून आपल्या पसंतीचे सवर्ण व मागासवर्गीय निवडता येतील. त्यातूनही निवड न होऊ शकल्यास शासन देईल ती निवड मान्य करावी लागेल. ही समता विनिमय योजना प्रथम दहा वर्षाकरिता राबविण्यात येईल”
सरकारने काढलेल्या या अध्यादेशामुळे आराध्ये कुटुंबात ‘कच-या धिवार’ नावाचा मागासवर्गीय राहायला येतो. कमलाकर आराध्ये आणि सुकन्या पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्या तरुणाला स्वीकारतात विमलबाई आणि सुदर्शन यांना मात्र या गोष्टीचा राग येत असतो. सुदर्शनचे आणि कच-याचे जातीवरुन, संस्कृतीवरुन नेहमीच खटके उडत असतात दरम्यान सुदर्शन न्यायालयात या आदेशाविरुद्ध दावा दाखल करतो.
आराध्य कुटुंबात कच-या चांगला मिसळतो. सुकन्या आणि त्याच्या मैत्रीचे सुर जुळतात त्या दोघात प्रेमाचे संबंध उभे राहतात. पुढे काय काय होतं ते नाटक वाचतांना मजा येते. मी मात्र नाटकाच्या शेवटाकडे येतो. कच-याचं शेवटचं स्वगत मला खुप आवडतं.-
”तू ऐकते आहेस ना देवयानी ? तुझ्या खेळांचा-शापाचा शेवट आलाय . संजीवनीच्या शोधात मी राक्षसाच्या पोटात शिरलो. तिथून तू मला इथल्या राक्षसांच्या पोटात ढकलंलस आणि इथल्या देवांच्या हातात दिलास हा माझा राक्षही देह. हे देव दानव जन्माचं शापित कडं भेदून मी आता जन्माला घालणार आहे माणूस ज्याला फ़क्त माणूस माहिती असेल. जो देवांच्या नावावर राक्षस होणार नाही की, राक्षसांच्या नावावर देव होऊन मिरवणार नाही. हे माणूसपण खूप छान आहे देवयानी. याला अमरत्वाची हाव नाही. देवपणास वाव नाही. चोरी लबाडी न करता, छान जगता येतं आणि सुखानं मरता येतं. इथं संजीवनीसाठी युद्ध नाही. मी तुझा आभारी आहे देवयानी. तुझ्या माणसांना मला दाखवता आले, देव दानवांचे रुसवे फ़ुगवे आणि अंधश्रद्धेचे बुडबुडे. मी त्यांना सांगू शकलो, राक्षसातले अमानवीपण आणि देवत्वातला फोलपणा. मी सुकनेच्या पोटी जोजवेन माणूस, ज्याच्यावर जातिधर्माचे अक्षांश-रेखांश नाही, माणुसकीचा अटळ धृव आणि माणूसपणाचे विषवृत्त असा हा आगळाच भूगोल वाढवेन सुकन्याच्या पोटी ”
आधुनिक काळातही अजूनही स्पृश्य-अस्पृश्य कसं दडलेलं असतं त्याचं उत्तम चित्रण या नाटकातून येतं. नाटकाची भाषा अगदी सहज आणि संवाद अगदी खुशखुशीत असल्याने नाटक केव्हाच वाचून संपवून जाते. उरतो तो फक्त प्रश्न मनात की असं होऊ शकतं ? असं करता येईल ? सामाजिक समतेचा असा प्रयोग राबविता येईल ? की केवळ मागच्या पानावरून पुढे जायचं काहीच न करता ? अशा असंख्य प्रश्नासहित हे नाटक एकदा वाचलंच पाहिजे.
कोण म्हणतं टक्का दिला. (दुवा बुकगंगा)
प्रतिक्रिया व्यक्त करा