एका रविवारची ही गोष्ट. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचाही कंटाळा आला होता. ऊन तर मी म्हणत होते. कुठे बाहेर जाऊ नये असं बेकार ऊन. सुट्ट्यात पाहुण्यांचा गोतावळा. घर गजबजून गेलेलं. मलाच जरा सुटका हवी होती. मग निघालो आमच्या औरंगाबादच्या लेणीला.
![]() |
ही वाट लेणी कडे जाते..
|
![]() |
बोधीसत्व..
|
मराठवाड्यात जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत, आता त्या माहिती बाबत काही नवीन राहीलं नाही. स्थापत्य आणि शिल्पकलेच्या परमोत्कर्ष वेरुळ येथील कैलास लेणी व अन्य लेणीत दिसून येतो. प्राचीन शिल्प स्थापत्य आणि चित्रकलांचा उत्कर्ष अजिंठा लेणीत बघायला मिळतो. शैलगृह स्थापत्याचा दक्षिणेतील पहिला आणि उत्तम आविष्कार म्हणजे पितळखोरा येथील लेणी. (वल्ली बरोबर जायचं आहे, म्हणून मी तिथे जात नाही) या शिवाय, धाराशीव, खरोसा, आणि आमची औरंगाबादची बौद्ध लेणी. या सर्व लेण्यांनी मराठवाड्याच्याच नव्हे देशाच्या वैभवात भर घातली आहे. आमचा मराठवाडा संतांची भूमी. आमच्या मराठवाड्याला समृद्ध अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परंपरेचा इतिहास आहे. मराठवाड्याचा शिल्पकलेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ”जावे पा वेरुळा जेथे, विश्वकर्मियाने सृष्टी केली” वेरुळची लेणी म्हणजे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने घडवलेली अद्भूत सृष्टी.
मराठवाड्याच्या या शिल्प स्थापत्य परंपरांचा प्रारंभ इसवी सन पूर्वी पहिल्या शतकात झाला असे म्हणतात. प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला आणि शिल्प स्थापत्य कलेला बहर आला. अजिंठ्याचा दगड म्हणजे कठीण खडक. ज्वालामुखी किंवा तत्सम गोष्टींमुळे त्याला एक टणकपणा आलेला तो खडक. बारीक छिद्र असलेल्या या खडकाला. कारागिरांनी घासून चांगला गुळगुळीत केला त्यावर चिखलांचा लेप दिला. अभियंते आणि अभ्यासक त्याला ‘स्टको प्लास्टर’ असे म्हणतात. सांगायची गोष्ट अशी की आमच्या औरंगाबादपासून डोंगरांची रांग सुरु होते, ती रांग थेट वेरुळ आणि पुढेही जाते. वेरुळच्या लेणी अगोदर औरंगाबादची लेणी कारागिरांनी कोरली असावी असे मला वाटते. कारण इथे हा प्रयोग फ़सला आणि कलाकार पुढे डोंगररांगांकडे गेले असावेत असे मला वाटते. (माझ्या म्हनण्याला काहीही आधार नाही) अशाच बौद्ध लेणीची ही गोष्ट.
![]() |
बोधीसत्व
|
![]() |
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बुद्ध
|
बौद्ध धर्मीय लेण्यांचा कालखंड साधारणपणे पाचशे पन्नास ते सातशे पन्नास समजला जातो. गिरीशिल्प खोदण्याची कल्पना ही बौद्धांचीच असे म्हटल्या जाते. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी तसेच भिक्षूंना वास्तव्य करण्यासाठी विहार आणि चैत्य रुपाने या लेण्या खोदण्याची प्रथा सुरु झाली. हिंदूंनी आणि जैनांनी त्याचं अनुकरण केलं. अर्थातच इ.स.पूर्व शतकात सुरु झालेली ही गिरीशिल्पांची निर्मिती सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रागतिक अवस्थेत होती. मुळातच हीनयात काळात बौद्धधर्मप्रसाराचे तंत्र मूर्तीपूजनाच्या पलीकडील होते. केवळ प्रतिकात्मक गोष्टींचा उपयोग करुनच धर्मप्रसाराची दिशा ठरवली जात असे. त्यामुळे लेण्यामधील शिल्पकधा तशी साधीसूधीच आहे.
औरंगाबादला पोहचलात की बीबीका मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे पाहून झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या ही बौद्ध लेणी. लेणीच्या पायथ्याशी आपल्या माता-पित्याच्या स्मरणार्थ अनेकांनी गौतमबुद्धांच्या धातूतील मूर्त्या लावलेल्या दिसून येतात. शंभर एक पाय-या चढून गेलात की तिकिट घर लागते. दहा रुपये देऊन तुम्हाला लेणीकडे जाण्यासाठी प्रवेश मिळतो. या डोंगररांगावर ऐकून पाच लेण्या आहेत.
सुरुवातीची लेणी आकारमान व शिल्पकला यांच्या दृष्टीने हे लेणी मनात भरणारी नाही. भिक्कूंच्या निवासस्थानासाठी ही जागा वापरली जात असावी. या लेणीची गंमत अशी सांगितल्या जाते की भगवान बुद्धाला पार्श्वनाथ किंवा महावीर समजून काही जैनमुनींनी लेणीचा ताबा घेतला होता व तो पुढे सोडलाही होता. (संदर्भ नाही) लेण्यांची शैली पहिल्या शतकातील व मथुरा शैली अथवा गांधार शैलीमधे मोडत असावी. अजिंठा लेण्यातील बहुतेक प्रतिमा या धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेमधे हात असलेले आहेत आणि इथेही तशाच प्रतिमा आहेत तेव्हा लेणींचा काळ सारखा असावा असे वाटायला लागते.
![]() |
ध्यानमुद्रेतील बुद्ध
|
![]() |
बहुधा बोधीसत्व आणि मद्दी (विश्वंतर जातक)
|
लेणी क्रमांक चार. चैत्यगृह आणि स्तूप. एक साधे शिल्प आहे . सामुदायिक पुजेअर्चेसाठी ही जागा वापरली जात असावी. समोरचा भाग नष्ट झालेला दिसतो. छत कमानदार असून अष्टकोणी खांबावर आधारलेला आहे. स्तूपावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम नाही. सूर्याची किरणे सरळ या स्तूपावर पडावीत अशा पद्धतीने त्याची रचना केलेली दिसते, मात्र याच उद्देश्यानं हा स्तूप केला असावा असे म्हणायला काहीही आधार नाही.
लेणी क्रमांक तीन हे एक विहार असून पहिल्या आणि दुसर्या लेण्यातील विहारापेक्षा याचे स्वरूप जरा वेगळे आहे. आतील प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले दिसून येते. छताच्या वरच्या बाजूला पाने, फुले कोरलेली दिसतात त्या खाली उभ्या असलेल्या शालभंजिका कोरल्या आहेत. पत्येक खांबावर चक्रकार पट्टे कोरले असून त्यात सुंदर गुलाब पुष्पांचे कोरीव काम आहे. जवळ जवळ बारा खांब आहेत. वंदनागृहाच्या गाभार्यात भगवान बुद्धाची भव्य प्रतिमा खाली पाय सोडून धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहेत. एकाबाजूला सात पुरुष उपासिका आणि एका बाजूला सहा स्त्री उपासिका आराधनेसाठी बसलेल्या दिसतात. स्त्रीयांच्या अंगावर विविध अलंकार हातात पुष्पमाळा दिसतात. याच लेणीतील पट्टुयांवर युद्धाचे दृष्य कोरलेले दिसून येते. तिथेच भगवान बुद्ध कोचावर पहुडलेले दिसून येतात. हीच लेणी या लेण्यांचा आत्मा आहे.
![]() |
स्तंभ
|
![]() |
धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्ध
|
लेणीक्रमांक दोन. हा एक विहार असून यात भिक्कूंना राहण्यासाठी आजूबाजूला खोल्या नाहीत. हे चैत्य नेहमीप्रमाणे नाही. हिंदू मंदिराप्रमाणे त्याची अनुकरण केल्यासारखे वाटते. विहार भव्य आहे. अंतगृहही विशाल आहे. प्रवेशद्वार मोठे आकर्षक आहे. प्रवेशद्वारी दोन्ही बाजूला कमळपुष्प घेतलेले दोन उंच द्वारपाल आहेत. त्यापैकी एक विद्याधर आणि एकाच्या मस्तकावर पाच फणे असलेला नाग आहे. विहाराच्या गाभार्यातील मुख्य प्रतिमा भगवान बुद्धाची आहे. खांबाच्या वरच्या बाजूला गंधर्व असून जवळच चामरधारकही आहेत. भगवान बुद्धाच्या प्रतिमेकडे आदरपूर्वक पाहत असलेले काही उपासक आणि उपासिका दिसतात.
लेणीक्रमांक एक हाही एक मोठा विहार आहे. दरवाजा खिडक्या असलेले अंतगृह आहे. त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. पडवीत खांब आहेत. खांबावर नक्षीकाम केलेले दिसून येते. छताचे वजन पेलण्यासाठी उभ्या केलेल्यां खांबांवर सुंदर स्त्री शिल्पे आहेत. वस्त्र, अलंकार त्या काळातील वेशभूषांचे आणि अलंकाराचे उत्कृष्ट दर्शन घडवितात. कलाकुसर अत्यंत मनोहर आहे. प्रवेश द्वाराची चौकट नक्षीकामाने मढवून काढलेली आहेत. विहाराच्या पश्चिम बाजूला खिडकी दरवाजांच्यामधे कमलासानावर भगवान बुद्धाची प्रतिमा विराजमान असून त्यांच्या बाजूला चामरधारी सेवक आहेत. त्यांचे सिंहासन पाच फणे असलेल्या नागराजाने स्वतःच्या डोक्यावर धारण केले आहे. याच भिंतीच्या पडवीत डाव्या भागात भगवान बुद्धांच्या सात आकृती ओळीने कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूलाच दोन बोधिसत्वाची सुंदर शिल्प आहेत. लेण्यांच्या एका भिंतीवर कोरण्यात आलेली एक सुंदर मत्स्याकृतीही आहे.
![]() |
नंद उपनंद नाग अनुयायींसह बुद्धमूर्ती
|
![]() |
उपासकांसाठीच्या खोल्या
|
लेण्यांमधे खूप शिल्प नाहीत. पडवीत मात्र खूप शिल्प आहेत. उजेडाची कोणतीही सोय नसल्यामुळे फोटो काढणे कठीण जाते. बाकीच्या तीन लेण्या या लेण्यांच्या विरुद्ध बाजूला आहेत. काही दोन एकशे पाय-या चढून गेलात की एक मोठी दगडी कपार लागते. सुरुवातीलाच एक क्रमांकाच्या लेणी म्हणून जी आहे तिथे दोन शयनकक्ष आहेत. दुसरी लेणी म्हणून जे आहे ते चैत्यगृह आहे. आणि आत स्तूप आहे. तिस-या आणि चौथ्या लेणीत गौतमबुद्धांचे विविध शिल्प कोरलेले दिसून येतात. पाचव्या लेणीत खांब आणि काही गौतमबुद्धांची शिल्प आहेत. प्रामुख्याने खांबांवर नक्षीकाम अधिक दिसून येते तर जागोजागी गौतम बुद्धांची शिल्प दिसतात म्हणूनच या लेणीला दिलेलं बुद्ध लेणी हे नाव सार्थ ठरतं.
![]() |
अवलोकितेश्वर पद्मपाणी
|
![]() |
चैत्यगृह
|
सायंकाळी मी चार वाजता लेणी बघण्यासाठी गेलो होतो. अंधार पडल्यावर लेणी उतरु लागलो. आणि इतिहासाच्या आठवणी ढवळून निघाल्या. देवगिरीचा यादव सम्राट ज्याने कलाकारांना राजाश्रय दिला. चालूक्य कला परंपरांची आठवण झाली. यादव शैलीने स्वत:चा एक ठसा उमटवला होता. मंदिरं असो, लेण्या असो, मराठवाड्याची कला दिमाखाने आजही मिरवत आहे, विद्यापीठाच्या जवळ असलेल्या या बौद्ध लेणीनेही वैभवात भरच घातली आहे. गौतम बुद्धांच्या विविध प्रतिमा आणि वेगवेगळी शिल्प इथे आहेत. पण, इथे लागतो उत्तम छायाचित्रे काढणारा आणि इतिहास माहिती असणारा माणूस. (वल्लीसारखाच) विद्यापीठाजवळील पहिल्या पाच लेण्यांची तोंडओळख आपण पाहिली. बाकीच्या चार लेण्यांची माहिती पुढील भागात…. पहिल्या गटाच्या पूर्वेला दुसर्या गटापर्यंत जाण्यास त्याच डोंगररांगामधून मार्ग आहे. क्रमांक सहापासून नऊपर्यंत जी लेणी आहे, ती दुसर्या गटात मोडते. पहिल्या लेण्यांपेक्षा हा भाग जरा उंचीवर आहे. दुसर्या गटातील नववे लेणे सर्वात मोठे आहे. लवकरच लिहितो….!
![]() |
वज्रपाणी
|
![]() |
बोधीसत्व —-> शलभंजिका
|
एकेक शिल्प आणि त्यांची ओळख वाट्सपवर करुन दिल्याबद्दल….. वल्लीचे उर्फ प्रचेतसचे मनःपूर्वक आभार. मी लेणी बघत होतो आणि वाट्सपवर हे कशाचं शिल्प, ते कशाचं शिल्प असं विचारत होतो, त्यांच्याच कटकटीमुळे हे लेखन करावं लागलं. थँक्स रे मित्रा.
प्रतिक्रिया व्यक्त करा