सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर.
नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती . सैराट चित्रपटानेही ६६ व्या बर्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाव केल्याचे वाचनात आले. प्रसिद्ध नसलेल्या सामान्य कलाका्रांना सोबत घेऊन, एक वेगळा अनुभव, एक वेगळा विषय कलात्मक पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा नागराज मंजुळे यांनी सैराट मधून कायम ठेवल्याचे दिसून येते.
सैराट, ही तशी एक ग्रामीण करमाळ्याच्या भागात घडत असलेली परश्या (आकाश ठोसर) आणि अर्चना (रिंकु राजगुरु) यांची सरळ साधी प्रेमकथा. कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं. गावगाड्यातील विषम व्यवस्थेतील जातीच्या उतरंडीतून अशी जेव्हा कथा घडत जाते, तेव्हा ती कथा जरा प्रेक्षकांच्या मनात तळाशी खोल जाते. सैराटा चित्रपटाची प्रेमकथा अगदी हिंदी, मराठी चित्रपटातल्या प्रेम कथेप्रमाणेच याही चित्रपटातच रुटीन वळणावरुनच जाते. वरीष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणा-या तरुण तरुणीची ही प्रेमकथा. महाविद्यालयीन जीवन जगणा-यांना आणि जगून गेलेल्यांना आणि चित्रपटातील विविध प्रसंगातून हे नेहमीच पाहिलेलं असल्यामुळे प्रेम प्रसंगाचं काही नाविन्य वाटणार नाही. गावातील प्रतिष्ठीत पाटलाची मुलगी जी अतिशय धीट स्वभावाची, कोणाचीही भीड न ठेवणारी अशी आहे, गावात पाटलांची खूप दहशत आहे, हे विविध प्रसंगातून मंजुळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलं आहे. परशा हा कोळ्याचं पोर, सोबतीला जीव लावणारे लंगड्या, आणि सल्ल्या हे मित्र. परशाला आर्ची आवडते. दोघांचेही स्वभाव वेगवेगळे. असं हे लपून छपून चाललेलं प्रेम पाटलाच्या घरी कळतं. आणि मग पुढे प्रचंड मारहाण, गावात त्यांची असलेली दहशत, प्रिन्सचा वाढदिवस, शिक्षकाला मारलेला फटका, अशी सरंजामशाहीची प्रतिकं चित्रपटातून अनेकदा ठळकपणे येऊन जातात. संस्थाचालकांनी चालविलेल्या महाविद्यालयातून शिक्षकांना काय काय करावं लागतं एक ओझरता प्रसंगं अतिशय सुंदर आलेला दिसतो. परशाच्या घरच्यांनी गाव सोडून जावं म्हणुन आणलेला दबाव, प्रिन्सच दहशत, या गोष्टी असल्या तरी पूर्वार्धात प्रेमकथा अनेक लहान मोठ्या प्रसंगानी उत्तम फुलवली आहे. खुसखुशीत, गालातल्या गालात हसवणारे, आणि प्रसंगी मोकळेपणाने हसवणारे प्रसंग आहेत. प्रेमवीवर कोणाला भीत नसतात. पाटलांच्या समर्थकांकडून मार खाऊन हे प्रेमवीर थांबत नाही. गाव सोडून पळून जातात. , गावगाड्यातील बारव, त्यातील पोहणे, शेती, याचं अतिशय सुंदर छायाचित्रण डोळ्यांना मोहवून टाकतात.
हैदराबादला पळुन गेल्यावर दोघांचा संसार फुलतो. इथे चित्रपट संथ झाल्यासारखा वाट्तो. पूर्वार्धात असलेला खुसखुशीतपणा विनोद, ते संवाद हरवलेले असतात. मान, सन्मान, समाजातील प्रतिष्ठा, अपमान, पाटलांना सतत बोचत जाते. आणि मग चित्रपट्गृह अगदी शांत होऊन जातं, हा प्रसंग उत्तम उतरला आहे. चित्रपट योग्य जागी संपला. पार्श्वसंगीत उत्तम आहेच, गाणीही तशी लोकप्रिय झाली आहेत. अर्चना उर्फ रिंकु राजगुरुचा लाजवाब अभिनय, बोलण्याची लकब, भाव मारुन जाते. आकाश ठोसरही दिसायला चांगला आहे, लंगडा प्रदीप, सल्ल्या, पाटील, मंग्या, (नावं माहिती नाहीत) यांचा अभिनयही झकास आहे, एकुण काय एकवेळा चित्रपट बघायला हरकत नाही.
मानव जातीच्या इतिहासाचा विचार केला की जातीच्या उच्च आणि कनिष्ठ जातीचा लढा नवा नाही. प्रत्येक जातीच्या माणसानं आपापल्या पायरीनं राहावं, या सांस्कृतिक वारशांची मोडतोड प्रेम, जमीन, गावातील राजकारण, प्रतिष्ठा, आणि अनेक कारणांनी झालेली दिसून येते. विविध जात पंचायती, त्यांचे नियम, त्यांची दहशत, अनेकदा वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. माणसं शिकली आणि जात अजून घट्ट रुतून बसली. आपापल्या अस्मिता, प्रतिष्ठा, पणाला लागलेल्या दिसून येतात. सैराट चित्रपट समाजातील वास्तवच अधोरेखित करतो. जातीव्यवस्थेला जसा धर्माचा आ्धार देऊन जशी विविध बंधने लादल्या गेली तशी ही बाकीची उतरंड परावलंबी आणि पंगू झालेली दिसते. आता काळ बदलून गेला आहे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती या गोष्टीमुळे आता जातीय विषमता वरवर कमी झाली तर आत तितकीच घट्ट आणि धुसफुसत आहे, असेच चित्रपट पाहिल्यानंतर म्हणावे लागते. चित्रपट आवडलाच हे वेगळे सांगणे न लगे.
प्रतिक्रिया व्यक्त करा