आपल्या आयुष्यात अनेक कीटक (किडे) -मुंग्या पक्षी प्राणी आलेले असतात. कीटकाची दुनियाच वेगळी आहे. कीटकाचा पर्यावरण म्हणून उपयोग आहे. अनेक आवडते, नावडते कीटक आपल्याला अधुन-मधून दिसत असतात. पावसाळा आला की कीटक दिसायला लागतात. आपला अनेकदा या कीटकाशी चांगला परिचय असतो. आपणास या सर्वांची आठवणही येत असते कारण आपला या कीटकाशी जुना स्नेह असतो. आपला हा धागा त्याच किड्यासंबंधी आहे.
लहानपणी आपण यातल्या अनेक किड्यांशी मैत्री केलेली आहे. आपण तासंतास त्यांच्याबरोबर घालवला आहे, अशा आपल्या आठवणींचा हा धा्गा. आम्ही लहानपणी भिंग म्हणून या किड्यांशी खेळायचो. बोरीच्या झाडांवर, काटेरी झाडांवर हे भिंग सापडायचे. भुंग्यांसारख्या याचा आवाज यायचा. मानेजवळ दोरा बांधायचा. आणि तो उडायला लागला की त्याच्यामागे फ़िरायचे. आपण लहानपणी फार क्रूरपणे यांच्याशी वागलो असे वाट्ते. काचेच्या डब्यात बोरीचा पाला आणि हे कीटक किडे सांभाळले अर्थात ते जगायचे नाहीत. पण पुन्हा नव्याने, मित्रांबरोबर अनेक बोरी-बाभळींवर याला शोधत गेला. आम्ही भिंग म्हणायचो तर याला काही ठिकाणी पाचपिंगेही म्हणतात.
घुगी, उंट तर काही ठिकाणी याचं नाव घुंगरपाळ. मातीत गोल आळे केलेले. एक-दोन इंच असलेले याचं गोल घर असायचं. सापळाच लावलेला असतो. भुसभुशीत मातीत त्या गोल घरात मुंग्या बारीक किडे पडले-घसरले की घराच्या टोकाशी खाली असलेला हा किडा आपलं भक्ष्य मातीत ओढून घेऊन जायचा. किडा दिसायला बेकार असला, तर त्याचं पोट-पाठ अगदी नरम असे. आता जालावर शोधत होतो, त्याला पाहून आपण काहीही करत होतो असं फिलिंग आलं. बाकी, याचं घर कितीतरी वेळा उकरून छोट्याश्या काचेच्या डबीत हे किडे सांभाळले आहेत. यांची गोल गोल घरांची एक वस्तीच असायची भारी दिसायचे ते सगळे. रात्री मोडलेली घरे पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित दिसायची नवा डाव नवा खेळ अशा स्वरुपात.
रोलर किडे, शेणाचे बारीक गोळे करून उलट सुलट होत हे किडे ढकलत चाललेले दिसायचे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे किडे खरे तर उपयोगाचे असावेत. पण एक किडा काही वेळ उलटा होऊन गोल गोल तो शेणाचा गोळा ढकलतो तर दुसऱ्या बाजूचा सरळ गोळ्याला ढकलत चालताना दिसतो. पहिला काही वेळ थकला किंवा त्यांची जी काही भाषा असेल त्या प्रमाणे खांदेपालट व्हावी तसे ते आपापल्या जागा बदलून पुन्हा तो बारका गोळा ढकलून घेऊन जाताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कुठून कुठे सुरू असतो काही माहिती नाही. पण, हा खेळ आम्ही पोरं तासंतास बघत असायचो.
रेशीम किडे, पैसा, घुल्या, अशी कितीतरी किडे- कीटक आपणास आठवत असतील. आपल्या काही आठवणी असतील. सोबत काही विशेष माहिती असेल तर, छायाचित्र आणि माहिती याचं स्वागत आहे. असं म्हणतात की सर्व जग नष्ट झालं तरी हे कीटक राहतील. आपल्या आजूबाजूला असा अनेक सृष्टीतला हा पसारा आपल्यासमोर पडलेला असतो. आपल्या सहवासातील अशा कीटकाच्या गोष्टीसाठीचा हा धागा. आपलं सर्वांचं स्वागत आहे. (छायाचित्र जालावरून साभार)
प्रतिक्रिया व्यक्त करा