श्रीगणेश लेखमाला २०२१
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात. असा हा श्रीगणेशोत्सव आपल्यात आनंद आणि उत्साह भरतो. अशाच एका दुर्लक्षित श्रीगणेश लेणीची, रुद्रेश्वराची ‘श्रीगणेश लेखमालिकेत’ माहितीची कथा.
![]() |
श्री गणेशमूर्ती
|
आपण जर कधी जगप्रसिद्ध अजिंठ्याला आलात तर, अजिंठा लेणीच्या पाठीमागील डोंगराच्या बाजूसच रुद्रेश्वर लेणी आहे. दर श्रावणात तिथे प्रचंड गर्दी होते. यंदाच्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी काही भक्त मित्रांबरोबर तिथे जाण्याचा योग आला. अजिंठ्यापासून वीस किलोमीटर परिसरात सोयगावपासून तीन चार किलोमीटरवर पायवाटेने एक ते दीड किलोमीटर डोंगरचढण चढून गेलो की घनदाट झाडीतून प्रवास करीत आपण या लेणीस पोहोचतो. आजूबाजूस हिरवेगार जंगल, सतत मोरांची केकावली आणि लहान सहान धबधब्यांचा आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतो.
![]() |
![]() |
नृसिंह आणि अंधकासुरवध
|
लेणीजवळ पोहचतात कोसळणारा धबधबा आणि डोळ्यात मावणार नाही असे निसर्ग सौंदर्य आपले स्वागत करते. मागील दोन वर्षापासून धबधब्याच्या प्रपातातून खोल खड्डे झालेले होते ते यावेळी वाळू दगडांनी भरून टाकल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेतला तर नवल वाटायला नकोच. वृद्ध लोकांसाठी चढण कठीणच आहे, पण मजल दरमजल करीत पोहोचणे जमूही शकते. लेणीच्या बाहेर शेंदूर लावलेली उमा माहेश्वराची मूर्ती आहे, ओळखू न येण्याइतपत शेंदूर लावलेला आहे.
नमस्कार करुन पुढे गेलं की लेणीच्या आत ऐसपैस सभामंडप आहे. मोकळ्या अशा तीसेक फूट आणि दहाएक फूट उंचीच्या आकाराच्या मोकळ्या सभागृहात प्रथमदर्शनी श्रीगणेशाची अतिशय सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. अंदाजे, तीन बाय पाच अशा उंचीची ही श्री गणेशमूर्ती असावी. श्रीगणेशाच्या मूर्ती शेजारी रिद्धी सिद्धी आहेत. त्यांनाही शेंदूर लावलेला असल्यामुळे त्याही ओळखू येत नाहीत.
डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. गणेशाच्या उजव्या बाजूस विदारण नृसिंहाची मूर्ती आहे. डाव्या बाजूस शिव अंधकासुराचा वध करतोय तर गजासुराचा ऑलरेडी केला आहे, असे ते शिल्प आहे. वाटसरु आणि तिथे माहिती सांगणारे मूर्तीस नटराज म्हणतात.
रुद्रेश्वर हे शिवाचं नाव. गुरू द्रोणाचार्यांनी शिवाला रुद्रेश्वर नाव दिलेलं आहे, असा उल्लेख येतो. कौरव-पांडवांना शिक्षण आणि दिक्षा देतांना अशी ज्या शिवलिंगाची स्थापना केली ते शिवलिंग म्हणजे रुद्रेश्वर. ही केवळ नावाची कथा. मूळ रुद्रेश्वर कोणते ते मलाही सांगता येणार नाही.
![]() |
![]() |
शिवलिंग आणि नंदी
|
”वेदांमधे शिवलिंगाचे वर्णन नाही. पण रुद्राचे वर्णन येते. हा रुद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आज कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरुप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रुपांमधे दिसून येते. ह्या रुद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले” १ श्री गणेशाच्या उजव्या बाजूच्याच उंच ओट्यावर महादेवाची मोठी पिंड आहे, हेच ते रुद्रेश्वर. तर समोर नंदीही आहे. भाविक स्नान करुन तिथे अभिषेकासाठी गर्दी करीत असतात. लेणीत प्रकाश नसल्यामुळे इतर शिल्पे कोणकोणती आहेत ते पाहता येत नाही आणि शोधताही येत नाहीत. लेणी समजून घेण्यासाठी माहिती असलेला जाणकार आवश्यक आहे. ही रुद्रेश्वर लेणी अजिंठा लेणीच्या पूर्वी कोरलेली आहे असे म्हणतात परंतु त्याला कोणताही अभ्यासू असा पुरावा नाही त्यामुळे शिल्पांवरुनही लेणी वेरुळ लेणीला समकालीन आहे किंवा त्यानंतरची आहेत असे म्हणावे लागते. लेणी शिल्पांची झीज होत आहे. येणारे जाणारे वाटसरू तिथे वेगवेगळ्या कलांनी त्यात या स्थळाची नासाडी करतांना दिसतात. नावे कोरतांना दिसतात.
लेणीत वेगवेगळ्या लहान लहान चौकोनी आकारांच्या खोल्या आहेत. काही खोल्यांमधे सुरुवातीलाच जी मूर्ती म्हणत होतो ती मूर्ती उमा महेश्वराची आहे. बाजूच्या खोलीत फारशा स्पष्ट नसलेल्या मूर्तींची रांग दिसते ती रांग सप्तमातृकापट आहे. २ दुष्टांचा नाश करण्यासाठी या सात माता आदिदेवांना मदत करण्यासाठी येतात असे म्हटल्या जाते. अनेक शिल्पांमधे शिवशिल्पांच्या बाजूला हा मातांचा पट दिसून येतो. सप्तमातृका ह्या सात हिंदू देवी सदा एकत्र पूजल्या जातात. ब्राह्मी (ब्राम्हणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. काही वेळा यांमध्ये नारसिंही देवीचाही समावेश केला जातो; तेव्हा या विस्तृत समूहाला अष्टमातृका असे म्हणतात. शाक्त व तांत्रिक संघांमध्ये सप्तमातृका वंदिल्या जातात. ३ असे शिल्पपट अनेक लेण्यांमधे बघायला मिळतात. ही सर्व शिल्पे स्पष्ट दिसत नाहीत, यात उजवीकडे वीरभद्र तर डावीकडे गणपती आहे, हे फारसे ओळखता येणे शक्य नाही.
![]() |
सप्तमातृकापट
|
या स्थळावर शनीची म्हणून जी मूर्ती दिसते ते शिव, स्कंद किंवा ब्रह्मा यापैकी असू शकतात. शनीचे वाहन कावळा आहे, ते शिल्प इतके तेल ओतून ओतून काळे केले
![]() |
श्री शनेश्वर
|
आहे की कावळा की आहे, की नुसता काळा दगड ओळखता येत नाही. अगदी अलिकडील काळातील ते शिल्प असावे असे वाटते. किंवा अन्यत्र असलेली मूर्ती कोणीतरी इथे आणून ठेवली असावी अर्थात हे सर्व तर्क कोणी जाणकार पाहून खरं काय सांगेल तेव्हा त्या शिल्पाचे रहस्य कळेल.
आता सांगोवांगीच्या गोष्टी. रुद्रेश्वराच्या वरच्या बाजूस जो धबधबा आहे, तिथे साखळदंड सोडलेला आहे, ही खरं तर धोकादायक जागा आहे. नवदांपत्य तिथे दर्शनाला येतात आणि साखळदंडास धरुन उभे राहतात. वरुन पडणारी पाण्याची धार जर बरोबर डोक्यावर पडली तर संतती लाभते असा समज आहे. सतत वेगवान वार्यामुळे एका लयीत पडणारी पाण्याची धार एका लयीत पडत नाही. त्यामुळे जेव्हा वारा नसतो तेव्हा सरळ डोक्यावर हे पाणी पडते. अशी ही गमतीदार गोष्ट. आत्ता श्रावणात थोडेफार लोक येत असतात, तेव्हा सोबत असते मात्र एकट्या दुकट्याने त्या रस्त्याने येणे-जाणे सर्वार्थाने धोकादायक आहे. जंगल असल्यामुळे ते फार सुरक्षित नाही.
रुद्रेश्वर पाहून झाले की जवळच वेताळवाडीचा किल्ला आहे, घटोत्कच लेणी आहेत. दोन दिवसात हा परिसर फिरुन होईल. मोठ-मोठी तळी, वाहते झरे, निसर्ग, गणेशाची मूर्ती आणि रुद्रेश्वर हेच या गणेशलेणीचे खरे वैभव. शांतपणे डोंगराच्या एखाद्या पाऊलवाटेतील खडकावर निवांत पळसांची मोठमोठी झाडे, साग, विविध रानफुले आणि जंगल बघत बसावे. देहभान हरपून जावे इतकं ते सुंदर स्थळ आहे. बाकी, देवा, गणेशा फार मागणे नाही. लोक सुखी समाधानी राहू दे अशी प्रार्थना करुन आम्ही रुद्रेश्वराचा अर्थात गणेशलेणीचा तो भव्य क्षण डोळ्यात साठवून माघारी फिरलो.
संदर्भ १) शिवमूर्तीशास्त्र– प्रचेतस. (मिपाकर)
२) शिल्प ओळख मदत : प्रचेतस. (मिपाकर)
३) सप्तमातृका -मराठी विकि.
प्रतिक्रिया व्यक्त करा