महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला – लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्या, ‘कारभारी दमानं’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या’, ‘इचार काय हाय तुमचा’ या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी नटरंगी नार या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मिसळपावसाठी गप्पाटप्पा मारण्यासाठी त्यांनी वेळ दिला आणि कार्यक्रम पूर्ण सादर झाल्यानंतर त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
![]() |
सुरेखा पुणेकरांची एक अदा |
वयाच्या आठव्या वर्षीपासून मी स्टेजवर काम करते. शाळा नाही, शाळा शिकले नाही. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. वडील पुणे स्टेशनला हमाली करत होते. हमाली करत करत कार्यक्रम करायचो. त्यांचं सर्व्हिसकडे लक्ष नव्हतं. जास्त लक्ष तमाशात होतं. माझे वडील तमाशात नाच्या आणि सोंगाड्याचं काम करायचे. आईचे आई-वडीलसुद्धा कलावंत होते. वडिलांचे आई-वडील कलाकार नव्हते, पण वडील कलाकार होते. असं करत करत वयाच्या आठव्या वर्षीपासून बाहेरगावी आई-वडिलांबरोबर फिरत फिरत कला शिकलो, पण शाळा नै शिकलो. शाळेची पायरी कशी असते ते माहीत नाही. असं करत करत सुरेखा पुणेकर नावाने तमाशाचा स्वतंत्र फड काढला. १९८६चा काळ असेल. १९८६,८७,८८ असे तीन-चार वर्षं तमाशाचा फड चालवला. पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या फडाचा कार्यक्रम होता. आमच्या तमाशाचे शंकर चोकुरे आणि उत्तम रतन हे दोन तमाशेवालेही होते. आमच्या तमाशाचा तंबू फुल्ल भरला होता आणि तेवढ्यात आमच्या गेटवर पोराला, ड्रायव्हरला आणि ढोलकीवाल्यांना आमच्या विरोधकांनी खूप मारलं. त्यातला एक बेशुद्ध पडला. आम्ही त्यांना घेऊन दवाखान्यात निघालो, तर आमची गाडी एका छोट्या दरीत दोनतीनशे फूट खोल पडली. गाडीने चारपाच पलट्या घेतल्या. कोणी दगावलं नाही, पण कोणाचा हात तुटला, पाय मोडले, पण बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीत आला. सर्वांना सटाण्याच्या दवाखान्यात अॅडमिट केलं आणि तिथेच ठरवलं – आता तमाशा करायचा नाही. पण आम्ही पडलो जवान. आम्ही कलाकार कोणाचं नीट ऐकत नाही. सामनेवाले (तमाशावाले एकमेकांचे विरोधक) त्रास द्यायचे. मग पुढे आम्ही आर्केष्ट्रा सुरू केला. नाटकं केली. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ नाटक सुरू केलं.
![]() |
साधं असणं, साधं दिसणं. |
मी नाटकात महत्त्वाच्या स्त्री भूमिका करायचे. माझ्याबरोबर जयमाला इनामदार, राम नगरकर., आणि खूप लहानमोठ्या कलाकारांसोबत काम केलं.
पैसे किती मिळायचे?दोनशे रुपये मिळायचे. राम नगरकर यांच्याबरोबर काम करताना चांगलं वाटायचं. मधु वांगीकरबरोबरसुद्धा काम केलं. खुप कलावंतांबरोबर काम केलं. ‘फक्कड बाजीराव’ हे नाटक खूप दिवस केलं. खेडेगावातही खूप नाटकं केली. ढोलकी, तबलेवाला आणि पेटीवाला असला की आमचं नाटक सुरू व्हायचं. हौशी कलाकारांबरोबर आणि नाटक जसं मिळेल तसं काम केलं. चैत्र महिन्यात तमाशात करायचो. १९९८ला लावणी महोत्सव भरला होता..
अकलूजला?अकलूजला नाही. मी कधीच अकलूजला गेले नाही. अकलूजच्या लावणी महोत्सवात गेले नाही.
इतका मोठा महोत्सव आणि आपण गेला नाहीत? काय कारण?मी ते कारण सांगू शकणार नाही.
बरं, ठीक आहे. आपल्या जीवनात सतत संघर्षच दिसतो. आपण स्वत:चा फड उभा केला आणि तो प्रवास आता महाराष्ट्रात लावणीला एक मोठी प्रतिष्ठा देऊन गेला. आज लावणीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे का?दृष्टीकोन बदलला आहे. कलावंतांचीही चूक असते आणि अशा चुका पदरात घेऊ नये. आणि प्रेक्षकांनी त्याचं भांडवल करू नये. पूर्वी पारंपरिक लावणी असायची. आता चित्रपटातील गाण्यावर नृत्य करावं लागतं. लोकांना ते आवडतं. पूर्वी लावणीचं सौंदर्य दिसायचं. आता ते दिसत नाही, तेव्हा वाईट वाटतं.
सादरीकरणावर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा परिणाम होतो का?प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या नाहीत. पण प्रेक्षकांनी आम्हाला पारंपरिक लावणी मागितली पाहिजे. कलाकारांना चित्रपटातील लावण्या करायला सोप्या जातात. आजच्या कलाकारांना कष्ट करावे वाटत नाही. पैसा जास्त आणि कष्ट कमी. आणि मग त्यात कला कमी दिसते. आमच्या टायमाला कसं होतं.. कष्ट खूप होते.
थोडंसं वेगळं विचारतो. पारंपरिक लावण्यांबरोबर धार्मिक लावण्या कधी कराव्याशा वाटल्या का?धार्मिक कार्यक्रम आहे ना. वाटलं होतं तुम्ही याल ना. या उत्पातांच्या लावणीवर माझा कार्यक्रम आहे. माझी त्याच्यावर कॆसेट आहे. दहाबारा लावण्या आहेत. अशा जाहीर कार्यक्रमात कोणी म्हणलं तर मी ते सादर करते.
![]() |
सुरेखा पुणेकरांची अजून एक सुंदर अदा |
महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाटकांवर असतं. लावणीबाबत शासन काही करत नाही. आणि प्रोत्साहन म्हणलं तर कार्यक्रम सर्व सारखेच वाटतात. लावणीला काही आर्थिक मदत होत नाही.
प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?लावणी सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून सादरीकरणाला दाद दिली पाहिजे. कलाकारांना उत्साह येतो. धांगडधिंगा नको. बंद थेटरातले आणि उघड्यावर सादर होणारे कार्यक्रम यातला प्रेक्षक सारखाच. जास्त उत्स्फूर्तपणाही नसावा.
तमाशा आणि लावणी हे कलाप्रकार दीर्घकाळ टिकून राहिले पाहिजेत, यासाठी काय केलं पाहिजे?प्रेक्षकांचा पुढाकार आणि सहभाग पाहिजे. तमाशा-लावणी यातील कलाकार आपली कला दाखविण्यासाठीच कला सादर करत असतात. अशा वेळी कलाकाराकडून कला मागावी. छ्क्कड, बैठकीच्या लावण्यांची मागणी झाली पाहिजे. जुने लोक सांगायचे – हे गाणं पाहिजे. आता ते दिसत नाही. परदेशात मराठी मंडळाच्या कार्यक्रमात पारंपरिक लावणीची मागणी झाली होती.
सादरीकरणासाठी लावण्यांमधला कोणता प्रकार आवडतो?मला सर्वच लावण्या आवडतात. पारंपरिक लावण्या विशेष आवडतात.
लावणी हा कलाप्रकार कालबाह्य होत चालला आहे का?लावणी हा कलाप्रकार कालबाह्य झालेला नाही. आज लावणीच्या दोन-अडीचशे कंपन्या आहेत. कार्यक्रम वाढले आहेत.
आपल्या या धावपळीच्या व्यग्र कार्यक्रमात कोणत्या गोष्टी करायला आवडतात?मला शेतीची आवड आहे. पुरणपोळी आवडते. मला मटन आवडतं. मला मटन करायला आवडतं. घरी असल्यावर स्वयंपाक करायला आवडतं.
लावणीच्या संदर्भात भविष्यात काय केलं पाहिजे? काय करणार आहात?लावणीची मला खूप आवड आहे. लावणीने मला पद, पैसा, मान दिला. लावणीने मला सर्व काही दिलं. कुटुंब स्थिर केलं. माझं कुटुंब असं होतं की मला घरच नव्हतं. दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो. आता सर्व बहिणींना बंगले बांधून दिले. त्यांची लग्न, त्यांच्या मुलांची लग्नं मीच करून दिली. लावणीने मला सर्व काही दिलं. याच्यापुढे माझी अशी इच्छा आहे की जी मुलगी जिला वाटतं की मला कार्यक्रमात यायचं….. माझ्या कार्यक्रमात मुली अशा आहेत की दोनचार जणींच्या आता परीक्षा आहेत, म्हणजे त्या शिकत असतात. त्यांची घरची परिस्थिती बरोबर नाही, तेव्हा शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित बसावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. माझी इच्छा आहे की त्या मुलीला पूर्ण तयार करायचं की ती जरी गरीब घरातली असली, तरी तिला आपल्या पायावर पूर्ण उभी करायची. तिने तिचं कुटुंब सांभाळायचं. असं ‘नटरंगी नार’च्या माध्यमातून करतो. दर वर्षी नवनवीन मुली येत असतात. चांगल्या तयार झाल्या की पिच्चर लाईनला जातात. काही नाटकात जातात….
![]() |
हो, तो माझा उपक्रमच आहे. इथून पुढेही तेच करेल आणि सध्याही करत आहे. ज्या मुलीला वाटतं की माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, कुटुंब सांभाळू शकत नाही.. काही काही कुटुंबामध्ये वडील आजारी असतात, आई आजारी असते, बहीण-भावंडं आजारी असतात., तर अशा मुलींसाठी आम्ही पूर्ण मदत करतो. अशा मुलींना मी आणि माझ्या मुली शिकवतात.
आपल्याशी गप्पा करून छान वाटलं. मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने मी आपले मन:पूर्वक..अरे हो, मला मिसळपाव खूप आवडते. मला कधी वाटलं तर मी मिसळपाव करते घरी. कधीकधी आवडीने पाव मागवणार, मिसळ करणार….
पुन्हा एकदा आपले मन:पूर्वक आभार मानतो. एक फोटो घेऊ का?आता मेकप नसल्यावर मला लोक ओळखणार तरी का? पाहताय ना माझा अवतार? नका घेऊ फोटो. अगं जयश्री, यांना वाट्सपवर फोटो पाठव बरं जरा..
आभार….!
प्रतिक्रिया व्यक्त करा