Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 15 एप्रिल, 2012

चंदु

घर सोडून सकाळी बसस्टॉपवर जातांना माझ्या घरासमोरील बोळीत ‘चंदु’ सतत बसलेला असायचा. भीक मागून खातो म्हणून भिकारी. हा माझ्या गावातल्याच एका चांगल्या कुटुंबातला. पण, डोक्यावर परिणाम झालेला. कधी एखादा अभंग म्हणतांना , तर कधी एखादी गवळण, तर कधी जुनी गाणी सतत चाललेली असायची. दाढी वाढलेली, फाटके कपडे, सोबत एक चिंध्यांचं गबाळं, हाताचा कोपरा, तळहात अगदी मळकट, काळं काही तरी हाताला लागलेलं आणि सतत स्वतःशी बडबड चाललेली. घरातून बाहेर पडल्यावर अवघ्या पाच फूटाच्या बोळीतून मला या चंदुला ओलांडून जावं लागायचं. माझी ओळखच झाल्यामुळे रोख ठोक आवाजात ‘ दे ना रे एक रुपया’ ‘काय बिघडतं एखादा रुपया दिला तर’ असं बोलायचा. इतकं स्वच्छ त्याचं बोलणं. मीही म्हणायचो, बेट्या, काम करना काही तरी, फूकट विड्या काड्या ओढत बसतो, असा संवाद व्हायचा. मी दिवसभरच्या राहाटगाड्यातून परतल्यावर चंदु कधी दिसायचा कधी नाही.

चंदु बायका दिसल्यावर मुद्दामहून मोठ्या आवाजात गाणी म्हणतो. कधी शीळ घालत गाणी म्हणतो असेही कधी ऐकायला यायचे. आजूबाजूची पोरं चंदु दिसल्यावर बाहेर पडायची नाहीत. कधी येडा चंद्या, येडा चंद्या, असं म्हणत धुम ठोकायची. कधी शेजारी-पाजारी त्याला गोड-धोड खायला देत. कधी लक्ष देऊन पाहिल्यावर बीड्या फुंकणारा चंद्या आणि कधी त्याच्या आजूबाजूला डुकरांनी नुसता उच्छाद मांडलेला असायचा.

बर्‍याच दिवसात चंद्या दिसला नाही. आम्हा शेजार्‍या-पाजार्‍यांनाही कधी त्याची आवर्जून आठवण झाली नाही. एक दिवस पुन्हा बोळीत चंद्याची जुनी गाणी ऐकायला आली आणि दुसर्‍या दिवशी पाहिलं तर चंद्याचा कोपरापासून हात गायब. हाताच्या कोपर्‍याला चिंध्या गुंडाळलेल्या. काय रे चंद्या, काय झालं हाताला. काही नाही. कुत्र चावलं. खरं तर नुसतं कुत्र चावलं नव्हतं तर कुत्री आणि डुकरांनी त्याच्या कोपरापासूनचे हाताचे लचके तोडले होते. सरकारी दवाखान्यात जाऊन त्याने उपचारही घेतले असे कोणीतरी मला सांगितल्याचे आठवते.

नोकरीला असल्यासारखा हा दिवसभर गाव फिरुन हा मुक्कामाला माझ्या घरासमोरील बोळीत यायचा. कधी फरफटत चाललेला, कधी कुत्री मागे लागलेला, कधी विड्या फुंकणारा, कधी नुसताच पडलेला आणि सतत गाणी म्हणनारा, थंडीच्या दिवसात चहाला पैसे द्यावेत म्हणून रस्ता अडवणारा. चंद्या, आठेक दिवस आजारी पडलेला असल्यासारखा पडून होता. आणि एका गारठलेल्या थंडीत एकदिवस अनेक प्रश्न मागे सोडून चंद्या गेला.

आता माझ्या घरासमोरची बोळी एकदम स्वच्छ आणि मोकळी असते. चंद्या दिसत नाही, चंद्याचं गबाळं नाही, चंद्याचं गाणं नाही. कधी कधी माझी पोरं त्याच्या आठवणी काढतात. आणि पोरांनी त्याच्या आठवणी काढायला सुरुवात केली की मीही लहान लेकरांसारखा त्यांच्या गोष्टी ऐकतो आणि हळवाही होतो.

Advertisements
Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 14 मार्च, 2011

कवितेपासून कवितेपर्यंत….प्रवाह कवितेचा.

मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ”माझा म‍-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. कवितेचा विषय निघाला की अनेक कवींची आठवण होते.
मराठी कवितेचा विचार करायचा म्हटला की प्राचीन कवितेकडे वळावे लागते. प्राचीन कवितेचे साधारणत: तीन प्रवाह मानले जातात. संत काव्य, पंत काव्य आणि (तंत काव्य) शाहिरी काव्य. असे ढोबळमानाने त्याचे वर्गीकरण केले जाते. मराठी काव्याची परंपरा ही संत काव्यापासून सुरु झालेली आहे. बाराव्या शतकापासून सुरु झालेली ही काव्यपरंपरंपरा अठराव्या शतकापर्यंतही दिसून येते. आजही काही काव्यरचना या प्राचीन काव्याशी नातं सांगतांना दिसतात. मात्र ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकेच भरेल असे वाटते. संतांच्या काव्यात ईश्वर भक्ती, धार्मिक विचार आणि त्याचबरोबर लोककल्याणाची तळमळही काव्यररचनेत दिसून येते. लोककल्याण आणि शिक्षण हा उद्देश दिसत असला तरी ‘ईश्वरभक्ती’ ची ओढ काव्यातून दिसते. संत कविता म्हटले की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम संत रामदास यांच्याबरोबर संत मांदियाळातील थोरा मोठांची आठवण झाली नाही तर नवल वाटावे.


काव्यपरंपरेत पुढे परंपरा येते ती पंत काव्याची. याला पंडिती काव्याची परंपरा असेही म्हटले जाते. संत काव्याहून वेगळी अशी रचना पंडिती काव्याची दिसते. पंडिती काव्याचे स्वरूप आख्यानप्रधान असे होते. जसे, रुक्मिणी स्वयंवर,नलदमयंती स्वयंवर, संक्षेप रामायण, वेणूसूधा, वगैरे प्रकारच्या रचनेतून लोकांचे मनोरंजन करावे लोकप्रिय व्हावे असा सरळ उद्देश दिसतो. लोकांच्या मनोरंजनासाठी रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथातला काही भाग निवडून त्यावर अलंकार,शृंगाराचा मारा करुन विविध रसांच्या माध्यमातून पांडित्याचे उत्तम प्रदर्शन पंडिती कवींनी केले. पंडितांसमोर विशिष्ट असा श्रोतुवर्ग होता. पंडित जरासे पुराणिक पद्धतीचे होते आणि त्यांना धनिकांचा आश्रय होता. राजे रजवाड्यांच्या आश्रय असल्यामुळे पुराणे सांगणे हा त्यांचा व्यवसाय होता जरासा फावला वेळ मिळाला की काव्यरचना करायची. पंडित कवींनी समाजमनाचे रंजन करायचा विडाही जरासा उचलला होता. असे असले तरी पंडितांचे लेखन मात्र संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे. संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद. उच्चभ्रू समाजातील संस्कृततज्ञ, पंडितवर्ग आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काव्य सादर केले. ‘प्रगल्भ’ लोकांसाठी केलेले साधारणतः त्यांचे लेखन होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंडित कवी म्हटले की, मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत, यांची आठवण होते.

काव्य परंपरेचा प्रवास आपल्याला पुढे शाहिरी काव्याकडे घेऊन जातो. शाहिरांनी मात्र काव्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. पोवाडा आणि लावणीने नुसती बहार उडवून दिली. पोवाड्यात पराक्रमी व्यक्तीच्या प्रशंसनीय घटनांचे रसपूर्ण वर्णन शाहिरांनी केले. आपल्या धन्याचे गुण गौरव शाहिरांनी केले. शिवछत्रपती, सवाई माधवराव, भाऊसाहेब पेशवे, हे शाहिरांच्या लेखणीचे विषय झाले. श्राव्यकाव्य म्हणनन्यापेक्शा त्याला नाटकच म्हणावे इतके शाहीर आपल्या काव्याशी एकरूप झाले. पोवाडा वीररसाने ओतपोत भरलेला तर लावणी शृंगाराने सजवली गेली. लावणी जशी शृंगाराची होती तशी लावणी धार्मिकही होती. लावणीच्या रचनेत जसा ताल मोहवून टाकणारा होता तसा त्यात खटकेबाजपणाही होता. लावणीची रचना लोकगीतासारखी दिसते. मराठी माणसाच्या सांस्कृतिक परंपरा, संकेत, आदर्श हे लावणी रचनेतून दिसतात. लावणीचे लोकगीताशी जवळचे नाते आहे. गोंधळगीत, जागरण,वासुदेव अशा लोकगीतातून लावणीनृत्य आकाराला येत गेले. रामजोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा, सगनभाऊ, या लावणीकारांची आपल्याला ओळख आहेच


पेशवाई गेली इंग्रजी राजवट आली नवविचारांची रेलचेल सुरु झाली आणि दोस्त हो येथून मात्र कविता बदलत गेली. प्राचीन परंपरेशी आशयाच्या बाबतीत तिने फारकत घेतली. प्राचीन कविता वर्णनपर, कथनपर,अशी होती. नव कविता मात्र स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार सांगता सांगता समाजनिष्ठ होत गेली. केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात कारण त्यांनी काव्याची जुनी वाट सोडून नवी वाट चोखाळली. नवे मूल्य, नवे विचार कवितेतून मांडायला सुरुवात केली. कवितेला आत्मनिष्ठ आणि काही बाबतीत जीवननिष्ठ बनविले. जुन्या रुढी प्रथा परंपरेवर जोरदार हल्ला चढविला. समता,स्वातंत्र्य व बंधुत्वाची एक नवी ‘तुतारी’ फुंकली. नव्या दमाचा ’नवशिपाई’’ त्यांच्या कवितेतून दिसू लागला. सारांश सांगायचा असा की नवकविता पूर्णपणे बदलून गेली. लौकिक विषय काव्याच्या कक्षेत आले. काव्याचे प्रयोजन असे मानले गेले की समाजाला स्फूर्ती देते ते काव्य. नव्या मूल्यांचे दर्शन घडविते, आनंद देते ते काव्य मानल्या गेले. इंग्रजी काव्य अनुकरणानेच मराठी कवीतेला एक नवे वळण मिळाले.
सामाजिक सुधारणांचा विचार, जातिभेद, आर्थिक विषमता आणि निसर्ग असे विषय काव्यातून डोकावू लागले. निसर्गातील वस्तूंवर मानवी भावभावनांचा आरोप करुन काव्यमय वर्णने असलेल्या कविता याच काळातल्या. प्रेमविषयक दृष्टीकोन पवित्र आणि उदात्तही याच काळात होत गेला. केवळ कविताच नव्हे तर कवितेचा आकृतिबंधही बदलून गेला. आर्या,फटका,दोहा,अभंग काही जुनी वृत्ते, केशवसुताच्या समकालीन कवितेत दिसत असली तरी नवकवींनी आकृतीबंधाच्या बाबतीत बराच बदल केला. इंग्रजी सॉनेटची सुनीते झाली. अर्थात हा सर्व बदल इंग्रजी राजवटींमुळेच झाला असे म्हणण्यास वाव आहे.केशवसुतपूर्व कविता, आधुनिक कवीपंचक, रविकिरण मंडळ आणि पुढे मर्ढेकर संप्रदाय पासून ते आजची जालीय कवी कवयत्रीपर्यंत कविता इतकी बदलली की विचारु नका. नैतिक मूल्यावरील कविता, यंत्राच्या संचारामुळे भावशुन्य झालेली माणसे, शेती,शेतकरी,दलित दुबळ्यांचे शोषण,ढोंगीपणा, दांभिकपणा, नैराश्य दु:ख, मानवता,स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राजकीय उदासिनता या आणि अशा आशयांनी मराठी कविता बदलून गेली आहे. रे.ना.वा.टिळक, कवी विनायक, बालकवी, गोविंदाग्रज, बी, ते आजच्या नवकवीपर्यंत अनेक कवींची नावे आता टंकावे लागतील.
कवितेच्या बाबतीत कवितेला अनेकदा विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे. कवितेतील स्वैरपणाचा अतिरेक, वास्तवाशी संबंध नसणा-या कविता. यमक जुळवून ओढून ताणून आलेल्या कविता. वास्तविक जीवनापासून फारकत घेतलेल्या कविता. अलंकारात मढवून घेतलेल्या कविता. प्रणय कवितांचा सुळसुळाट असलेल्या कविता . चंद्र,सूर्य,पाने फुले यात रमणारी निसर्ग कविता,स्वप्नांची नुसतेच मनोरे रचणारी कविता, चित्रविचित्र शीर्षकाच्या कविता, प्रचारकी कविता, राजकीय कविता, संगणकीय काळातील शब्दांचा भडीमार असलेल्या कविता, इंग्रजी शब्दांच्या अतिरेक असलेल्या कविता, पाश्चात्य कल्पना, तेच ते दु:खानुभव सांगणारी कविता, कविता प्रकारातील ग्रामीण कविता, लोकगीत वळणाची कविता, गझल,चारोळ्या,विडंबने,भावकविता,राष्ट्रीय कविता, अनुवादित कविता अशा काय नी कितीतरी प्रकारांच्या कवितांवर विविध आरोप बिचा-या कवितेवर झाले, होत असतात. कवी आणि कविता विनोदाचे विषय होतात. अशा सर्व गोष्टी सहन करत कवितेचा प्रवास आजही दमदारपणे सुरु आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणना-या तुकोबापासून ते आत्ताची कविता लिहिणा-यापर्यंत प्रत्येक काळातल्या कवींनी शब्दांवर प्रभुत्व राखत मराठी भाषा समृद्ध केली आहे. अशा सर्व कवींना जागतिक भाषा दिनाच्या निमित्ताने मी वंदन करतो.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 21 डिसेंबर, 2010

शिल्पकथा

आपल्या देशात देशभर शिल्पकला कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. चौसष्ट कलांची महती आपल्याला नेहमीच सांगितली जाते. शिल्पकलेमधे राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक असे संदर्भ डोकावताना दिसतात. शिल्पकथेच्या निर्मितीमागील नेमकेपणानं कारण हेच आहे, असे काही मला सांगता येत नसले तरी शिल्पकलेची सुरुवात धर्मप्रसारासाठी झालेली असावी असे वाटते. कारागिरांनी  निर्जीव कातळांमध्ये जीव ओतलेला दिसतो आणि त्या दगडांमधून निर्माण झालेल्या सुंदर-सुंदर शिल्पकथा-कल्पनामधून आपण हरखून  जात असतो. साधारणतः वेगवेगळ्या शिल्पकलेतून जसे, बौद्ध, जैन,हिंदू अशा शिल्पकलांमधून  धर्मांची धर्ममूल्य या शैलशिल्पातून समाजापुढे मांडली गेलेली दिसतात.  आपापल्या ठिकाणी सर्वच कला सुंदर आहेत.  पण, चित्र, शिल्प, नृत्य या कलांचे आपले एक वेगळे स्थान आहे.

हे सर्व सांगण्याचे कारण असे की, आमच्या औरंगाबादपासून जवळ असलेल्या जगप्रसिद्ध अशा  वेरूळ येथील शिल्पांबद्दल   कितीतरी लिहिले गेले आहे. वाचलेही गेले असेल. मीही अनेकदा तिथे गेलो आहे.  प्रत्येकवेळेस काहीतरी  नवीनच  माहिती मिळते.  पण मिळालेली माहिती जगरहाटीच्या धांदलीत विसरूनही जातो. असे असले तरी पुन:प्रत्ययाचा जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो. असेच एका आंतरजालीय मित्राबरोबर पुन्हा लेणी पाहण्यासाठी गेलो तेव्हा खूप छायाचित्रे काढलीत. काही आवडली. काही छायाचित्रे काढायची राहूनही गेली. प्रत्येक शिल्पामागे काही कथा आहेत.
मी काही लेण्यांमधील सर्वच शिल्पांचा परिचय किंवा प्रत्येक शिल्पकथांमागील कथा सांगणार नाही. पण, काहीतरी  वेगळं वाटलं म्हणून ज्या शिल्पकथेमागची कथा सांगावी वाटली त्याची कथा सांगण्याचा मोह आवरत नाही.   तर, वेरूळच्या लेण्यांमधे भगवान शिव शंकराचा सुळसुळाट आहे. पाहावे तिथे शंकर भगवान दिसतात. ‘रामेश्वर लेणे’  नावाची एक लेणी आहे. [लेणी क्रमांक २१] इथे शिवपार्वती चौसरचा खेळ खेळताना दिसतात  शिवपार्वतींचा खेळ पाहण्यासाठी त्यांचा नेहमीचा लवाजमा दिसतो आहे.  शिवाने  एका हातात सोंगट्या धरलेल्या असाव्यात तर दुस-या हाताने त्यांनी पार्वतीच्या अंगावरील वस्त्र पकडलेले आहे. . एक हात उंच करून तो पार्वतीला म्हणतो आहे, अजून एक डाव खेळू या. इथे पार्वती वैतागलेली दिसते. अर्थात हे वैतागणं शिल्पातून स्पष्ट होत नसले तरी अंदाज करायला काय हरकत आहे. असो, तर   वैतागण्याचे कारण शिव तिला काही खेळात जिंकू देत नाही.  एक तर काही  हात चलाखी करून शिव डाव जिंकत असावे. अर्थात याच लेणीमधे देखरेखीसाठी असलेल्या महिलेने माहिती सांगतांना,  या खेळात इथे पार्वती जिंकलेली आहे. आणि हा पराभव सहन न झाल्यामुळे शिव पार्वतीला एक डाव खेळ म्हणून हट्ट धरत  आहेत.  आणि त्या डावात शिव ‘नंदी’ हरला असावा. डावात जिंकलेल्या नंदीला पार्वतीकडचे गण ओढत आहे. कोणी शिंगे ओढत आहे. कोणी शेपटीला चावत आहे. असा त्या बिचा-या नंदीचा छळ चालू आहे. शिव पार्वतीचा हा खेळ चाललेला असताना पंच म्हणून भासावा असा कोणीतरी मध्यभागी बसलेला दिसतोय. बाजूला उभे असलेले द्वारपाल आणि इतर मंडळी दिसतात. बाकी, पार्वतीच्या शिल्पात कारागिराने  सौंदर्य रेखाटण्याची  काही कसर सोडलेली नाही. उन्नत उरोज, नाजूक कंबर, प्रमाणबद्ध हात-पाय. लोडावर हात टेकून बसलेली पार्वती अशी सुंदरता तिथे दगडांवर कोरलेली आहे.   शिव-पार्वती मनोरंजनासाठी खेळ खेळत आहेत.  असे असले तरी कथेमागे मला उगाच  स्त्री- पुरुष आणि तेही पती-पत्नी  आपापले अहंकार आत कुठेतरी बाळगून आहेत असे उगाच ही कथा ऐकतांना आणि शिल्प पाहतांन वाटले. अर्थात  याला काही आधार नाही. पण, कल्पनेच्या भरा-या मारायला काय हरकत आहे.
बाकी, कलाकाराच्या मनात तेव्हा काय चालले असावे ? त्याला या शिल्पकलेच्या माध्यमातून काय सांगायचे असावे ?  वगैरे प्रश्नांना पास करुन जशी सांगोवांगी कथा असेल त्या कथेचा आस्वाद घेत या कलाकारांच्या कारागिरीला नमस्कार केला पाहिजे. अशा कलांचा आनंद  मनात दीर्घकाळ साठवला पाहिजे.  शिल्पकलेचं योग्य जतन केले पाहिजे.  वेरुळच्या लेण्यांमधील एकेके शिल्प आपापली एकेके अशी वेगळी कथा बाळगून आहेत. अशा वेळी  कथांचा अर्थ लावत फोटो काढण्याचा मोह कोणाला होणार नाही..!

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 29 ऑक्टोबर, 2010

भाषाविज्ञान परिचय

महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमधे बी.ए.च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात आधुनिक भाषा विज्ञानाचा अंतर्भाव केलेला दिसतो. भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरुप, कार्य वगैरे यावर प्राथमिक स्वरुपात जसा अभ्यास असतो त्या प्रमाणे भाषाविज्ञानाचाही अभ्यासही असतो. पारंपरिक भाषाभ्यासाबरोबर आज आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आता महत्त्वाचा मानला जात आहे. भाषाविज्ञान म्हणजे केवळ व्याकरण नसते तर, मुखावाटे कोणते अवयव ध्वनी निर्माण करतात कोणते ध्वनी भाषेमधे वापरले जातात. ध्वनीच्या रचना कशा होतात त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात. भाषेच्या उपयोगाबरोबर सर्व भाषांना लावता येतील असे काही भाषाविषयक नियम असतील का ! र भाषेच्या विविध रुपाबरोबर, भाषेचा इतिहास वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचाही विचार भाषाविज्ञानात होत असतो.

भाषाभ्यासकांना अधिक अभ्यास करता येईल यासाठी ‘भाषाविज्ञान परिचय’ या पुस्तकाची मदत होईल असे वाटते. ‘मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ.अंजली सोमण,डॉ.द.दि.पुंडे आणि डॉ.स.ग. मालशे यांच्या संपादीत लेखन संग्रहाचे पुस्तक म्हणजे ‘भाषाविज्नान परिचय’ होय. प्रत्येक लेखकाचे तीन असे एकूण नऊ लेखांचा हा संग्रह. भाषेचे स्वरुप, स्वनविज्नान,स्वनिम विचार, हे डॊ.अंजली सोमण यांचे लेख. रुपिम आणि पदविचार, वाक्यविचार, भाषेचे उच्चारण हे डॊ.द.दि.पुंडे यांचे लेख तर डॊ.स.ग.मालशे यांचे प्रमाणभाषा आणि बोली, मराठीच्या प्रमुख बोली आणि मराठीचा शब्द संग्रह असे लेख आहेत.

भाषाविज्ञान या पुस्तकात स्वनविज्ञानाचा विचार मांडलेला आहे. जसे, मानवी मुखाद्वारे अनेक ध्वनी निर्माण होतात पण सर्वच ध्वनी भाषेमधे वापरले जात नाहीत. मुखावाटे निर्माण झालेले आणि भाषेत वापरल्या जाणा-या ध्वनींना ‘स्वन’ असे म्हणतात. जसे, जांभई दिल्यानंतर निर्माण होणारा आवाज हा ध्वनी आहे पण तो स्वन नाही. स्वननिर्मिती करणारे वागेंद्रिये, त्याची रचना, त्याचे स्वरुप आणि त्याचे कार्य यांचा अभ्यास या प्रकरणात आहे.

रुपिम आणि पदविचाराच्या बाबतीत शब्द आणि रुपिका यात ब-याचदा घोटाळा होत असतो. रुपिका म्हणजे शब्दांचा अंतिम घटक. सर्वच शब्दांचे असे नसते. काही शब्दांचे विभाजन होत असते. उदा. विद्यार्थी. विद्या=अर्थ=ई हे असे तीन अर्थघटक दिसतात. हुशार या शब्दाचे असे अर्थदृष्ट्या आणखी विभाजन होणे शक्य होत नाही. याचा अर्थ हुशार हा शब्द ही आणि रुपिकाही आहे. पण प्रत्येक शब्द हा रुपिका असेलच असे नाही. पदविचार, वाक्यविचार, वाक्याचे स्वरुप या आणि अशा विविध घटकांचे विश्लेषण इथे अभ्यासता येते.

भाषा उच्चारण आणि लेखन या लेखात लेखक स्पष्ट करतात की, भाषा प्रथम बोलल्या जाते आणि मग तिचे लेखन होते, होऊ शकते. लेखन हे बोलल्या जाणाया भाषेच्या मानाने दुय्यम आहे. जितके बोलतो त्यामानाने आपण कमी लिहित असतो. त्यामुळे लिहिली जाते तीच भाषा असे काही म्हणता येणार नाही. जी बोलली जाते तीच भाषा आणि भाषेमधे बोलणे किंवा उच्चारण महत्त्वाचे आहे. उच्चारणात भाषेचे अस्तित्त्व क्षणकाल असते तर लेखनात चिरकाळ असते. भाषेतील ध्वनींचे प्रत्यक्ष उच्चारण व त्याचे लेखन यात भाषेचे उच्चारण आणि आणि लेखनातील अंतर अटळ आहे असे लेखक म्हणतात. उदा. मुलगा [मुल्गा] माश्या [माशा] ऋषी [रुशी] त्याबद्दलही विवेचन या पुस्तकात वाचता येईल.

प्रमाणभाषा आणि बोली याबाबतीत ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ उभ्या महाराष्ट्रासाठी मराठी भाषेचे एक सर्वमान्य रुप आपण गृहीत धरले पाहिजे असे लेखक म्हणतात. व्याकरण, परंपराप्राप्त देवनागरी लिपी, लेखनाचे नियम यांनी युक्त अशी प्रमाणभाषेला आपण शिष्टमान्यता दिलेली आहे. प्रमाणभाषेतून आपले आकलन,दळवळण चाललेले असते त्याचबरोबर प्रमाणभाषाही सुद्धा एक बोलीच असते. प्रमाणभाषेत जसे व्याकरण शब्दकोश रचले जातात; तद्वतच स्थानिक बोलींचीही व्याकरण शब्दकोश रचणे शक्य असते. विविधता, वैचित्र्य, ही बोलींची प्रकृती असते. प्रमाणभाषा, बोलीभाषेचे स्वरुप, निर्मितीची कारणे, परस्पर संबंध, भाषिक स्तरभेद याचे विवेचनही इथे अभ्यासता येईल.

मराठीच्या प्रमुख बोली या प्रकरणात वहाडी, नागपूरी, हळबी, अहिराणी, डांगी आणि कोकणी या प्रमुख बोलींचा परिचयाबरोबर बोलीची उच्चारणप्रक्रिया, व्याकरणिक प्रक्रिया, नामविभक्ती, याचेही विवेचन यात वाचता येईल.

मराठी भाषेतील शब्दसंग्रहाच्या निमित्ताने अन्य भाषांच्या प्रवाहांची चर्चा या शेवटच्या प्रकरणात आहे. लेखक म्हणतो की ” आज अवकाशयानांच्या युगातून आपण जात आहोत. ज्ञाविज्ञानाच्या विकासाचा वेग वाढतो आहे तेव्हा नवसंकल्पनांचे शब्दांकन दृतगतीने करावे लागणार आहे. तेव्हा शद्बाकंनाचे कार्य विद्यापीठीय पातळीवर झाले पाहिजे अशी अपेक्षा लेखक व्यक्त करतात. परिशिष्टात ’मराठी साहित्य महामंडळाचे लेखनविषयक नियम दिले आहेत.

सारांश, भाषेच्या अभ्यासकांना, हौशी वाचकांना पूस्तक मार्गदर्शक ठरले असे म्हटले तर वावगे ठरु नये.

भाषाविज्नान.

भाषाविज्ञान परिचय
लेखक : डॉ.स.ग.मालशे
डॉ.द.दि.पुंडे
डॉ.अंजली सोमण.

प्रकाशक :
पद्मगंधा प्रकाशन
३६/११ धन्वंतरी सह.गृहसंस्था
पांडुरंग कॉलनी, एरंडवण
पुणे- ४११०३८
मूल्य-१०० रु.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 9 ऑगस्ट, 2010

कोणता मानू मी विठठल ?

महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची ‘पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाची भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली,

30072010490
माढा येथील विठोबाचे मंदिर

पौंडरीकक्षेत्रे, पंडरीपूर, पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते. विठोबाची मूर्ती पंढरपूरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही.

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।

अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन

30072010079
विठ्ठल

मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती. म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माढ्याला पोहचलो. मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील काही संदर्भांची तोंडओळख करुन देतो.

विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा

30072010494
विठोबा…

ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविल्या गेली आहे. ” एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.” सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आणन्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. पुढे ”अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या ‘माढा’ या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.

श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.

30072010496
पायातले तोडे

तर मूर्ती विठ्ठमूर्ती माढ्याला हलविली गेली. त्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी माढ्याला पोहचलो. सावता माळी च्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥

सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व

30072010495
मंत्राक्षर

वर्णनापेक्षा दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
” श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा:|| श्री
वत्स” [पृ.क्र. १२९]

प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ”पांडुरंगमाहात्म्य” चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी

१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे” [पृ.क्र.१३९]

ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ”मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.


अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ”श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ”आद्य मूर्तीचा शोध” हे प्रकरण वरील विषयावर आहे.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 18 एप्रिल, 2010

वडार समाज : इतिहास आणि संस्कृती

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे सामाजिक क्रांतीचा पाया रचला गेला आणि उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची जाणीव निर्माण झाली. आणि शिकलेली पिढी आपल्या हक्काबद्दल आपल्या समाजातील व्यवस्थेवर लिहायला लागली. अशा गावगाड्याचे चित्रण अनेकांनी केले. मात्र एकाच जातीबद्दल संदर्भासहीत अभ्यासपूर्ण लेखन ‘वडार समाज इतिहास आणि संस्कृती’ या भीमराव चव्हाण यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.

एकूण नऊ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात ‘वडार समाजाच्या इतिहासापासून ते वडार समाज घटनात्मक सवलीतीपासून कसा वंचित आहे’ इथपर्यंत मांडणी या पुस्तकात केलेली दिसते.

महाराष्ट्रात गावकुसाबाहेर पाल टाकून राहणा-या समाजापैकी एक म्हणजे ‘वडार’ समाज. वडार समाजाचे मूळ स्थान ओरिसा [ओडिसा]. ओडू राजामुळे उत्कल [ओडू] देश म्हणूनही तो ओळखल्या जातो. वडार समाजाचा मुख्य व्यवसाय खाणकाम, मातीचे काम, वाळू-दगड आणि बांधकामास साहित्य पुरविणे. विहिरी खोदणे, इत्यादी. वडार जातीच्या लोकांमधे व्यवसायावरुन पोटभेद आहेत गाडीवडार, मातीवडार, पाथरवट इत्यादी. वडार समाजाची भाषा तेलगुमिश्रित अशी आहे. काही ठिकाणी ओडियाही बोलल्या जाते. अशी बरीच माहिती सदरील पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर दगड फोडून वरवंटे, पाटे बनविणा-या या समाजाकडे हा व्यवसाय कसा आला त्याबद्दलही एक आख्यायिका वाचायला मिळाली.

” नाशिक येथील पंचवटीमधे सीता एका शिळेवर बसून अंघोळ करीत असतांना एका वडाराने चोरुन पाहिले. अंघोळ करुन गेल्यानंतर या वडाराने त्या शिळेचा हातोडीने दोन तुकडे केले. त्यातील एक दगड तो वडार घेऊन गेला. त्यानंतर सितेने येऊन पाहिले तेव्हा शिळा फुटल्याचे दिसले. त्याचा राग येऊन सीतेने शाप दिला की, यापुढे तू दगड फोडत राहशील. तेव्हापासून आजपर्यंत वडाराचे वंशज दगड फोडण्याचे काम करीत आहेत ” पृ.क्र.१९७

अशा अनेक कथा, आख्यायिका, याची तपशिलवार माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. वडार समाजाचा इतिहास, ओड्र मूळ क्षत्रिय कसे आहेत, वडार शब्दाची उत्पत्ती, वडार समाजाच्या उपजाती, संस्कृती, ब्रिटीशांनी लादलेला गुन्हेगारी कायदा, लोकसाहित्य व लोकगीते, बोलीभाषा व लोकसमजुती पुस्तकात वाचायला मिळतात.

भारतातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा ‘वडार’ समाज आजही फारसा बदललेला दिसत नाही. त्याची भाषा, लोकगीते, रुढी-परंपरा, राहणीमान, वेशभूषा, यात फारसा बदल झालेला दिसत नाही. अजूनही या समाजामधे बदलांची मानसिकता दिसून येत नाही.

‘वडार’ समाज शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे हालअपेष्टा पाचवीलाच पुजलेली. सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपण आजही या समाजातून दिसून येते. सामाजिक चळवळ आणि घटनेने दिलेले अधिकार यावरही चर्चा ‘वडार समाज घटनात्मक सवलीपासून वंचित’ या प्रकरणात दिसते.

‘वडार’ समाजाचे वास्तव चित्रण, वडारांच्या समस्या, आणि वडार समाजाबद्दल नवनवीन माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखकाने केलेले आवाहन या पुस्तकातून वाचायला मिळते. समाजशास्त्रीय अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे वाटते.

‘वडार समाज
इतिहास आणि संस्कृती’
लेखक : भीमराव व्यंकप्पा चव्हाण
स्वाभिमान प्रकाशन, औरंगाबाद.
मूल्य २५०/- रुपये.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 मार्च, 2010

खिंड


हॉल क्रमांक पाच.
वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा
पेपर इंग्रजीचा.
मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या.


पहिला तास सहज निघून जातो.
सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली.
मास्तर कॉप्या काढून घेतात.


वर्गात थोडीशी हालचाल.
पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु.

शेवटची पाच मिनिटे.
एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली.
मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या.
आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली.

सर, उत्तरपत्रिका द्या ना !
सर, उत्तरपत्रिका द्या ना !

‘‘तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या”
‘‘सर, सर्वच पोरं नकला करतात.
मी केल्या तर काय चुकलं ?”

‘‘उत्तरपत्रिका मिळणार नाही.
आता वेळही संपत आली आहे”

‘‘सर, उत्तर पत्रिका द्या ना …!”

वेळ संपली.
मास्तर, उत्तर पत्रिका जमा करतात.

‘‘सर, उत्तरपत्रिका देणार का?”
‘‘नाही”
‘‘मी इमारतीवरुन उडी मारेन.”

पहिल्या मजल्यावरील
गज नसलेल्या खिडकीकडे त्याची धाव
मास्तर त्याला मिठीत घट्ट पकडतात.

कॉलेजचीच पोरं ती…
पोरा-पोरींचा गदारोळ.

‘‘सर सोडा त्याला तो मरणार नाही”
‘‘मरु द्या”
‘‘सर, किती घाबरतात नै”
‘‘सर, पेपरातल्या बातम्या वाचून आलाय तो”

मास्तरानं पोराला पेपर देण्याचं
खोटं आश्वासन दिलं.
गप्पात रंगवून ठेवलं.

तो पर्यंत पोराचा राग उतरलेला.
‘‘सर, चूक झाली.
असं पुन्हा करणार नाही,
रागाच्या भरात वाहून गेलो”

मास्तरानं वरवर हिम्मत दाखवली तरी,
नोकरीच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच,
मास्तराची खिंडीतून सुटका झाली.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 8 जानेवारी, 2010

अंत:स्थ

एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण [जि.औरंगाबाद]येथील महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणारा तरुण प्राध्यापक.

‘अंत:स्थ’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहात एकूण पन्नासहून अधिक कविता आहेत. कवितांची विभागणी करायची ठरली तर, पहिल्या काही कविता शेतीशी संबंधीत तर बाकीच्या कविता या सामाजिक विषयांवरच्या आहेत. मराठी ग्रामीण कवितेच्या भाषेवर बराच काथ्याकूट मराठी साहित्यात झालेला आहे. पुर्वी ज्याला जानपद काव्य असे म्हटल्या जायचे. त्या काव्याची भाषा कोणती असावी, भाषेचे स्वरुप कोणते असावे, वगैरे. या कवितासंग्रहात कवीने शेतीशी संबंधीत कवितेसाठी खेडवळाची भुमिका पार पाडली आहे. आणि त्यातूनच तो आपला विचार मांडतो. ’तुव्ह सपन लुटलं’ कविता पाहा-

आरं शेतकरी दादा तुही अजब कहाणी
भूक बांधुनी पोटाले पितो घोटभर पाणी.
……………
अरं शेतकरी दादा धान नेल रं आडती
घेऊन रं मातीमोल तुल्हे मातीत गाडता
अरं शेतकरी दादा तुव्ह आयुष्य घटलं
सुखी पाहता सपन सारं रघट आटलं
अरं शेतकरी दादा तुव्ह नशीब फुटलं
हातपदरीचा घास तुव्ह सपन लुटलं (पृ.क्र.१५)

शेतक-याचं सनातन स्वप्न की, शेतीतून येणा-या उत्पन्नाने भविष्यकाळ सुखाचा होईल. पण मोंढ्यावर धान्य नेल्यानंतर तेथील दलाल धान्यांना मातीमोल भाव मागतात. रक्त आटवून सुखी स्वप्न पाहिलं जातं ते स्वप्न दलालाकडून लुटल्या जाते. या व्यवस्थेकडे कवी निर्देश करतो. एकूण सर्वच शेतकरी हे जमीनीशी निगडित आहे. ती जमीन पावसावर अवलंबुन आहे. पाऊस हेच शेतक-याचं जीवन आहे. सतत आभाळाकडे पाहणारा शेतकरी हे तर वर्तमानपत्राचं आवडतं चित्र आहे. अशाच आभाळाकडे डोळे लावणा-या ’परंपरा’ नावाच्या कवित अशीच आहे. आभाळातील चांदण्याकडं पाहत शेतकरी स्वप्न पाहू लागतो. या वेळेस चांगला पाऊस होईल. पीकपाणी चांगले येईल. मी मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवीन. मुलगा साहेब होईल.मी गावभर फिरुन सांगेन ‘मह्या पो-या सायेब झालाय’. पण दोन-चार सरी पडतात आणि शेतक-याचं स्वप्न ढेकळात विरघळून जातं. पाहता पाहता शेतक-याचं पोरगंही शेतकरीच होतो. आता बापाची जागा तो घेतो. पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पाहतो. त्याचंही स्वप्न विरघळून जातं, अशी ती ‘परंपरा’ पुढेच चालूच राहते. ’मातीशी नातं’ ’कष्टाचं वान’ ’आस’ ’शाप’ ’रान मातीची कहाणी’ ’आसवांचा महापूर’ या अशा कवीतेतून शेती आणि शेतक-याच्या प्रश्नाभोवती त्यांची कविता फिरतांना दिसते. असे असले तरी, शिवारातील शेतकर्‍याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं अशी कविताही या काव्यसंग्रहात आहे. उदा. हिरवा शालू-

राज्या-परधान्या
जुंपली तिफन
दुबार पेरणं-माळरानी
फुटले अंकुर
शेवाळलं रान
पावसाचं गाण-शिवारात
……………
…………..
हिरवा शालू
शेती अंथरला
शब्द मंतरला-तिन्हीसांजा
शालू हिरवा नटली धरती
मनाला भरती-कुणब्याच्या. [पृ.क्र.१८]

शेतीभातीच्या कवीतेनंतर कवीचं मन समाजातील व्यवस्थेकडे वळतांना दिसते.’पुरे झाले आता’ कवीतेत धर्म, संस्कृती, देव, धर्मसुत्र या सर्व गोष्टींनी मानवतेचे लचके तोडले जाते असे कवीला वाटते. दगडाच्या देवाला किती मानपान आहेत. पण माणसाला काय ते दारिद्र्य. नैवेद्य,नवस, पुर्ण करण्यासाठी किती ही माणसांची धावपळ. धर्म, वेद, यांनी माणूस संमोहित झाला आहे. आणि या अस्त्राद्वारे सामान्यांना लुटण्याचे एक कुरण प्रस्थापितांकडे आहे. कवी म्हणतो-

पुरे झाले आता
देव्हारे माजविणे
पाषाण पूजविणे-मंदिरात
माणूस माझा देव
मानवता तो धर्म
माणुसकी ते कर्म-माणसाचे. [पृ.क्र.२८]

हिंदू धर्मातील काही चालीरिती, परंपरा, याची चिकित्सा कवी करु पाहतो. सामाजिक परिवर्तन कवीला अपेक्षीत आहे. माणूसकी धर्म श्रेष्ठ आहे, या वर कवीचा भर आहे. धर्म-कर्माच्या व्यवस्थेमुळेच इथे विषमता निर्माण झाली असे कविला वाटते. इथे कवीची भुमिका ही सुधारकाची दिसते. ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे’ या मानसिकतेला बदलण्याचा विचार कवी व्यक्त करतो. त्यांची ’ ‘सत्यधर्म’ नावाची कविता बोलकी आहे. शतकानुशतके खुळचट धर्माच्या कल्पना लादून समाजमनाला पंगु बनवल्या गेलं. दगडांना शेंदूर फासवून त्यांनी भोगस्थाने निर्माण केलीत. आता ही शेंदरी दैवते लाथाडली पाहिजेत. भ्रामक धर्मशाही उलथवली पाहिजेत. आणि तुका, फुल्यांनी, सांगितलेला ‘सत्यधर्म’ जाणुन घेतला पाहिजे. अशाच पुरोगामी विचाराने भारल्या गेलेल्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. ‘तुकोबा तुझेही हात सनातनी असायला हवेत’ ‘ सनातनी पहाटेचं सावट’ ‘दिवसही वै-याचा आहे’ या कवितांमधून कवी आधुनिक विचारांशी नातं सांगतो. काही कविता राजकारणावरही आहेत.’बाबा हो लोकशाही’ कवीतेत कवी म्हणतो-


सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
……………..
…………..
पाच वर्षानंतर फेरी येते,
ज्या हातानं, आमची मुस्काट दाबली,
भाकरी हिसकावली
तीच हातं
आमच्यासमोर जोडली जातात
झोळी पसरुण भीक मागतात अन
कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
दिसून येतं
पुन्हा एकदा जैसे थे
लोकशाही बाबा लोकशाही.[पृ.क्र.५०]

‘अदिमाचा हुंकार-शब्द’ ही कविता अधिक सुंदर आहे. शव्द उठवतात रान, शब्द पेटवतात रान, शब्द जीवनगाण कधी, शब्द वरवरचा उमाळा कधी. ही दीर्घ कविता या काव्यसंग्रहाची सर्वांगसुंदर कविता ठरावी. ‘लोकशाहीचं गाणं’ ‘गुलामीचं हस्तांतर’ ‘हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतोय’ या आणि अशा अनेक कविता व्यवस्थेबरोबर स्वार्थी राजकारणावर भाष्य करतांना दिसतात. तसेच ढोंगी परिवर्तनवाद्यावरही ते आसुड ओढतात. परिवर्तनाच्या नावाखाली परिवर्तनवादी शोषण करीत आहेत. दांभिक लोक, लोकशाहीच्या नावाखाली लोकांची लूट करत आहेत. त्यावरही कवी प्रहार करतो. कवी म्हटला की, आईवर कविता ही आलीच पाहिजे. ‘माय माऊली’ ‘मायमही’ ‘सकळांची आई’ अशा कविताही वाचनीय आहेत. एकूण काय तर वर्तमानाचं भाष्य कवितेत आहे. स्वातंत्र्य आणि त्याच्या सुखाच्या कल्पनांना तडा गेल्यानंतरची वेदना कवितेत आहे तसा विद्रोहही आहे. सामान्य माणसाच्या सुखाचा शोध कवीला घ्यायचा आहे. भावना भडकविणारी वृत्तपत्र, स्त्री देहाचे नागडे दर्शन घडविणारे प्रसारमाध्यमं भारताची प्रतिमा होत आहेत. सामान्य माणसाच्या स्वप्नभंगाची भावना कवितेतून वाचायला मिळते. असे असले तरी काही दोष ज्याकडे लक्ष वेधले पाहिजे असे वाट्ते की, धनदांडगे शेतकरी सोयी-सवलती घेतात त्यावर भाष्य दिसत नाही. मोजक्याच शेतक-यांचं चित्र, तेच-तेच दयनीय अवस्थेतील शेतक-याचं वर्णन असा विचार कविता वाचतांना डोकावतो. तसेच परिवर्तनाची आस आक्रस्ताळपणे येते, असे काही कविता वाचतांना जाणवते. अशी कविता म्हणून मी ’हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतो’ ’आव्हान’ ’परिवर्तनवादी’ अशा काही कवितांचा नामोल्लेख करेन. बहुतांश कविता मुक्तछंद आणि अभंगाच्या आकृतीबंध असलेल्या आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची कवीतेवर भाष्य करणारी प्रस्तावना आहे. कवितेचा संदेश ‘माणूसकी’ आणि संघर्ष’ आहे. आणि याच भावना अधिक संवेदनशीलतेने, पुढील काव्यसंग्रहात अधिक जबाबदारीने याव्यात या करिता मी कवी मित्राला शुभेच्छा देईन.
अंतस्थ

‘अंत:स्थ’
डॉ.सर्जेराव जिगे
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत ८०/- रु.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 31 ऑक्टोबर, 2009

डेव्हीड शेफर्ड…अलविदा…!

डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे

devid 9
डेव्हीड शेफर्ड……!वाह रे, अदा..!

तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते. क्रिकेट चालू असतांना पायचीतचा निर्णय, बॅटीचा बारीक स्नीक लागून झेलबाद चा निर्णय जेव्हा शेफर्ड घेत असतील तेव्हा खेळाडूबरोबर प्रेक्षकांच्या मनातही धडधड वाढलेली असायची. क्रिकेट पंचाचे झेलबाद, पायचीत हे निर्णय सतत वादाचे असतात. तसेच नोबॉल, वाइड, हेही निर्णय त्यांचेच असतात आणि ब-याचदा त्यात चुकाही होत असतात. पण तीक्ष्ण नजर आणि अचूक-सर्वमान्य निर्णय घेण्यात शेफर्ड पुढे होते. आधुनिक कॅमेरे येण्याअगोदर सर्व निर्णयाचा जवाबदारी या दादा पंचाची होती. मैदानावर सतत लयबद्ध हालचाली करणारा डेव्हीड शेफर्ड आपली एक वेगळी ओळख ठेवून असायचे.असा डेव्हीड

Devid 3
मैदानावर…..डेव्हीड शेफर्ड…..!

स्थूल शरिरामुळे मोठ्या फटक्यांवर भर देणारा हा फलंदाज होता. शेफर्ड यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २८२ सामन्यात ४७६ डावात १२ शतक आणि ५५ अर्धशतके केली. दहा हजार ६७२ धावा आपल्या खात्यावर नोंदवल्या” ही बातमी एक खेळाडू, रसिक म्हणुनही माहिती नव्हती. [बातमीतून साभार] क्रिकेटमधील उत्तम फलंदाज म्हणून निवृत्त

Devid 6

झाल्यानंतर त्यांनी पंचगिरी सुरु केली. पंचाच्या कारकिर्दीवर आक्षेप हे असतात, पण फार कमी आक्षेप त्यांच्यावर असावेत. फलंदाज गोलंदाजांना पंचाचे अनेक निर्णय आवडत नसतात. पण तटस्थ पंच क्रिकेट खेळाचा सर्वोच्च आनंद देतात. नवशिख्या पंचानी अशा पंचाकडून निर्णय घेण्याचे शिकले पाहिजे. . मनमिळावू आणि कर्तव्यकठोर पंच असे नावलौकिक असलेले शेफर्ड कर्करोगाने आजारी होते. पंच डेव्हीड शेफर्ड यांची कारकिर्द परमेश्वराने त्यांना बाद करुन त्यांची इहलोकाची खेळी [६८ वर्षावर]संपवली. डेव्हीड शेफर्ड यांना माझी क्रिकेट खेळाडू , एक चाहता, क्रिकेट रसिक
म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 15 सप्टेंबर, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढी

नंद्या (नागेश भोसले ) गरीब शेतकरी. घरात बायको माली (माधवी जुवेकर), आई, बहीण आणि मुलगा असे कसे तरी हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढणारे हे शेतकरी कुटुंब. शाळेत फिस भरायला पैसे

गोष्ट छोटी डोंगराएवढी


नाहीत म्हणून शाळा सोडून देणारा त्याचा मुलगा. मागील वर्षी घेतलेल्या कापसाच्या पैसे मिळाले की चालू वर्षी बी -बियाणे घेता येईल असा सतत विचार करणारा एक काबाड-कष्ट करणारा एक सामान्य शेतकरी. शिक्षन घेऊन संस्थेत डोनेशन भरुन नौकरी मिळविता येईना म्हणून शहरातून शेतीसाठी गावाकडे परतलेला नंद्याचा मित्र राजाराम (मकरंद अनासपुरे). शेतीसाठी बी-बियांणांची व्यवस्था करण्यासाठी आणि बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी सतत कार्यालयात हेलपाटे मारुन थकलेला कर्जबाजारी शेतकरी. पैसे मिळावेत यासाठी पशुधन आणि दागिणे सावकाराकडे ठेवावे लागते.  असे सतत संकटाशी लढणारे नंद्याचे शेतकरी कुटुंब.

कर्जबाजारी होऊन गावातील संभा आणि आणखी एक शेतकरी आत्महत्या करतात. कर्जमाफीचे पॅकेज, प्रसारमाध्यमे, गावात तोकडे प्रयत्न करणारे स्वयंसेवी संस्था, अशा विविध अंगाने चित्रपट पुढे सरकत जातो. दुबारपेरणीमुळे कर्जबाजारी झालेला नंद्या शेतकरी त्याच्या बहीणीला टोपल्या वगैरे बनविण्याच्या कामाला पाठवतो. तिथे तेथील मालक तिच्या आब्रुवर टपून बसलेला असतो. नंद्या कर्जबाजारात वाहात जातो. आणि किटकनाशक पिऊन आत्महत्या करतो.

इथे चित्रपटाचे मध्यंतर होते मी सॆंडवीच शोधतो ते काही मिळत  नाही. मग कॊफी  घेतो. पुन्हा माझ्यासिटवर येतो तर दुसरा प्रेक्षक माझ्या  खुर्चीवर बसलेला असतो. त्याला वाटले मी गेलोय, तशी प्रेक्षकांची संख्या कमीच होते.

मध्यंतरानंतर चित्रपट पुढे सुरु होतो. राजा आपल्या मित्राच्या आत्महत्येने व्यथीत होतो. शासनस्तरावरील भ्रष्टाचाराचा बदला घ्यायचे तो ठरवतो.  आता तो बदला कसा घेतो ? शेतक-यांचे प्रश्न सुटतात का ? सरकारातील कृषीमंत्री (सयाजी शिंदे)  शेतक-याला न्याय देतो  काय ? या आणि अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी गोष्ट छोटी डोंगराएवढी पाह्यलाच हवी.

एक गोष्ट मात्र खरी आहे की, निळू फुल्यांना चित्रपटात फार संधी मिळालेले नाही.  संपूर्ण चित्रपटात त्यांच्या वाटेला फार कमी संवाद आले आहेत  त्यांचा हा शेवटचा चित्रपट.  अतिशय

niluphule


थकलेले निळूभाऊ पाहतांना -हदयात कालवा कालव होते.  फार कमी बोलूनही दारिद्र्यात पिचलेला शेतकरी लक्षात राहतोच. मकरंद अनासपुरे यांनी सुशिक्षित शेतक-याची भूमिका चांगली केली आहे. पण, इतर चित्रपटातून  लक्षात राहणारा मकरंद अशा चित्रपटात शोभत नाही असे वाटले. आत्महत्या करणारा शेतक-याच्या भुमिकेत असणारा नागेश भोसलेची धष्टपुष्ट तब्येत पाहता तो शेतकरी वाटत नाही. मात्र दिनवाणा, दुबळा, रडका चेहरा, तिरपी मान, याबाबतीत अभिनय चांगला केला आहे.  सयाजी शिंदे यांनी कृषीमंत्र्याची भुमिका चांगली रंगवली आहे. चित्रपटातील काही प्रसंग चांगले झालेले आहेत जसे,  शेतक-याच्या आत्महत्येनंतर विविध वाहिन्याचे वृत टीपण्यासाठीची धडपड,  शेतात मानेवर पेरणीसाठी तिफणीला बैलाबरोबर  जुंपून  घेणारा शेतकरी,  शेतक-याकडे पैसे नसतांना विविध हौसे-मौजेच्या  योजना घेऊन येणारे फायनान्सर, शासकीय कार्यालयात शेतक-यांची शोषण करणारी  शासकीय वृत्ती हे आणि काही प्रसंग चित्रपटाला एक उंची देतात.  चित्रपट पाहून सुन्न वगैरे होते का ? या प्रश्नाच्या उत्तराऐवजी शेतक-यांच्या प्रश्नाची जाण चित्रपटात अधिक वास्तवतेने येत आहे, ते नेटकेपणाने निर्माते मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, आणि दिग्दर्शक नागेश भोसले यांनी मांडले आहे. इतकाच एक  चांगला विचार  चित्रपटगृहातून बाहेर पडतांना मनात निर्माण होतो.

चित्रपट : गोष्ट छोटी डोंगराएवढी
दिग्दर्शक : नागेश भोसले
निर्माते : सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे,

« Newer Posts - Older Posts »

प्रवर्ग