Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 29 ऑक्टोबर, 2022

लावणी माझं जग आहे : सुरेखा पुणेकर

मिसळपाव मराठी संकेतस्थळावर २०१५ साली दिवाळी अंकासाठी घेतलेली मुलाखत.

महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला – लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्‍या, ‘कारभारी दमानं’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या’, ‘इचार काय हाय तुमचा’ या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्‍या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नुकत्याच औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी नटरंगी नार या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मिसळपावसाठी गप्पाटप्पा मारण्यासाठी त्यांनी वेळ दिला आणि कार्यक्रम पूर्ण सादर झाल्यानंतर त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

IMG_20151024_221647
सुरेखा पुणेकरांची एक अदा
आतापर्यंतचा आपला जीवनप्रवास आणि आपण लावणीकडे केव्हा वळलात, सविस्तर सांगाल काय?

वयाच्या आठव्या वर्षीपासून मी स्टेजवर काम करते. शाळा नाही, शाळा शिकले नाही. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. वडील पुणे स्टेशनला हमाली करत होते. हमाली करत करत कार्यक्रम करायचो. त्यांचं सर्व्हिसकडे लक्ष नव्हतं. जास्त लक्ष तमाशात होतं. माझे वडील तमाशात नाच्या आणि सोंगाड्याचं काम करायचे. आईचे आई-वडीलसुद्धा कलावंत होते. वडिलांचे आई-वडील कलाकार नव्हते, पण वडील कलाकार होते. असं करत करत वयाच्या आठव्या वर्षीपासून बाहेरगावी आई-वडिलांबरोबर फिरत फिरत कला शिकलो, पण शाळा नै शिकलो. शाळेची पायरी कशी असते ते माहीत नाही. असं करत करत सुरेखा पुणेकर नावाने तमाशाचा स्वतंत्र फड काढला. १९८६चा काळ असेल. १९८६,८७,८८ असे तीन-चार वर्षं तमाशाचा फड चालवला. पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या फडाचा कार्यक्रम होता. आमच्या तमाशाचे शंकर चोकुरे आणि उत्तम रतन हे दोन तमाशेवालेही होते. आमच्या तमाशाचा तंबू फुल्ल भरला होता आणि तेवढ्यात आमच्या गेटवर पोराला, ड्रायव्हरला आणि ढोलकीवाल्यांना आमच्या विरोधकांनी खूप मारलं. त्यातला एक बेशुद्ध पडला. आम्ही त्यांना घेऊन दवाखान्यात निघालो, तर आमची गाडी एका छोट्या दरीत दोनतीनशे फूट खोल पडली. गाडीने चारपाच पलट्या घेतल्या. कोणी दगावलं नाही, पण कोणाचा हात तुटला, पाय मोडले, पण बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीत आला. सर्वांना सटाण्याच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं आणि तिथेच ठरवलं – आता तमाशा करायचा नाही. पण आम्ही पडलो जवान. आम्ही कलाकार कोणाचं नीट ऐकत नाही. सामनेवाले (तमाशावाले एकमेकांचे विरोधक) त्रास द्यायचे. मग पुढे आम्ही आर्केष्ट्रा सुरू केला. नाटकं केली. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ नाटक सुरू केलं.

IMG-20151019-WA0015
साधं असणं, साधं दिसणं.
लावणी जीवनाचा प्रवास असा सुरू झाला, तर म्हणजे एकदम तमाशा आर्केष्ट्रा सोडून थेट नाटक… आणि त्यात तुमची काय भूमिका असायची?

मी नाटकात महत्त्वाच्या स्त्री भूमिका करायचे. माझ्याबरोबर जयमाला इनामदार, राम नगरकर., आणि खूप लहानमोठ्या कलाकारांसोबत काम केलं.

पैसे किती मिळायचे?

दोनशे रुपये मिळायचे. राम नगरकर यांच्याबरोबर काम करताना चांगलं वाटायचं. मधु वांगीकरबरोबरसुद्धा काम केलं. खुप कलावंतांबरोबर काम केलं. ‘फक्कड बाजीराव’ हे नाटक खूप दिवस केलं. खेडेगावातही खूप नाटकं केली. ढोलकी, तबलेवाला आणि पेटीवाला असला की आमचं नाटक सुरू व्हायचं. हौशी कलाकारांबरोबर आणि नाटक जसं मिळेल तसं काम केलं. चैत्र महिन्यात तमाशात करायचो. १९९८ला लावणी महोत्सव भरला होता..

अकलूजला?

अकलूजला नाही. मी कधीच अकलूजला गेले नाही. अकलूजच्या लावणी महोत्सवात गेले नाही.

इतका मोठा महोत्सव आणि आपण गेला नाहीत? काय कारण?

मी ते कारण सांगू शकणार नाही.

बरं, ठीक आहे. आपल्या जीवनात सतत संघर्षच दिसतो. आपण स्वत:चा फड उभा केला आणि तो प्रवास आता महाराष्ट्रात लावणीला एक मोठी प्रतिष्ठा देऊन गेला. आज लावणीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे का?

दृष्टीकोन बदलला आहे. कलावंतांचीही चूक असते आणि अशा चुका पदरात घेऊ नये. आणि प्रेक्षकांनी त्याचं भांडवल करू नये. पूर्वी पारंपरिक लावणी असायची. आता चित्रपटातील गाण्यावर नृत्य करावं लागतं. लोकांना ते आवडतं. पूर्वी लावणीचं सौंदर्य दिसायचं. आता ते दिसत नाही, तेव्हा वाईट वाटतं.

सादरीकरणावर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा परिणाम होतो का?

प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या नाहीत. पण प्रेक्षकांनी आम्हाला पारंपरिक लावणी मागितली पाहिजे. कलाकारांना चित्रपटातील लावण्या करायला सोप्या जातात. आजच्या कलाकारांना कष्ट करावे वाटत नाही. पैसा जास्त आणि कष्ट कमी. आणि मग त्यात कला कमी दिसते. आमच्या टायमाला कसं होतं.. कष्ट खूप होते.

थोडंसं वेगळं विचारतो. पारंपरिक लावण्यांबरोबर धार्मिक लावण्या कधी कराव्याशा वाटल्या का?

धार्मिक कार्यक्रम आहे ना. वाटलं होतं तुम्ही याल ना. या उत्पातांच्या लावणीवर माझा कार्यक्रम आहे. माझी त्याच्यावर कॆसेट आहे. दहाबारा लावण्या आहेत. अशा जाहीर कार्यक्रमात कोणी म्हणलं तर मी ते सादर करते.

IMG-20151019-WA0016
सुरेखा पुणेकरांची अजून एक सुंदर अदा
महाराष्ट्र सरकार आपल्या सांस्कृतिक विभागातर्फे असे लावणीचे विविध कार्यक्रम घेत असतात. अशा कार्यक्रमांमधून आपल्याला प्रेरणा मिळते काय?

महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाटकांवर असतं. लावणीबाबत शासन काही करत नाही. आणि प्रोत्साहन म्हणलं तर कार्यक्रम सर्व सारखेच वाटतात. लावणीला काही आर्थिक मदत होत नाही.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?

लावणी सादर केल्यानंतर प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून सादरीकरणाला दाद दिली पाहिजे. कलाकारांना उत्साह येतो. धांगडधिंगा नको. बंद थेटरातले आणि उघड्यावर सादर होणारे कार्यक्रम यातला प्रेक्षक सारखाच. जास्त उत्स्फूर्तपणाही नसावा.

तमाशा आणि लावणी हे कलाप्रकार दीर्घकाळ टिकून राहिले पाहिजेत, यासाठी काय केलं पाहिजे?

प्रेक्षकांचा पुढाकार आणि सहभाग पाहिजे. तमाशा-लावणी यातील कलाकार आपली कला दाखविण्यासाठीच कला सादर करत असतात. अशा वेळी कलाकाराकडून कला मागावी. छ्क्कड, बैठकीच्या लावण्यांची मागणी झाली पाहिजे. जुने लोक सांगायचे – हे गाणं पाहिजे. आता ते दिसत नाही. परदेशात मराठी मंडळाच्या कार्यक्रमात पारंपरिक लावणीची मागणी झाली होती.

सादरीकरणासाठी लावण्यांमधला कोणता प्रकार आवडतो?

मला सर्वच लावण्या आवडतात. पारंपरिक लावण्या विशेष आवडतात.

लावणी हा कलाप्रकार कालबाह्य होत चालला आहे का?

लावणी हा कलाप्रकार कालबाह्य झालेला नाही. आज लावणीच्या दोन-अडीचशे कंपन्या आहेत. कार्यक्रम वाढले आहेत.

आपल्या या धावपळीच्या व्यग्र कार्यक्रमात कोणत्या गोष्टी करायला आवडतात?

मला शेतीची आवड आहे. पुरणपोळी आवडते. मला मटन आवडतं. मला मटन करायला आवडतं. घरी असल्यावर स्वयंपाक करायला आवडतं.

लावणीच्या संदर्भात भविष्यात काय केलं पाहिजे? काय करणार आहात?

लावणीची मला खूप आवड आहे. लावणीने मला पद, पैसा, मान दिला. लावणीने मला सर्व काही दिलं. कुटुंब स्थिर केलं. माझं कुटुंब असं होतं की मला घरच नव्हतं. दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो. आता सर्व बहिणींना बंगले बांधून दिले. त्यांची लग्न, त्यांच्या मुलांची लग्नं मीच करून दिली. लावणीने मला सर्व काही दिलं. याच्यापुढे माझी अशी इच्छा आहे की जी मुलगी जिला वाटतं की मला कार्यक्रमात यायचं….. माझ्या कार्यक्रमात मुली अशा आहेत की दोनचार जणींच्या आता परीक्षा आहेत, म्हणजे त्या शिकत असतात. त्यांची घरची परिस्थिती बरोबर नाही, तेव्हा शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित बसावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. माझी इच्छा आहे की त्या मुलीला पूर्ण तयार करायचं की ती जरी गरीब घरातली असली, तरी तिला आपल्या पायावर पूर्ण उभी करायची. तिने तिचं कुटुंब सांभाळायचं. असं ‘नटरंगी नार’च्या माध्यमातून करतो. दर वर्षी नवनवीन मुली येत असतात. चांगल्या तयार झाल्या की पिच्चर लाईनला जातात. काही नाटकात जातात….

IMG-20151103-WA0000
एक मनमोहक अदा
म्हणजे तुम्ही त्यांच्या भविष्याची तरतूद करून ठेवता. कलेचं क्षेत्र असो की उदरनिर्वाहाची व्यवस्था असेल..

हो, तो माझा उपक्रमच आहे. इथून पुढेही तेच करेल आणि सध्याही करत आहे. ज्या मुलीला वाटतं की माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, कुटुंब सांभाळू शकत नाही.. काही काही कुटुंबामध्ये वडील आजारी असतात, आई आजारी असते, बहीण-भावंडं आजारी असतात., तर अशा मुलींसाठी आम्ही पूर्ण मदत करतो. अशा मुलींना मी आणि माझ्या मुली शिकवतात.

आपल्याशी गप्पा करून छान वाटलं. मिसळपाव डॉट कॉमच्या वतीने मी आपले मन:पूर्वक..

अरे हो, मला मिसळपाव खूप आवडते. मला कधी वाटलं तर मी मिसळपाव करते घरी. कधीकधी आवडीने पाव मागवणार, मिसळ करणार….

पुन्हा एकदा आपले मन:पूर्वक आभार मानतो. एक फोटो घेऊ का?

आता मेकप नसल्यावर मला लोक ओळखणार तरी का? पाहताय ना माझा अवतार? नका घेऊ फोटो. अगं जयश्री, यांना वाट्सपवर फोटो पाठव बरं जरा..

आभार….!

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 17 ऑक्टोबर, 2021

इश्कमे शहर होना

आज रवीश कुमारचं पुस्तक ‘इश्कमे शहर होना’ वाचायला मिळालं. रवीश कुमार, आजच्या काळात त्यांना पत्रकार म्हणणे जरासे संकुचितपणे केलेले वर्णन ठरेल. सर्व पदव्या आणि विशेषणांच्या पलीकडे तो जीवनाच्या गोष्टी सांगणारा एक आधुनिक कथाकार वाटतो. (वेगवेगळी मतं असू शकतील) पत्रकार म्हणून केवळ विविध बातम्यांच्या वाहिन्यावर फक्त त्यांना ऐकावे वाटते असा माणूस उत्सुकतेचा विषय वाटला नाही तर नवल नाही.

अशा रवीश कुमारचं लघुकथांच्या साखळीत विणलेलं छोट्या छोट्या ओळीतलं प्रेयसी सोबतचा दिल्ली शहरातल्या भटकंती बरोबर समाज, सांस्कृतिक घटनांच्या स्पर्शात लिहिलेलं सुंदर पुस्तक म्हणजे ‘इश्कमे शहर होना’ कितीतरी वाक्य ‘कोट’ करावीत अशी आहेत.’जगह की तलाशमें हम इस शहरमें और कितने शहर बदलेंगे’ ‘इश्क में अजनबी, न रहे तो इश्क नही होता’ ‘ जब कुछ नही भी बचेगा तो इस टिफिन बॉक्स में हम मोहब्बत की दो रोटिया रखा करेंगे’

चार-चार तर कधी कधी दहा एक ओळीतलं, सुंदर चित्रांसहित चितारलेले पुस्तक वाचनीय आहे. सलग दोन तास वाचायला बसले की पुस्तक संपते.

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा, आपापल्या प्रेमाच्या आठवणींचा एक गोड कोपरा असतो. रवीश कुमारच्याही आयुष्यातल्या आपापल्या ठरलेल्या जागा आहेत. विशेषत: दिल्ली. लेडीज होस्टेल समोर उभे राहणे आहे, पाऊस, मंदिर, मशीद, गल्ली, रस्ते, रात्र, पहाट,चाँद, सार्वजनिक आंदोलने, टीव्ही, मीडिया, अण्णाचं आंदोलन, मार्क्स, लोकपाल ते लवपाल असा सुरेख प्रवास आहे.

काही काही वाक्य आणि कथा कोट करून लिहावीत अशी आहेत पण सर्वच सांगण्यापेक्षा पुस्तक एकदा वाचायलाच हवं…!

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 23 सप्टेंबर, 2021

रुद्रेश्वर

श्रीगणेश लेखमाला २०२१

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात. असा हा श्रीगणेशोत्सव आपल्यात आनंद आणि उत्साह भरतो. अशाच एका दुर्लक्षित श्रीगणेश लेणीची, रुद्रेश्वराची ‘श्रीगणेश लेखमालिकेत’ माहितीची कथा.

IMG_20210906_134443
श्री गणेशमूर्ती

आपण जर कधी जगप्रसिद्ध अजिंठ्याला आलात तर, अजिंठा लेणीच्या पाठीमागील डोंगराच्या बाजूसच रुद्रेश्वर लेणी आहे. दर श्रावणात तिथे प्रचंड गर्दी होते. यंदाच्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी काही भक्त मित्रांबरोबर तिथे जाण्याचा योग आला. अजिंठ्यापासून वीस किलोमीटर परिसरात सोयगावपासून तीन चार किलोमीटरवर पायवाटेने एक ते दीड किलोमीटर डोंगरचढण चढून गेलो की घनदाट झाडीतून प्रवास करीत आपण या लेणीस पोहोचतो. आजूबाजूस हिरवेगार जंगल, सतत मोरांची केकावली आणि लहान सहान धबधब्यांचा आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतो.

IMG_20210906_134504
IMG_20210906_135524
नृसिंह आणि अंधकासुरवध

लेणीजवळ पोहचतात कोसळणारा धबधबा आणि डोळ्यात मावणार नाही असे निसर्ग सौंदर्य आपले स्वागत करते. मागील दोन वर्षापासून धबधब्याच्या प्रपातातून खोल खड्डे झालेले होते ते यावेळी वाळू दगडांनी भरून टाकल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेतला तर नवल वाटायला नकोच. वृद्ध लोकांसाठी चढण कठीणच आहे, पण मजल दरमजल करीत पोहोचणे जमूही शकते. लेणीच्या बाहेर शेंदूर लावलेली उमा माहेश्वराची मूर्ती आहे, ओळखू न येण्याइतपत शेंदूर लावलेला आहे.

नमस्कार करुन पुढे गेलं की लेणीच्या आत ऐसपैस सभामंडप आहे. मोकळ्या अशा तीसेक फूट आणि दहाएक फूट उंचीच्या आकाराच्या मोकळ्या सभागृहात प्रथमदर्शनी श्रीगणेशाची अतिशय सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. अंदाजे, तीन बाय पाच अशा उंचीची ही श्री गणेशमूर्ती असावी. श्रीगणेशाच्या मूर्ती शेजारी रिद्धी सिद्धी आहेत. त्यांनाही शेंदूर लावलेला असल्यामुळे त्याही ओळखू येत नाहीत.

डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. गणेशाच्या उजव्या बाजूस विदारण नृसिंहाची मूर्ती आहे. डाव्या बाजूस शिव अंधकासुराचा वध करतोय तर गजासुराचा ऑलरेडी केला आहे, असे ते शिल्प आहे. वाटसरु आणि तिथे माहिती सांगणारे मूर्तीस नटराज म्हणतात.

रुद्रेश्वर हे शिवाचं नाव. गुरू द्रोणाचार्यांनी शिवाला रुद्रेश्वर नाव दिलेलं आहे, असा उल्लेख येतो. कौरव-पांडवांना शिक्षण आणि दिक्षा देतांना अशी ज्या शिवलिंगाची स्थापना केली ते शिवलिंग म्हणजे रुद्रेश्वर. ही केवळ नावाची कथा. मूळ रुद्रेश्वर कोणते ते मलाही सांगता येणार नाही.

IMG_20210906_134844
IMG_20210906_134832
शिवलिंग आणि नंदी

”वेदांमधे शिवलिंगाचे वर्णन नाही. पण रुद्राचे वर्णन येते. हा रुद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आज कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरुप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रुपांमधे दिसून येते. ह्या रुद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले” १ श्री गणेशाच्या उजव्या बाजूच्याच उंच ओट्यावर महादेवाची मोठी पिंड आहे, हेच ते रुद्रेश्वर. तर समोर नंदीही आहे. भाविक स्नान करुन तिथे अभिषेकासाठी गर्दी करीत असतात. लेणीत प्रकाश नसल्यामुळे इतर शिल्पे कोणकोणती आहेत ते पाहता येत नाही आणि शोधताही येत नाहीत. लेणी समजून घेण्यासाठी माहिती असलेला जाणकार आवश्यक आहे. ही रुद्रेश्वर लेणी अजिंठा लेणीच्या पूर्वी कोरलेली आहे असे म्हणतात परंतु त्याला कोणताही अभ्यासू असा पुरावा नाही त्यामुळे शिल्पांवरुनही लेणी वेरुळ लेणीला समकालीन आहे किंवा त्यानंतरची आहेत असे म्हणावे लागते. लेणी शिल्पांची झीज होत आहे. येणारे जाणारे वाटसरू तिथे वेगवेगळ्या कलांनी त्यात या स्थळाची नासाडी करतांना दिसतात. नावे कोरतांना दिसतात.

लेणीत वेगवेगळ्या लहान लहान चौकोनी आकारांच्या खोल्या आहेत. काही खोल्यांमधे सुरुवातीलाच जी मूर्ती म्हणत होतो ती मूर्ती उमा महेश्वराची आहे. बाजूच्या खोलीत फारशा स्पष्ट नसलेल्या मूर्तींची रांग दिसते ती रांग सप्तमातृकापट आहे. २ दुष्टांचा नाश करण्यासाठी या सात माता आदिदेवांना मदत करण्यासाठी येतात असे म्हटल्या जाते. अनेक शिल्पांमधे शिवशिल्पांच्या बाजूला हा मातांचा पट दिसून येतो. सप्तमातृका ह्या सात हिंदू देवी सदा एकत्र पूजल्या जातात. ब्राह्मी (ब्राम्हणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. काही वेळा यांमध्ये नारसिंही देवीचाही समावेश केला जातो; तेव्हा या विस्तृत समूहाला अष्टमातृका असे म्हणतात. शाक्त व तांत्रिक संघांमध्ये सप्तमातृका वंदिल्या जातात. ३ असे शिल्पपट अनेक लेण्यांमधे बघायला मिळतात. ही सर्व शिल्पे स्पष्ट दिसत नाहीत, यात उजवीकडे वीरभद्र तर डावीकडे गणपती आहे, हे फारसे ओळखता येणे शक्य नाही.

सप्तमातृकापट

या स्थळावर शनीची म्हणून जी मूर्ती दिसते ते शिव, स्कंद किंवा ब्रह्मा यापैकी असू शकतात. शनीचे वाहन कावळा आहे, ते शिल्प इतके तेल ओतून ओतून काळे केले

photo_2021-09-11_09-42-20
श्री शनेश्वर

आहे की कावळा की आहे, की नुसता काळा दगड ओळखता येत नाही. अगदी अलिकडील काळातील ते शिल्प असावे असे वाटते. किंवा अन्यत्र असलेली मूर्ती कोणीतरी इथे आणून ठेवली असावी अर्थात हे सर्व तर्क कोणी जाणकार पाहून खरं काय सांगेल तेव्हा त्या शिल्पाचे रहस्य कळेल.

आता सांगोवांगीच्या गोष्टी. रुद्रेश्वराच्या वरच्या बाजूस जो धबधबा आहे, तिथे साखळदंड सोडलेला आहे, ही खरं तर धोकादायक जागा आहे. नवदांपत्य तिथे दर्शनाला येतात आणि साखळदंडास धरुन उभे राहतात. वरुन पडणारी पाण्याची धार जर बरोबर डोक्यावर पडली तर संतती लाभते असा समज आहे. सतत वेगवान वार्‍यामुळे एका लयीत पडणारी पाण्याची धार एका लयीत पडत नाही. त्यामुळे जेव्हा वारा नसतो तेव्हा सरळ डोक्यावर हे पाणी पडते. अशी ही गमतीदार गोष्ट. आत्ता श्रावणात थोडेफार लोक येत असतात, तेव्हा सोबत असते मात्र एकट्या दुकट्याने त्या रस्त्याने येणे-जाणे सर्वार्थाने धोकादायक आहे. जंगल असल्यामुळे ते फार सुरक्षित नाही.

रुद्रेश्वर पाहून झाले की जवळच वेताळवाडीचा किल्ला आहे, घटोत्कच लेणी आहेत. दोन दिवसात हा परिसर फिरुन होईल. मोठ-मोठी तळी, वाहते झरे, निसर्ग, गणेशाची मूर्ती आणि रुद्रेश्वर हेच या गणेशलेणीचे खरे वैभव. शांतपणे डोंगराच्या एखाद्या पाऊलवाटेतील खडकावर निवांत पळसांची मोठमोठी झाडे, साग, विविध रानफुले आणि जंगल बघत बसावे. देहभान हरपून जावे इतकं ते सुंदर स्थळ आहे. बाकी, देवा, गणेशा फार मागणे नाही. लोक सुखी समाधानी राहू दे अशी प्रार्थना करुन आम्ही रुद्रेश्वराचा अर्थात गणेशलेणीचा तो भव्य क्षण डोळ्यात साठवून माघारी फिरलो.

संदर्भ १) शिवमूर्तीशास्त्र– प्रचेतस. (मिपाकर)
२) शिल्प ओळख मदत : प्रचेतस. (मिपाकर)
३) सप्तमातृका -मराठी विकि.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 24 जून, 2021

आठवणीतील किडे

आपल्या आयुष्यात अनेक कीटक (किडे) -मुंग्या पक्षी प्राणी आलेले असतात. कीटकाची दुनियाच वेगळी आहे. कीटकाचा पर्यावरण म्हणून उपयोग आहे. अनेक आवडते, नावडते कीटक आपल्याला अधुन-मधून दिसत असतात. पावसाळा आला की कीटक दिसायला लागतात. आपला अनेकदा या कीटकाशी चांगला परिचय असतो. आपणास या सर्वांची आठवणही येत असते कारण आपला या कीटकाशी जुना स्नेह असतो. आपला हा धागा त्याच किड्यासंबंधी आहे. लहानपणी आपण यातल्या अनेक किड्यांशी मैत्री केलेली आहे. आपण तासंतास त्यांच्याबरोबर घालवला आहे, अशा आपल्या आठवणींचा हा धा्गा. आम्ही लहानपणी भिंग म्हणून या किड्यांशी खेळायचो. बोरीच्या झाडांवर, काटेरी झाडांवर हे भिंग सापडायचे. भुंग्यांसारख्या याचा आवाज यायचा. मानेजवळ दोरा बांधायचा. आणि तो उडायला लागला की त्याच्यामागे फ़िरायचे. आपण लहानपणी फार क्रूरपणे यांच्याशी वागलो असे वाट्ते. काचेच्या डब्यात बोरीचा पाला आणि हे कीटक किडे सांभाळले अर्थात ते जगायचे नाहीत. पण पुन्हा नव्याने, मित्रांबरोबर अनेक बोरी-बाभळींवर याला शोधत गेला. आम्ही भिंग म्हणायचो तर याला काही ठिकाणी पाचपिंगेही म्हणतात.

घुगी, उंट तर काही ठिकाणी याचं नाव घुंगरपाळ. मातीत गोल आळे केलेले. एक-दोन इंच असलेले याचं गोल घर असायचं. सापळाच लावलेला असतो. भुसभुशीत मातीत त्या गोल घरात मुंग्या बारीक किडे पडले-घसरले की घराच्या टोकाशी खाली असलेला हा किडा आपलं भक्ष्य मातीत ओढून घेऊन जायचा. किडा दिसायला बेकार असला, तर त्याचं पोट-पाठ अगदी नरम असे. आता जालावर शोधत होतो, त्याला पाहून आपण काहीही करत होतो असं फिलिंग आलं. बाकी, याचं घर कितीतरी वेळा उकरून छोट्याश्या काचेच्या डबीत हे किडे सांभाळले आहेत. यांची गोल गोल घरांची एक वस्तीच असायची भारी दिसायचे ते सगळे. रात्री मोडलेली घरे पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित दिसायची नवा डाव नवा खेळ अशा स्वरुपात.

रोलर किडे, शेणाचे बारीक गोळे करून उलट सुलट होत हे किडे ढकलत चाललेले दिसायचे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे किडे खरे तर उपयोगाचे असावेत. पण एक किडा काही वेळ उलटा होऊन गोल गोल तो शेणाचा गोळा ढकलतो तर दुसऱ्या बाजूचा सरळ गोळ्याला ढकलत चालताना दिसतो. पहिला काही वेळ थकला किंवा त्यांची जी काही भाषा असेल त्या प्रमाणे खांदेपालट व्हावी तसे ते आपापल्या जागा बदलून पुन्हा तो बारका गोळा ढकलून घेऊन जाताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कुठून कुठे सुरू असतो काही माहिती नाही. पण, हा खेळ आम्ही पोरं तासंतास बघत असायचो.

रेशीम किडे, पैसा, घुल्या, अशी कितीतरी किडे- कीटक आपणास आठवत असतील. आपल्या काही आठवणी असतील. सोबत काही विशेष माहिती असेल तर, छायाचित्र आणि माहिती याचं स्वागत आहे. असं म्हणतात की सर्व जग नष्ट झालं तरी हे कीटक राहतील. आपल्या आजूबाजूला असा अनेक सृष्टीतला हा पसारा आपल्यासमोर पडलेला असतो. आपल्या सहवासातील अशा कीटकाच्या गोष्टीसाठीचा हा धागा. आपलं सर्वांचं स्वागत आहे. (छायाचित्र जालावरून साभार)

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 5 जून, 2021

दिठी

दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे ‘दिठी’ मराठी चित्रपट.

Deethi

चित्रपटाची सुरुवात रामजीच्या एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने सुरू होते. रामजीचा मुलगा पावसात आलेल्या पुरातील भोवऱ्यात वाहून जातो, येथून हा चित्रपट हळूहळू पुढे सरकायला सुरुवात होते. रामजी हा लोहार काम करणारा ग्रामीण भागातला एक बलुतेदार आहे. गाव अतिशय सुंदर, टुमदार आहे, हिरवाईने नटलेले आहे, आणि सतत आभाळ आणि पावसाने भरलेले आहे. चित्रपटात येणारी पात्र अगदी मोजकी आहेत. सतत कोसळणारा पाऊस याचं छायाचित्रण तर अतिशय सुरेख आहे. अशा रामजीच्या आयुष्यातलं दुःखाची गोष्ट. मुलाच्या जाण्याने आपल्याच दुःखात गुरफटलेला रामजी. (किशोर कदम) जगण्यात आता काही रस उरलेला नाही. जगातच काही उरलेले नाही अशावेळी एक नवी आशा, एक नवी उर्जा, नवीन सर्जनात्मक गोष्ट घडते, एक नवा अंकुर रामजीच्या जीवनात घेऊन येतो त्याची ही कथा.

‘आता आमोद सुनासी आले’ या दि.बा.मोकाशींच्या लघुकथेवरील हा चित्रपट. दिग्दर्शन सुमित्रा भावे यांचे आहे. चित्रपटात माउलीचे दोन अभंग आहेत. पात्र, रामजी (किशोर कदम) जोशीबुवा ( डॉ.मोहन आगाशे) संतु वाणी ( दिलीप प्रभावळकर) गोविंदा (गिरीष कुलकर्णी) पारुबाई ( अमृता सुभाष) आणि अशा काही मोजक्या अभिनेत्यांच्या अभिनय तर उत्तमच झाला आहे, पण पाऊस हा एक खलनायक तर हंबरणारी गाय हे या चित्रपटातील कळवळून टाकणारी पात्र आहेत. छायाचित्रण तुषार पंडित यांचं अतिशय उत्तम दर्जाचं झालं आहे. एकूणच या सर्व टीमने एक वेगळी अशी कलाकृती निर्माण केली आहे.

दिठी म्हणजे दृष्टी, जगण्यातील वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी. तीन दशके पंढरीचा वारी करणाऱ्या रामजीचा एकुलता एक मुलगा हिरावून गेल्यानंतर विठठलाला प्रश्न विचारणारा रामजी. अनेकांच्या दु:खात पांडुरंग म्हणून उभा राहणारा रामजी मात्र स्वतःच्या दु:खात कोलमडून जातो. आजूबाजूचा मित्रपरिवार, आठवड्याला पोथी-पुजा करणारे मित्र, समजवणारे सहकारी हे सर्व खोटं वाटायला लागतात. सोबत असलेला सावळा विठ्ठल सुद्धा आपल्याला मदत करीन नाही, अन्याय करतो तेव्हा रागाच्या भरात विधवा तरुण सुनेला जी ओली बाळंतीण असते तिला आणि तिच्या लहानमुलासहित ‘निघून जा’ म्हणणारा रामजी अतिशय उत्तम अभिनयाने जबरदस्त साकारला आहे. चित्रपटातील संवाद फार संथ आहेत, असे वाटायला लागते, अर्थात ते वातावरणास पोषक आहेत, आणि कलाकृतीला एका उंचीवर नेण्यास भाग पाडते असेही वाटते. संवादापेक्षा आजूबाजूचं चित्रपटात आलेलं चित्रण- वातावरण हे या चित्रपटाची खरी ताकद आहे. सव्वा तासाचा चित्रपट आहे, एक चहाचं दुकान, वाहणारी नदी, पाऊस, दिंडी, आणि दोन अभंग आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात. आणि सर्वांगसुंदर असा आनंद आणि अनुभूती देतात असे वाट्ते.

मराठीत अनेक आशयघन चित्रपट देणाऱ्या सुमित्रा भावे यांचा हा शेवटचा चित्रपट. हा चित्रपट बनविताना कलाकार, दिग्ददर्शक यांना आर्थिक पाठबळाशिवाय हा चित्रपट उभा करावा लागला असे वाचनात आले, सिनेमाला मदत करणारे हात आखडत गेले, शेवटी मोहन आगाशे यांनी स्वतःहून हा आर्थिक डोलारा सांभाळला, सिनेमातील कलाकारांनीही मानधन घेतले नाही, चित्रपट एकदा पडद्यावर येऊ द्या, मग बघू असे कलाकार म्हणाल्याचे वाचण्यात आले. दुर्दैवाने करोनाकाळ असल्यामुळे सिनेमा मोठ्या पडद्यावरही येऊ शकला नाही, अडलेल्या हंबरणाऱ्या गायीसारखीच या सर्व टीमची अवस्था झाली असे म्हणावे लागेल.

रामजीचं दुःख कशामुळे हलकं होतं, तो त्यातून बाहेर पडतो का ? त्याचं आकाश मोकळं होतं का आणि का होतं ? चित्रपट आनंद देतो काय ? यासाठी दिठी बघायलाच हवा. ‘सोनी लीव’ वर २१ मे पासून चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 13 मे, 2021

पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज !

आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. अजून पुढे काय होईल माहिती नाही. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.

देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.

जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.

जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.

भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.

सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री या पदावरही होत असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.

भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.

सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.

नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि ‘गीरे भी तो टांग उपर’करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू…!

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 9 सप्टेंबर, 2020

भोर भयो, बीन शोर..

आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल. मा.पंतप्रधान मोदी यांच्या एका मॉर्निंग वॉकचा व्हीडीयो पाहण्याता आला आणि आनंदाला पारावर उरला नाही. इतका मोठा माणूस, इतका व्याप, पण सकाळच्या प्रसन्न वातावरणात, निसर्ग सौंदर्यात त्या वॉकचा काय अवर्णनीय आनंद असेल. बॅग्राऊंडला मस्त संगीत असावं, आजूबाजूला मोर-लांडोर असावेत, त्यांच्यासोबत केलेल्या वॉकचे मजा काही औरच.

Pic.

भोर भयो, बिन शोर
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूर श्याम सुहाना
मनमोहक, मोर निराला.

सकाळ आपली नेहमीची झुंजमुंज होऊन नव्या नवरीसारखी नटून तयार झालेली असते, कोणताच आवाज न होता चोरपावलानी तिचा वावर सुरु होतो. तेव्हाच, मोर भयो, बिन शोर. मन अगदी मोर झाले आहे. भयो म्हणजे, झालं, होणे. मन विभोर झालं आहे. सावळा कृष्ण सुंदर नेहमीच सर्वाना आवडतो, आपला पांडुरंगही तसाच त्याचं मनमोहक रुप अगदी मनमोराचं वाटावं इतकं सुंदर असतं. तसाच मोर. मयुर. तितकाच मनमोहक आहे, खरं तर राष्ट्रीय पक्षी मोर, तो आपला पिसारा फूलवतो ते दृश्य अतिशय सुंदर असे होते. अशा मोरांबरोबर जेव्हा सकाल होत असेल तर तेव्हा सर्व समस्या, मनातील विचार दूर होऊन, मनाला प्रसन्नता लाभत असेल. मन उत्साही राहण्यासाठी काही उत्साहवर्धक गोष्टी हव्या असतात. मला मोरोपंताच्या श्लोककेकावलिची आठवण होते. मन गलबलून टाकणारी करुणार्त भावना अत्यंत उत्कटपणे यावे तसा तो आर्त सूर आणि प्रसन्नता त्यात दिसते. व्याकूळता आहेच, श्वास खोल आणि खोलवर जावा तशी ती अनुभूती. आणि हे देवा, तुझ्या उदराने अनेक शरणांगतांचे अपराध पचवले, तसे सर्व सुष्टीचे अपराध पोटात घेऊन एक नवी सकाळ हळुहळु फुलांप्रमाणे उमलत आहे.

रग है, पर राग नही,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूंजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज.

वेदना आहे, दुखणे आहे, पण कोणताच राग नाही. रागाचा अभाव असलेला तो विराग, तोच विश्वास आहे. कोणतीच आसक्ती नाही. आजही घराघरात कृष्ण-बासरीचे गाणं आहे, जगणे मुरली आहे, आणि मरणेही मुरली आहे, असे हे सुंदर भावकाव्य आणि मनोहर संगीत असलेली सकाला काय आनंद असेल. केवळ सुंदर. माणूस आज सुखासाठी धपडपडतांना दिसतो. विवंचना, अडचणी, दु:ख, अशा गोष्टीतून असा एक वेगळा प्रसंग सुखद आनंद देऊन जातो.

‘ऐकूनि विश्व सुखावे ज्या केकीचा अपूर्व तो टाहो,
त्याला आयुष्याचा इशकृपेने कधी ना तोटा हो.

केकावलीच्या टाहोने सर्व जग सुखी व्हावे, हीच त्या चराचर सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना……!

टीप : रचना मा.मोदींच्या ट्वीटरवरुन घेतली आहे.

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 28 मे, 2020

बायका

काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.

तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.

पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.

असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.

बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही

काहींनाच जाणवतात,
खोल-खोल श्वास,
अन् ते शब्द.
काहींना नाही इतकाच,
फरक असतो त्या,
मुक-संवादाचा.


बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.

आदिम काळापासून
सोबत आणि शिवाय,
सुरु असलेल्या
बायकांचा समर्थ प्रवास
अव्याहतपणे.

बायका म्हणजे
अस्वस्थ तगमग.
लिहिता येत नाही त्यावर
कविता, लेख.
आणि वैचारिकही.

बायका असतात
समुद्रगाज.
निळा अथांग सागर
अन,
हळूवार पणे हृदयावर
धडकणा-या
लाटा.

बायका असतात,
काळजी-आधाराचा
आधारवड.
गूढ़ महाकाव्य.
आणि
एक नवा अंकुर
सुष्टीतला.

बायका असतात ….

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 29 मार्च, 2020

वळण

गुलमोहरांच्या आपल्या त्या
कावळ्या चिमण्यांच्या
ओट्यावर.
काल तु म्हणालीस ‘वाट बघ’

आता आपलं कसं म्हणून
पुस्तकांची पानं उचकत
आतल्या आत गोठून गेलो
एका पानावर,
मोगर्‍याच्या वेलीशी,
फांदी सोडून घेतेय
आपले हात.

दारातून दिसतेय मला,
आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
आणि हळद लावून बसलेली
भेदरलेली नवरी.

शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे
सरकताहेत हळू हळू
गावांकडे.

सगळीच तीर्थस्थाने,
महापुरुष आठवून
कोणीच येत नाही डोळ्यासमोर,
हडबडून, गडबडून,
घामाने चिंब होऊन.
टीटवीचा आवाजही देह
चिरुन जातो.

आपलं ठरलंय,
विना आणाभाकांचं.
तुला मी आणि
मला तू जपायचं.
तुझा जिव्हाळा, अबोला
धपापणारा श्वास,
अन एक खोल हुंदका.

सखे,
आत्ता तू जशी असशील
तशी ये.
मरणाची भिती दाटून गेलीय.

आज..
कुठले हे वळण,
आपलेच आपण
दूर..दूर राहण्याचे……!

Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 सप्टेंबर, 2019

गझल : नको लिहूस.

नको लिहूस तू रे भावा माझ्या, कुठे तरी थांबशील का !
सांगून सांगून थकलो रे, काही नवीन लिहिशील का !

पळस फुलांचा रंग लाल, येतो कसा ते समजेल का !
शब्दांची दाट गर्दी अशी, उगाच ती आवडेल का !

शब्दांचे खेळ नवे रोज, कसे वेडेवाकडे ते बघशील का !
धापा टाकतात, मानही टाकतात, शब्दांना तू छळशील का !

बुडबुडे ते नाव त्याचे फुगे, टाचणी त्याला लावशील का !
रक्त आटवून लिहितोस तू हेमोग्लोबीन चेक करशील का !

राधा, मीरा, भजनात दंग मी, जरासा हळवा होशील का !
मैत्रीण म्हणते अरे राजा, तुकाराम नामदेव चाळशील का !

सांग सखे जीव लावतो कमी कुठे तू पडशील का !
चाफा, मोगरा, केवडा , गझल म्हणून माळशील का !

कसं काय सुचतं देवा यांना, प्रतिभा यांची फुलवशील का !
नको लिहूस तू ‘दिलीप’ काही, रसिक म्हणून राहशील का !

Older Posts »

प्रवर्ग