सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता. प्रशांतने मोबाईलच्या घड्याळात पाहिलं अकरा वाजून बावन्न मिनिटे झाली होती. रातकिड्यांचा किर्र किर्र आवाजात रात्र भयाण वाटत होती. बॅगेत आणलेली मेणबत्ती शोधावी म्हणून प्रशांत बॅग चाचपू लागला. बॅगेला चाचपतांना प्रशांतच्या हाताला काही तरी गार गार लागल्याने प्रशांत चपापला होता. मनातला पाल आणि सापाचा विचार दूर करुन त्याने मेणबत्ती काढली. आगपेटी काढली आणि काडी ओढणार तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. नाव पाहिलं आणि प्रशांत गालातल्या गालात हसला. दुसर्या टोकाहून लाडीक आवाज आला.
” मला प्रशांतशी बोलायचं आहे”
प्रशांत लटके चिडून म्हणाला ” काही काम असेल तर उद्या फोन करा किंवा पुण्यात आल्यावर भेटा”
”प्लीज प्लीज फोन कट करु नको. मी काय बोलतेय ऐकून तरी घे”
प्रशांतला तिच्याशी बोलायचं होतं आणि नव्हतं सुद्धा. प्रशांतच्या डोक्यातून गेल्या महिन्यात घडलेला प्रसंग काही जात नव्हता. निलूशी त्याचं भांडन झालं होतं. आता आपली ही शेवटची भेट. या नंतर आपण भेटणार नाही. एकमेकांना वचनं देऊन झाली. आणि समजूतदारपणाने त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवलं होतं. नीलूच्या बहीणीच्या अपघाती मृत्युनंतर नीलूला नाविलाजाने एका वकीलाशी लग्न करावं लागणार होतं. अपघातात तीही जखमी झाल्याचं कळलं होतं.
” बोल, काय बोलायचं आहे” उगाच राग दाखवत प्रशांत म्हणाला.
” उद्या सायंकाळी आपण नागवेलीच्या बागेत भेटतोय. मी एसेमेस करीन बाय” म्हणत निलूने फोन कट केला.
फोनकडे पाहात प्रशांतचं मन एक वेगळ्या भावविश्वात गेलं. आयुष्यात काय काय घडत असतं म्हणून तो विचार करत बसला. बाहेर कुठेतरी पावसाची एक सर घेऊन गेली होती. हवेत गारवा जाणवत होता. मातीचा दरवळही पोहचत होता. आदिवासींच्या आरोग्यसेवेच्या उपक्रमात नीलूची झालेली त्याला पहिली भेट आठवली. आणि मग भेटी नियमित होत गेल्या. दोघांनीही सामाजिक कार्य करायचा निर्णय घेतला. कुटूंबाच्या जवाबदार्या आणि सामाजिक उपक्रम यात नाती गोती यापासून दोघेही दूर झाले होते. प्रशांत सर्व आठवणीतून बाहेर पडला. झोपडीच्या तोंडाशी येऊन प्रशांतने दूरवर पाहिलं झोपड्यांमधे मंद उजेड दिसत होता. प्रशांत पुन्हा अंथरुणावर येऊन पडला. पण, तितक्यात खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. ”छ्या काहीतरीच काय” म्हणून प्रशांतने शाल अंगावर घेतली आणि तो पहुडला.
” प्रशांत, मला वाटलंच होतं तू इथे येणार, आलाच ना ! ”
झोपडीच्या दाराशी बाहेरच्या चांदणप्रकाशात एक अस्पष्ट आकृती प्रशांतला दिसत होती. केस मोकळे सोडलेले, पण ते हळूवार उडत होते. तपकिरी रंगाचे डोळे अंधारात चमकत होते. शरीरावर वस्त्र आहेत की नाही ते अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं. पायातलं चांदीचं पैंजण मात्र चकाकत होतं. नीलू वाटत नाही पण निलूच वाटावी इतकी ती काळाखोतली आकृती सारखी वाटत होती. बाहेर कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज वाढलेला होता. ती काळोखातली आकृती पुढे हात करुन म्हणाली.
” प्रशांत, ये रे बाहेर. अजून खूप वेळ आहे, सकाळ व्हायला. माझं ऐक, प्लीज. ” आवाज निलूचाच होता.
” तुला आवडतात ना मी मोकळे केस सोडलेले, तुला केसात गजरा माळायला आवडतो ना”
प्रशांतची भितीने गाळण उडाली होती. प्रशांतचा ऊर जोरजोरात धपापू लागला. प्रशांत आपल्या परिचित मित्रांच्या नावाने हाका देऊ लागला. आता मात्र झोपडीचं फाटक लावल्याचा आवाजही येऊ लागला. एकाएकी गारेगार वार्याची झुळुक प्रशांतच्या अंगावर येऊन गेली. बंद फाटकातून इतका गार वारा यावा याचं प्रशांतला एवढ्या भितीच्या प्रसंगातही आश्चर्य वाटलं. आता ती सुंदर वाटणारी आकृती हिंस्र पशूसारखी दिसायला लागली. आता ती आकृती वेगवेगळे आकार घेऊ लागली. प्रशांत भितीमुळे आलेल्या घामाने चिंब झाला होता. प्रशांतने तितक्याच तत्परतेने उशाशी ठेवलेल्या बॅगेत हात घातला. एक स्तोत्राचं पुस्तक त्याच्या हाती लागलं. जोरजोरात तो ते अष्टक श्लोक म्हणू लागला. घशाला कोरड पडली त्याने पाण्याची बॉटल हातात घेतली होती आणि त्याच बरोबर.
” मी येणार नाही, माझी अजून वेळ झालेली नाही.”
” मी येणार नाही, माझी अजून वेळ झालेली नाही, असे ओरडू लागला.
सकाळी सकाळी आजूबाजूच्या वस्तीवरची लोक आपापल्या कामावर निघालेली होती. एकाने प्रशांतला हाताने हलवून हलवून उठवले.
‘वो, सायब, वो सायब, असं काहून ओरडू राहीले. काय म्हणताय तेबी कळंना”
आजूबाजूची सर्व बाया माणसं प्रशांतला फिदीफिदी हसत होती. सकाळची कोवळी सूर्यकिरणे झोपडीत यायला लागली होती. प्रशांतने डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं आणि तो स्वतःशीच गालातल्या गालात हसायला लागला. मात्र रात्रीचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. दोन बिसलर्या बाटल्यांपैकी एक संपलेली आणि एक मात्र भरलेली दिसत होती. कोणी आणून ठेवल्या होत्या या पाण्याच्या बॉटल, आणि तेव्हाच प्रशांतच्या मोबाईल इनबॉक्समधे निलूचा मेसेज लकाकत होता” गुड मॉर्निंग, नाईस टू मीट यू”
प्रतिक्रिया व्यक्त करा